आयारामांच्या लोंढय़ांमुळे मूळ पक्ष नासत आहे, अशी भाजपच्या मूलनिवासी स्वयंसेवकांची भाबडी समजूत असली, तरी वाल्याचा वाल्मीकी करून नवा माणूस घडविण्याच्या संघविचाराचाच वसा भाजपने उचलला आहे असेच या ‘वाल्मीकीकरण’ मोहिमेचे स्वरूप दिसते. जनसंघ-भाजप प्रवासातील मूळच्या वाटसरूंना हेच मान्य नाही ही खरी समस्या आहे. राजकारणाने वाल्या ठरविलेल्या साऱ्यांनाच वाल्मीकी करण्याच्या अवघड मोहिमेत मूळचा पक्षच बिघडून जाईल, अशा शंकेने अनेकांना ग्रासले आहे. ही शंका रास्त असली तरी त्यामागचे छुपे कारण वेगळेच आहे. हाती सत्ता असूनही, आयारामांच्या अतिक्रमणामुळे सत्तेच्या संधी संकुचित होतील, या भयाचा या शंकेशी जवळचा संबंध असावा. संधी साधणे हेच राजकारणातील कौशल्य असल्याने, संधीचे सोने करण्याच्या स्पध्रेत अनुभवी आयाराम आघाडीवर राहतील आणि सतरंज्या-खुच्र्याची मांडणी करण्यात आयुष्य वेचलेले निष्ठावंत डावलले जातील ही त्यामागची भीती आहे. सध्या भाजपमध्ये अनेकांनी सत्तेच्या संधीचे सोने लुटण्यासाठी आपापल्या मुक्ताफळांचा असा काही मुक्त वर्षांव सुरू केला आहे, की काँग्रेसच्या दिग्विजयी नेत्यांनीही तोंडात बोटे घालावी! देशावर प्रदीर्घ काळ सत्ता गाजविणाऱ्या काँग्रेससारख्या बलाढय़ पक्षाकडे त्यांच्या सत्ताकाळात एखादाच वाचावीर असायचा, आणि बेताल मुक्ताफळे उधळण्याचा मक्ता केवळ त्याच्याकडेच असायचा. सत्तेची वस्त्रे अंगावर असल्यावर जिभेला हाड असण्याची गरज नाही, हे त्या वाचावीराने वारंवार सिद्ध करून दाखविल्याने, सत्तांतर झाल्यानंतर भाजपमध्येही अनेकांनी आपापल्या जिभा सल सोडल्या. झटपट प्रसिद्धीचा आणि मूळ समस्यांना बगल देऊन भलत्याच मुद्दय़ावर समाजात संभ्रम निर्माण करण्याचा सोपा मार्ग म्हणूनही या तंत्राकडे पाहिले जाते. शिवाय ‘पाकिस्तानशी संगनमत’ वगैरे आरोपांमुळे जमिनीवरच्या सर्व समस्यांना बगल देण्याचा छुपा हेतूही साध्य होतो हे लक्षात आल्यानंतर आता जिभा सल सोडण्याच्या स्पध्रेत मूळ भाजपाईंनीदेखील हिरिरीने उडी घेतल्याचे दिसू लागले आहे. काही नेत्यांना याचाच मानसिक त्रास सुरू झालेला दिसतो. वेडी आणि खुनी माणसे वगळून कोणासही भाजपमध्ये प्रवेश दिला जातो, ही महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची टिप्पणी म्हणजे या चिंतेचेच प्रतििबब आहे. पण जिभा सल सोडण्याच्या स्पध्रेसाठी आता निष्ठावंतांनीही जोमदार तयारी सुरू केलेली दिसते. मुळात, अशा स्पध्रेच्या तयारीसाठी लागणारा कच्चा मसाला देशात भरपूर पिकविण्यासाठी पुरेशी मशागत केव्हाच पूर्ण झालेली असल्याने मूळच्या निष्ठावानांच्या हाती आयती कोलिते मिळालेली असून, गुजरात निवडणुकीच्या धक्क्यानंतर अनेकांची भीडदेखील चेपली आहे. केंद्रीय मंत्रीदेखील आता ‘मन की बात’ उघडपणे व्यक्त करू लागले आहेत. हंसराज अहिर हे आपल्या कार्यक्रमाला डॉक्टरांची गैरहजेरी हाच लोकशाहीविरोध मानून ‘नक्षलवादी व्हा, गोळय़ांनी ठार करू’ असे डॉक्टरांना सुनावतात, अनंतकुमार हेगडे हे ‘आम्ही घटना बदलण्यासाठीच आलो’ म्हणतात, राजस्थानातील आमदार ग्यानदेव आहुजा ‘गाईंची तस्करी कराल, तर जेथल्या तेथे मारले जाल’ अशी धमकी देतात, ही जाहीर वक्तव्ये लक्षात घेतली, तर जिभा सल सोडण्याच्या स्पध्रेत आता मूळचे भाजपवीर मागे राहणार नाहीत याची खात्रीच पटते. मुळात, बेधडक वा बेताल वक्तव्यांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे, अशी खात्री पटल्यामुळे अनेकांची भीड चेपल्याने वैचारिक उन्मादाची मुळे मूळच्या पक्षापर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असले तरी, पक्षाच्या वाल्मीकीकरण मोहिमेवर याचा काही परिणाम होईल असे सध्याचे तरी चित्र नाही.