आजही अमेरिका या राष्ट्राचे सामाजिक चारित्र्य साठच्या दशकातीलच आहे, हे सिद्ध करणाऱ्या घटना वारंवार घडत आहेत. डॅलसमध्ये एका कृष्णवर्णीय माजी सनिकाने पाच गौरवर्णीय पोलिसांची केलेली हत्या ही त्यातील ताजी भर. आधी दोन वेगवेगळ्या घटनांत दोन सर्वसामान्य कृष्णवर्णीयांना पोलिसांनी गोळ्या घालून मारले. त्याचा बदला म्हणून डॅलसमधील हत्याकांड घडले. हिंसेची ही साखळी येथेच संपणार नाही आणि मिनेसोटा वा लुझियानातील दोन सर्वसामान्य कृष्णवर्णीयांच्या मृत्यूपासूनही ती सुरू झालेली नाही. याआधी दोन वर्षांपूर्वी मिसौरीतील फर्गसनमध्ये उसळलेल्या दंगलीचे घाव अजूनही ताजे आहेत.  वस्तुत: अमेरिकेतील वर्णभेद कायदेशीररीत्या संपला त्याला आता ५० वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. या काळात अमेरिकेने एका कृष्णवर्णीय व्यक्तीला, बराक ओबामा यांना राष्ट्राध्यक्षपदी बसवून इतिहासही घडविला आहे; पण या सामाजिक आराशीच्याच गोष्टी असतात. आíथक प्रगतीमुळे, खुल्या अर्थव्यवस्थेत वर्णभेद, जातिभेद यांसारख्या सामाजिक समस्या राहात नाहीत असा अनेकांचा भाबडा समज असतो. तो या काळाने ध्वस्त केला आहे. उलट अमेरिकेसारख्या श्रीमंत अर्थव्यवस्थेतही आज ‘अँग्लो-सॅक्सन व्हाइट’ विरुद्ध बाकी सारे काळे, पिवळे, विटकरी अशी मानसिक दरी दिसते. ती किती खोल आहे हे पाहणारा कुठे उभा आहे यावरून ठरते. डॅलस हत्याकांडानंतर ओबामा यांनी दिलेल्या प्रतिक्रिया, त्यांचे भाषण विवेकी होते. अमेरिका वाटते तेवढी विभागलेली नाही, असे म्हणतानाच त्यांनी तेथील न्यायव्यवस्थेपर्यंत शिरलेल्या वर्णभेदी मानसिकतेवरही बोट ठेवले आहे. गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकेत ब्लॅक लाइव्हज मॅटर नामक चळवळ सुरू आहे. ओबामा यांचा त्या चळवळीला विरोध नाही. त्यांचे म्हणणे एवढेच आहे की, काळ्यांचे प्राण महत्त्वाचे असतात याचा अर्थ निळ्यांचे नसतात असा होत नाही. हा जगा आणि जगू द्या असा विचार आहे. ओबामांनी या संदर्भात अमेरिकेतील जी आकडेवारी दिली आहे त्यावरून मात्र तेथे हा विचार प्रबळ नाही हेच दिसते. पोलिसी हिंसाचारात सर्वाधिक बळी जातात ते काळ्यांचेच. असे का होते, हा खरे तर प्रश्नच नाही. जो समाज, सगळेच काळे गुन्हेगार नसतात, पण बहुतेक गुन्हेगार काळे असतात असे मानतो, त्या समाजातून येणारे पोलीस हे गौरेतरांकडे कशा नजरेने पाहणार हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. एखाद्या समाजावर अशा प्रकारचे शिक्के मारणे हे चुकीचेच. अमेरिकेतील पोलीस वारंवार ही चूक करताना दिसत आहेत आणि त्याच वेळी तेथे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या द्वेषाचे राजकारण करणाऱ्याच्या मागे मोठा समाज जाताना दिसतो आहे हे चित्र अमेरिकी समाजव्यवस्थेबद्दल खूप काही चांगले सांगणारे नाही. आम्ही काळ्यांचा द्वेष करणार, अरबांना, शिखांना दहशतवादी समजणार, भारतीय आणि चिन्यांना आपल्या बेरोजगारीबद्दल जबाबदार धरणार आणि मग लोक आमचा रागराग का करतात असे विचारणार हे काही शहाण्या माणसाचे लक्षण नाही. ओबामा यांच्यासारख्या लोकनेत्यांपुढे आव्हान असते ते ही शहाणीव जागविण्याचे. ओबामा यांचे सध्याचे प्रयत्न त्याच दिशेने होताना दिसत आहेत. पुढच्या आठवडय़ात ते व्हाइट हाऊसमध्ये सामाजिक कार्यकत्रे, पोलीस अधिकारी आदींची एक बठक बोलावून, ‘परिस्थितीत निश्चित बदल होण्याकरिता कोणत्या विधायक कृती करता येतील’ यावर विचारविनिमय करणार आहेत. समाजातील मानसिक दरी सांधण्यासाठी राष्ट्रनेत्याने असेच प्रयत्न करायचे असतात. ओबामा यांना त्यात यश येईलच असे नाही. वर्णभेदासारख्या भावनांमागे अर्थकारण असते, राजकारण तर असतेच, पण त्याहून अधिक संस्कृतीकारण असते. त्यात बदल घडविणे हे अवघडच. डॅलस हत्याकांडाने ते किती अवघड आहे हेच दाखवून दिले आहे. हे आव्हान पेलण्यात ओबामांचीच नव्हे, तर येणाऱ्या अध्यक्षांचीही कसोटी लागणार हे नक्की.