16 October 2019

News Flash

इंडिगोदेखील..?

इंडिगो कंपनीचा सध्या स्थानिक बाजारपेठेत ४७ टक्के हिस्सा आहे.

(संग्रहित छायाचित्र)

मृतवत जेट एअरवेज आणि मरणपंथाला लागलेल्या एअर इंडियासमोरील अडचणी संपत नसताना, आता भारतातील सर्वाधिक यशस्वी मानल्या जाणाऱ्या इंडिगो एअर विमान कंपनीच्या प्रवर्तकांमधील मतभेदांमुळे संपूर्ण हवाई वाहतूक क्षेत्रालाच घरघर लागल्यासारखी परिस्थिती आहे. सर्वाधिक वेगाने वाढणारी हवाई वाहतूक बाजारपेठ म्हणून आजही मिरवणाऱ्या भारतामध्ये विमान कंपन्या चालवणे खरोखरच इतके जिकिरीचे असते का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. मुळात विमान कंपनी चालवण्यामध्ये नफा कमी आणि वलय अधिक अशीच परिस्थिती जगभर आढळून येते. यशस्वी विमान कंपनीचे कोणतेही सर्वमान्य असे सूत्र प्रस्थापित होऊ शकलेले नाही. कारण या उद्योगासाठी भांडवल उभारणीच मुळात अतिशय खर्चीक असते. शिवाय या क्षेत्रात कामगारवेतनही इतर अनेक उद्योगांच्या तुलनेत चढे असते. उत्पन्नाचे स्रोत अनिश्चित आणि बाह्यघटकांवर आधारित असतात. त्यात पुन्हा स्वस्तातल्या विमान सेवांनी (लो-कॉस्ट कॅरियर) परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची बनवली आहे. जेट एअरवेजसारख्या मुख्य प्रवाहातील विमान कंपन्यांना घरघर प्रामुख्याने स्वस्तातल्या विमान सेवांमुळे लागली. तशात दोन महत्त्वाच्या घडामोडींची झळ जगभरच्या कंपन्यांप्रमाणेच भारतीय कंपन्यांनाही पोहोचते आहे. या दोन घडामोडी म्हणजे आर्थिक मंदीसदृश परिस्थिती आणि खनिज तेलांचे चढे दर. मंदीचा थेट परिणाम विमानवाऱ्यांवर होतो आणि इंधन महागल्यामुळे त्या खर्चीकही बनत जातात. भारतासारख्या देशात विमान कंपन्यांवर विविध प्रकारच्या करांचाही भार येतो. अशा वेळी योग्य नियोजन आणि काटकसर होत नसेल, तर कंपनी डबघाईला जाण्यास वेळ लागत नाही हे किंगफिशर एअरवेज, जेट एअरवेज आणि एअर इंडिया या कंपन्यांच्या उदाहरणांवरून दिसून आले आहे. या सगळ्या कंपन्यांपेक्षा अधिक कार्यक्षम आणि जबाबदार ठरलेल्या आणि म्हणून यशस्वी बनलेल्या इंडिगो एअरला नवीनच समस्येने ग्रासले आहे. या कंपनीचे दोन मुख्य प्रवर्तक- राहुल भाटिया आणि राकेश गंगवाल यांच्यात काही मुद्दय़ांवर गंभीर मतभेद असल्याचे वृत्त गेल्या काही दिवसांत प्रसृत झाले. हे दोघे इंडिगोचे सहसंस्थापकही आहेत. भाटिया आणि गंगवाल यांच्याकडे इंडिगोचे अनुक्रमे ३८ आणि ३७ टक्के भागभांडवल आहे. दोघांनाही विमान वाहतूक क्षेत्रातील व्यापक अनुभव आहे. इंडिगो कंपनी भारतात व्यवस्थित स्थिरावली असून, आता परदेशांतही विस्तारण्याची या कंपनीची महत्त्वाकांक्षा आहे. यासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ परदेशस्थ भारतीय आणि परदेशी नागरिकांतून भरती करण्यावरून दोघांमध्ये मतभेद आहेत. यांतील एकाला हा विस्तार वेगाने व्हावा असे वाटते, तर दुसऱ्याने अधिक सावध पवित्रा अंगीकारलेला आहे. मतभेद विकोपाला जाऊन त्यांचा कंपनीच्या परिचालनावर परिणाम होऊ नये, यासाठी दोघेही स्वतंत्र वकिलांचा सल्ला घेत आहेत. इंडिगो कंपनीचा सध्या स्थानिक बाजारपेठेत ४७ टक्के हिस्सा आहे. २२५ विमाने, दररोज १४०० उड्डाणे, देशांतर्गत ५४ आणि परदेशात १७ गंतव्यस्थाने ही इंडिगोची सध्याची आकडेवारी. ए-३२० निओचे सर्वात मोठे खरेदीदार असाही त्यांचा लौकिक आहे. जेट एअरवेजची सगळी आणि एअर इंडियाची काही विमाने जमिनीवर स्थिरावलेली असताना, या परिस्थितीचा फायदा इंडिगोने उचलला पाहिजे, असा एक प्रवाह आहे. तसे करण्यासाठी कंपनीतील सर्वानी एकदिलाने आणि एकाच ध्येयाने काम करणे गरजेचे असते. उच्च व्यवस्थापनात मतैक्य असणे अत्यावश्यक ठरते. इंडिगोच्या बाबतीत त्याचा अभाव दिसतो. कॉकपिटमध्येच मतभेद असल्यामुळे विमानाचा प्रवास ईप्सित स्थळी आणि सुरक्षित होणार का, याविषयी शंका उपस्थित होते. प्राप्त परिस्थितीला ती अधिकच काळवंडणारी ठरते.

First Published on May 17, 2019 12:47 am

Web Title: indigo airlines crisis indigo crisis crisis in indigo