जंगलातला सिंह म्हातारा झाला, तर टोळीतील इतर सिंहांचे हल्ले झेलत एके दिवशी मरून जातो. अशा वेळी माणसाचा आश्रय घ्यावा हे इंगित त्याला माहीत नसते. सिंहासारखी वाटणारी किंवा सिंहाच्या आवेशात वावरणारी माणसे म्हाताऱ्या सिंहासारखी अगतिक होतात, तेव्हा ती मात्र, अलगदपणे अशा पिंजऱ्यांमध्ये येऊन दाखल होतात. उरल्यासुरल्या आयुष्यातील सुरक्षिततेची हमी त्याला गजाआडच्या पारतंत्र्यातही सुखावत असते. मुंबईच्या गुन्हेगारी विश्वावर आपल्या नावाची मोहोर उमटविलेल्या आणि पोलीस व सुरक्षा यंत्रणांना वर्षांनुवर्षे चकविणाऱ्या राजन निकाळजे ऊर्फ छोटा राजन या कुख्यात गुंडास अटक झाल्यानंतर म्हाताऱ्या सिंहाची गोष्ट आठवणे अपरिहार्य होते. मुंबईतील बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेला आणि ‘मोस्ट वॉण्टेड’ यादीतील पहिल्या क्रमांकावरील दाऊद इब्राहिम कासकरच्या मागावर असताना अचानक दाऊदचा कट्टर वैरी आणि खतरनाक गुन्हेगार छोटा राजन तपासयंत्रणांच्या हाती लागल्याने अनेक जण चक्रावून गेले आहेत. छोटा राजन आणि दाऊद यांच्यातील वैराला कालांतराने भारत-पाकिस्तान वैराच्या कहाण्याही जोडल्या गेल्या आणि पाकधार्जिण्या दाऊदचा काटा काढण्यासाठी ‘देशप्रेमी गुन्हेगार’ छोटा राजनचा वापर केला जात असल्याच्या कहाण्यांनी वृत्तपत्रांचे रकाने वर्षांनुवर्षे भरत राहिले. गुन्हेगारी विश्वातील दाऊदएवढीच रंजक कथा होऊन राहिलेल्या छोटा राजनच्या अटकेमुळे गुन्हेगारी विश्वातील असंख्य गूढांना वाचा फुटण्याची आशा पल्लवित झाली आहे. राजकारणी व गुन्हेगारी विश्वाचे साटेलोटे, दाऊद इब्राहिमच्या गुन्हेगारी साम्राज्याची पाळेमुळे आणि खुद्द छोटा राजनच्या हस्तकांनी केलेल्या गुन्ह्य़ांची उकलही या अटकेमुळे सोपी होणार, असेही पोलिसांना वाटू लागले आहे. मुळात हे अटकनाटय़ एवढय़ा सहजपणे साध्य झाल्याने, अटक झालेली व्यक्ती खरोखरीच छोटा राजन आहे यावर अगोदर कुणाचाच विष्टद्धr(२२४)वास बसत नव्हता, पण तो छोटा राजनच आहे यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर, इतक्या सहजासहजी तो पोलिसांच्या हाती आल्याने हे ‘अटकनाटय़’ आहे की ‘शरणागती’ आहे, यावर खल सुरू झाला. असंख्य आजारांनी ग्रासलेल्या, वाढत्या वयाबरोबर शरीराला जडलेल्या व्याधींमुळे काहीसा हतबल झालेल्या छोटा राजनने दाऊदचा ससेमिरा संपवून सुरक्षित राहण्यासाठी अखेर मायभूमीच्या पिंजऱ्याचा आसरा घेतला, असेही तर्क लढविले जाऊ लागले होते. प्रत्यक्षात, छोटा राजनची अटक ही नेमक्या कोणत्या योजनेची पहिली खेळी आहे, हे जाणणारी मोजकीच माणसे या देशात असावीत, असेही दिसू लागले आहे. ज्यांच्याभोवती असंख्य कथा-दंतकथांचे वलय आहे, ते भारतीय गुप्तचर यंत्रणेचे माजी प्रमुख अजित डोवल यांनी छोटा राजनच्या या अटकेत मोलाची भूमिका बजावली असावी अशी चर्चा आहे. दाऊदला जाळ्यात पकडण्यासाठी याच डोवल यांनी राजन टोळीचा खुबीने कसा वापर करून घेतला होता त्याच्या रंजक कहाण्या गुन्हेगारी विश्वात दबत्या आवाजात चर्चिल्या जातात. छोटा राजनच्या अटकेमागे याच डोवल यांची भूमिका असेल, तर एका मोठय़ा योजनेचा हा भाग असू शकतो, असेही बोलले जात आहे. दाऊद इब्राहिमच्या मुसक्या बांधणे हे भारताचे उद्दिष्ट आता लपून राहिलेले नाही. म्हणूनच, या कारवाईनंतर नवे प्रश्न उभे केले जात असले, तरी एखादे ठोस उत्तर शोधण्याची प्रक्रियादेखील त्यामागे दडलेली असू शकते, असे मानावयास जागा आहे.