भारतीय क्रिकेटमधील दोन सर्वाधिक वलयांकित क्रिकेटपटू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यातील कथित दुहीच्या बातम्यांनी हे अवकाश ढवळून निघाले आहे. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत आणि यासंबंधीचे वृत्त कपोलकल्पित आहे असे विराटने वेस्ट इंडिजला रवाना होण्यापूर्वी सांगितले आहे. हा खुलासा झाल्यानंतरही दुहीची किंवा संघात ‘उभी फूट’ पडल्याची चर्चा निवळलेली नाही. ते खरे असेल, तर त्याचा विपरीत परिणाम भारतीय संघाच्या कामगिरीवर होण्यापूर्वी प्रशासकीय समितीने या दोहोंशी चर्चा करण्याची गरज आहे. पण हे वृत्त म्हणजे वास्तवापेक्षा चऱ्हाटखोरांची निर्मितीच अधिक भासते. दोन अव्वल दर्जाच्या क्रिकेटपटूंमध्ये घनिष्ठ मैत्रीच असावी किंवा त्यांच्या कोणत्याही मुद्दय़ावर कसलेच मतभेद असूच नयेत, ही अपेक्षाच मुळात बालिश. त्यातून कोणी कोणाला ट्विटरवर ‘अनफॉलो’ केले याविषयीचे दाखले दिले जाणे तर निव्वळ हास्यास्पद. सुनील गावस्कर आणि कपिलदेव या महान क्रिकेटपटूंची घट्ट मैत्री होती, असे कुणीच म्हणणार नाही. पण एकाच्या नेतृत्वाखाली भारताने १९८३मध्ये पहिल्यांदा विश्वचषक जिंकला आणि दुसऱ्याच्या नेतृत्वाखाली १९८५मध्ये सर्व क्रिकेट संघांचा सहभाग असलेली चॅम्पियन्स स्पर्धा जिंकली होती. विराट आणि रोहित हे स्वतंत्र प्रतिभेचे गुणवंत आहेत. मर्यादित षटकांमधील क्रिकेट संघाचे नेतृत्व रोहितकडे द्यावे आणि कसोटी संघाचे नेतृत्व विराटकडे ठेवावे, अशीही सूचना येत आहे. तिच्या मुळाशी भारताचा अलीकडील विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध झालेला पराभव आहे. यासंदर्भात सुनील गावस्कर यांनी मांडलेला मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. विश्वचषक स्पर्धेतील भारतीय संघाच्या कामगिरीचा आणि विराटच्या नेतृत्वाचा आढावा निवड समितीने का घेतला नाही, असा प्रश्न गावस्कर उपस्थित करतात. गावस्कर यांच्या मते विद्यमान निवड समिती नामधारी आहे. ती कोणाच्याच खिजगणतीत नसल्यासारखी स्थिती आहे. निवड समिती अध्यक्ष एम. एस. के. प्रसाद यांनी कोणत्याही निर्णयामध्ये स्वत:ची विवेकबुद्धी वापरून प्रसंगी विराट आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांना ताळ्यावर आणल्याचे उदाहरण नाही. वास्तविक दिलीप वेंगसरकर, संदीप पाटील, किरण मोरे अशा माजी क्रिकेटपटूंनी निवड समिती अध्यक्षपद सांभाळताना आवश्यक खमकेपणा वेळोवेळी दाखवला होता. या तिघांपैकी कोणीही प्रसाद यांच्या जागी असते, तर चौथ्या क्रमांकावरील फलंदाजाविषयीचा निर्णय अधांतरी राहिला नसता. अखेरीस भारताचे पतन होण्यास मधल्या आणि खालील फळीतील अनुभवी फलंदाजांचा अभाव हे प्रमुख कारण ठरले. विराट आणि शास्त्री यांच्या मर्जीनुसारच संघनिवडीपासूनचे सगळे निर्णय होणार असतील, तर निवड समितीची गरजच काय असा सवाल विनोद राय आणि डायना एडलजी या प्रशासकांनी विचारायला हवा. प्रशिक्षक शास्त्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांची मुदत संपुष्टात येत असून, लवकरच नवीन प्रशिक्षक निवडला जाणार आहे. पण त्यापूर्वीच विराटने शास्त्रीच्या नावाला पसंती दर्शवावी, हे आक्षेपार्ह आहे. शास्त्री प्रशिक्षकपदावर आणि महेंद्रसिंग धोनी संघात असल्यास विराटला सुरक्षित वाटते का? त्यांच्या सल्ल्याशिवाय तो नेतृत्व करूच शकत नाही का? हे प्रश्न विचारण्याचा अधिकार निवड समितीकडे असूनही तो बजावला गेला नाही. या समितीची मुदत सप्टेंबरमध्ये संपत असल्यामुळे विराट-शास्त्रीसारख्या प्रभावी व्यक्तींना अस्वस्थ करणे योग्य नाही, असा सोयिस्कर निष्कर्ष समितीने काढला असावा. भारतीय क्रिकेट संघ बऱ्यापैकी सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे, तरीही काही प्रश्न वारंवार उपस्थित होतात आणि अनुत्तरित राहतात. त्यांचे निराकरण करणारेच प्रश्नांपासून पळत आहेत, हे सुलक्षण मानता येणार नाही.