राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूरच्या रेशीमबाग मदानावर बरोबर अकरा महिन्यांपूर्वी, ६ ऑक्टोबर २०१४ रोजी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे युती तोडण्याचे ‘श्रेय’ भाजपला दिले होते. ‘एकनाथ खडसे यांनी फोन करून युती संपुष्टात आल्याचे कळविले’ असा गौप्यस्फोट त्या वेळीच ठाकरे यांनी जाहीर सभेतच केला होता. त्यामुळे, ‘युती तुटल्याचे शिवसेनेला कळविण्याची हिंमत मी दाखविली’ असे आता जाहीर करूनही एकनाथ खडसे यांच्या त्या हिमतीला दाद देण्यासाठी भाजपमधील कोणीही पुढे येणार नाही. शिवसेना आणि भाजपची त्याआधीची पंचवीस वर्षांची युती विचारांच्या आधारावर होती, असे दोन्ही पक्षांचे युतीचे शिल्पकार आग्रहाने सांगत असत. विधानसभा निवडणुकीआधी या विचारांना सुरुंग लागावा असे काय घडले आणि ही युती तोडावी असे भाजपला अचानक का वाटू लागले याचे कारण महाराष्ट्राच्या राजकारणात दडलेले आहे. मुळात वैचारिक पायाचा गजर करीत सेना-भाजप एकत्र आले असले तरी मतविभागणी टाळणे हे त्यामागचे निवडणुकीचे राजकारण सूर्यप्रकाशाएवढे स्वच्छ होते. ती गरज कमी होईल तेव्हा दोन्ही पक्ष स्वबळ अजमावण्यासाठी युतीकडे पाठ फिरविणार हेही अपरिहार्य होते. अशी राजकीय अनुकूलता निर्माण होण्याकरिता, महाराष्ट्रातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी तुटणे ही या दोन्ही पक्षांची गरज होती. लोकसभा निवडणुकीत देशात काँग्रेसची वाताहात झाल्यानंतर महाराष्ट्रात तेच वारे वाहू लागल्याचे दिसताच, केवळ सत्तेसाठी काँग्रेससोबत असलेल्या राष्ट्रवादीत, वेगळी चूल मांडण्याचा विचार सुरू झाला होता. या साऱ्या घडामोडी अपेक्षेप्रमाणे घडणार हे स्पष्ट झाल्याने, युती संपुष्टात आणण्याचा निर्णय दिल्लीत मोदी यांच्यासमवेत झालेल्या बठकीत घेण्यात आला, आणि महाराष्ट्रात तो जाहीर करण्याची जबाबदारी खडसे यांनी घेतली. त्यानंतरचे राजकारण महाराष्ट्राला माहीत आहे. पंचवीस वष्रे वैचारिक धाग्याने भाजपसोबत राहिलेली शिवसेना निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या हितासाठी पुन्हा सत्तेत सहभागी झाली, हा गेल्या ११ महिन्यांचा इतिहास आहे. त्यामुळे, ‘युती तुटल्याचे जाहीर करणाऱ्या’ खडसे यांच्याकडे ‘युती तोडण्याचे’ श्रेय जात नाही. युती तोडावी असा सूर भाजपमध्ये सर्वात अगोदर पक्षाचे तेव्हाचे प्रवक्ते मधू चव्हाण यांनी लावला होता. अर्थात, या विचाराचा बोलविता धनी पक्षाच्याच वरच्या फळीतील होता, हे स्पष्ट आहे. युती तुटल्याचे जाहीर करून आपण िहमत दाखविली असे खडसे यांना वाटत असले तरी महाराष्ट्राच्या राजकारणात अगोदरच संगनमताने झालेल्या सर्वपक्षीय व्यूहनीतीचा तो केवळ एक भाग होता. कारण, युती तुटल्याचे जाहीर होताच लगेच राष्ट्रवादी काँग्रेसनेही काँग्रेसपासून काडीमोड घेत चौरंगी लढतीचा मार्ग भाजपसाठी प्रशस्त केला होता. काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र असताना युती तोडून स्वतंत्र लढणे म्हणजे मतविभागणीला आमंत्रण देणे ठरेल, याची जाणीव सेना-भाजप या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना होती. ठरल्यानुसार सारे काही सुरळीत झाल्यानंतर, खडसे हे केवळ त्या वेळेपुरते वापरले गेलेले एक हत्यार होते. मुळात खडसे यांच्या अशा वक्तव्यांमागे गेले ११ महिने ठसठसणारी एक वेदना असावी. पक्षातील ज्येष्ठत्व, राजकारणातील आणि सरकार चालविण्यातील अनुभव यांच्या जोरावर राज्याच्या नेतृत्वाचा हक्क आपल्याकडे चालून येईल ही त्यांची अपेक्षा फोलच ठरली. ‘बहुत छळियले..’ अशी ही स्थिती. नाराजीचे सूर लपविणे नाथाभाऊ खडसे यांच्या स्वभावात नाही. त्यामुळे संधी मिळेल तेव्हा ते तो सूर लावतात. त्यातील वेदना मात्र आता बोथट झाली आहे.