सामूहिक नेतृत्व आणि पक्षांतर्गत लोकशाही असली की एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना कसे चौफेर ‘सूर’ फुटतात, त्याचे जिवंत चित्र सध्या भाजपमध्ये उमटलेले दिसत आहे. मोदींपासून फडणवीसांपर्यंत, गडकरींपासून दानवेंपर्यंत आणि तावडेंपासून टिळकांपर्यंत यच्चयावत नेते आपापली ‘मन की बात’ उघड करू लागले आहेत. पूर्वी, ‘एकचालकानुवर्तित्वा’चे संस्कार असल्याने, बोलणारा नेता एकच असायचा आणि तो एकदा बोलला, की पक्षाचे दिल्लीपासून गल्लीपर्यंतचे सारे नेते-कार्यकर्ते तोच सूर पुढे आळवत असायचे. पुढे पक्षाने पक्षांतर्गत लोकशाही स्वीकारली, सामूहिक नेतृत्वाची संकल्पना जोपासली आणि प्रत्येक नेत्याला बोलावयाचा अधिकार मिळाला. तेही एका अर्थाने बरेच झाले. कधी कधी, एखाद्या नेत्याच्या एखाद्या वक्तव्याची एवढी चर्चा होते, की त्यामुळे जनतेच्या जिव्हाळ्याचे अनेक खदखदणारे प्रश्न बाजूलाच राहतात. त्यांची फारशी चर्चा होतच नाही आणि पक्षाचा कोणता नेता काय बोलून गेला यावर मात्र, समाजमाध्यमांपासून वृत्तवाहिन्यांपर्यंत सर्वत्र तणावपूर्ण चर्चा झडू लागतात. त्यामुळे, सामूहिक नेतृत्वाची कास धरून आपण योग्य तोच निर्णय घेतला याचे या पक्षाच्या तत्कालीन नेत्यांनाही आता समाधानच वाटत असेल.   गेल्या काही महिन्यांपासून भाजपमधील आयारामांच्या लोंढय़ांमुळे पक्षाचा ‘मूलनिवासी’ कार्यकर्ता हैराण होता. ज्यांना राजकारणाने ओवाळून टाकले, त्या सर्वासाठी पक्षाची कवाडे खुली करण्याच्या नीतीचा नेमका अर्थच समजत नसल्याने अनेक जण संभ्रमात होते. परवा पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हा संभ्रम संपविला. पक्ष वाढवायचा असेल, तर अशा लोकांना पक्षात घेऊन पावन करावे आणि त्यांचे परिवर्तन करावे हा ‘महामंत्र’ त्यांनी दिला. पक्षाच्या मंचावरील मोठा नेता जेव्हा काही ‘मन की बात’ उघड करतो, तेव्हा टाळ्या वाजवायच्या असतात, या राजकारणातील अलिखित संकेतामुळे तेव्हा पक्षाच्या तमाम पदाधिकाऱ्यांनी टाळ्या वाजविल्या, त्यात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेदेखील होते. पण या टाळ्यांच्या गजराचा आवाज विरण्याच्या आतच रावसाहेब दानवे यांच्यावर मन मोकळे करण्याची वेळ आली, आणि सामूहिक नेतृत्व व पक्षांतर्गत लोकशाहीमुळे मिळालेला ‘मन की बात’ व्यक्त करण्याचा अधिकार त्यांनीही वापरून टाकला. त्या वेळीही त्याच पदाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा टाळ्या वाजविल्या. रावसाहेब दानवे यांनी राज्यातील भाजपला ‘पतित पावन संघटना’ करून टाकली आहे, असे पक्षाचे कार्यकर्ते काही महिन्यांपूर्वी खाजगीत बोलत असत. मन की बात व्यक्त करण्याचा अधिकार सर्वानाच मिळालेला नसल्याने, काही जणांना ती पोटातच ठेवावी लागत असल्याने, खाजगीतली कुजबुजही बाहेर जाणार नाही, याची काळजी घेऊनच हे बोलले जात होते. पण स्वत: रावसाहेब दानवे यांनीच ‘आता आयारामांना आवरा’ असा सूर लावल्याने, टाळ्यांसोबत हशादेखील पिकला. ज्या मंचावरून गडकरींनी आयारामांसाठी कवाडे उघडण्याचा सल्ला दिला, त्याच मंचावरून, ‘आता कवाडे बंद करा नाहीतर आम्हालाच आतमध्ये जागा उरणार नाही’ असा परखड सल्ला दानवे यांनी मिस्कील स्वरात दिला. भाजपच्या कार्यकर्त्यांना हे ऐकून बरे वाटले असले, तरी पक्ष कार्यालयांशेजारी गुच्छ आणि हार विकण्याची दुकाने थाटण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांचा मात्र दानवेंच्या या सुराने हिरमोड झाला असेल. गडकरी आणि दानवे यांच्यापैकी कोणाची मन की बात पक्षात पुढे रेटली जाते आणि ‘वाल्मीकी रामायणा’चा नवा अध्याय लिहिला जातो, याकडे आता कार्यकर्ते नजरा लावून बसले असतील.