18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

‘समूळ सुधारणां’ची स्वस्ताई

‘दोनच कार्यकालावधी’ अशी अट असूनही किमान २०२४ पर्यंत सत्ता त्यांच्याचकडे एकवटायची.

लोकसत्ता टीम | Updated: April 18, 2017 12:34 AM

तुर्कानी आता सार्वमताद्वारे ठरवले आहे की, आपल्या देशाला पंतप्रधानपद नकोच. त्याऐवजी आपले लाडके आणि कणखर राष्ट्राध्यक्ष रेसेप तयीप एदरेगन यांच्याकडे सर्वाधिकार द्यायचे. ‘दोनच कार्यकालावधी’ अशी अट असूनही किमान २०२४ पर्यंत सत्ता त्यांच्याचकडे एकवटायची. राष्ट्राध्यक्षच दोघातिघा मदतनीस उपराष्ट्राध्यक्षांची आणि काही मंत्र्यांची नेमणूक करतील, राष्ट्राध्यक्षच देशाच्या अर्थसंकल्पावर अखेरचा हात फिरवतील आणि कायदेमंडळात ५५० ऐवजी ६०० लोकप्रतिनिधी अशी संख्यावाढ होणार असली तरी ती फक्त सोयीपुरतीच असेल.. म्हणजे मंत्र्यांपासून प्रशासनातल्या कुणाचीही चौकशी करण्याचा प्रस्तावसुद्धा कायदेमंडळात आणता येणार नाही. हा कौल ‘टर्की’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुर्कस्तानच्या जनसामान्यांनी रविवारी दिला, तो त्यांच्या देशाच्या भल्यासाठीच. अध्यक्ष एदरेगन यांनीच तुर्की राज्यघटनेत समूळ सुधारणा करणारा हा दुरुस्ती-प्रस्ताव मांडला होता आणि ‘मुख्य भाग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशांत राहणाऱ्यांनी त्यावर होकारच दिला. अपवाद सीमावर्ती भागांचा. सीमेलगतच्या भागात कुर्द वंशीयांच्या कत्तली सुरू आहेत. आम्ही कत्तली करणारच, कारण ज्यांच्या कत्तली आरंभल्या ते सारे राष्ट्रद्रोहीच आहेत, असे एदरेगन आणि त्यांचे समर्थक मानतात. उरले ते राष्ट्रवादी. तो राष्ट्रवाद तर एदरेगन यांच्याचमुळे फुलला, वृद्धिंगत झाला. राष्ट्रवाद म्हणजे काय याबद्दल बुद्धिवंत लोक काहीही सांगोत. आम्ही म्हणू तोच राष्ट्रवाद, इतकी सोपी व्याख्या. एदरेगन यांनी तर देशाबाहेरच्याही बुद्धिवंतांना ‘तथाकथित’ वगैरे संबोधून जागा दाखवून दिली आहेच. कोणत्याही हुकूमशाहीत स्वकल्पित आणि स्वकेंद्री राष्ट्रवाद, प्रगतीची स्वप्ने केवळ नेत्यामुळेच साकार होण्याची आकांक्षा, कोणत्याही विरोधाला त्या आकांक्षेतले विघ्न मानण्याची प्रवृत्ती, विघ्नकारी ठरणाऱ्या संभाव्य शत्रूंचा नायनाट आणि बुद्धिवंतांचा धिक्कार यासोबतच ‘समूळ सुधारणा’ किंवा आपल्याकडे ज्याला ‘मास्टरस्ट्रोक’ म्हणण्याची पद्धत आहे तसे काही तरी अपेक्षित असतेच. ती समूळ सुधारणांची पायरी आता एदरेगन यांनी गाठली आहे. देशाचा बराच भाग युरोप खंडात असूनसुद्धा पाश्चात्त्य प्रबोधनवादी कल्पनांच्या आहारी आपला देश गेलेला नाही, हे दाखवून देण्याची सर्वोच्च संधीच यातून एदरेगन यांनी साधली आहे. ती संधी साधणे त्यांना जर जमले नसते, जर लोक त्यांच्याबाबत इतके सकारात्मक नसते, तर मात्र एदरेगन यांना ‘कुर्द फुटीरतावादाचा प्रश्न चर्चेने सोडवू’, ‘जागृती करून सुधारणा घडवू’ अशी भाषणे तरी करावीच लागली असती. तशी वक्तव्ये करून, स्वत:ची उदारमतवादी प्रतिमा उभारून लोक गाफील झाल्यानंतरच आपला कार्यभाग साधायचा, असा द्राविडी प्राणायाम एदरेगन यांना करावा लागला असता. तो करावा लागला नाही. कारण ५१.४ टक्के तुर्काकडे असा गुण आहे, की ज्याला पाश्चात्त्य राज्यशास्त्रज्ञ ‘आळशी राष्ट्रवाद’ म्हणतात. कामाच्या वेळी काम आणि मौजमजेच्या वेळी मौजमजा करायची, छान जगताजगता संस्कृती जपायची, तांत्रिक प्रगती झाली असेल तर व्हॉट्सअ‍ॅपसारख्या समाजमाध्यमांतून आणि नसेल तर प्रत्यक्ष सहभागातून आपापल्या देशाच्या राष्ट्रवादाचा उदोउदो करायचा आणि मुख्य म्हणजे एकही चूक आपली असूच शकत नाही असे मानून सर्व दोषारोप इतरेजनांवरच करायचे, ही आळशी राष्ट्रवादाची लक्षणे. पाश्चात्त्य राज्यशास्त्रज्ञ ती ट्रम्प यांच्या अमेरिकेत शोधतात, ब्रिटनमध्ये ‘ब्रेग्झिट’च्या बाजूने गेलेला कौलही त्यांना तसाच वाटतो; पण त्यापलीकडे काही विश्लेषण असते की नाही? लोकांना राजकीय पर्यायांची स्वस्ताई हवी आहे. सुधारणांसाठी आत्मपरीक्षण आणि प्रामाणिक उपाययोजना हा मार्ग लांबचा आणि महाग वाटतो आहे. तुर्काना उदाहरणार्थ कुर्दाशी चर्चा-संवाद करत राहणे- म्हणजेच शत्रू नष्ट करण्याऐवजी शत्रुत्वाचे कारण नष्ट करणे- हा पर्याय महाग वाटला. त्याऐवजी त्यांनी तात्पुरती स्वस्ताई शोधून त्यालाच ‘समूळ’ म्हणत स्वत:ला फसवून घेणे स्वीकारले.

First Published on April 18, 2017 12:34 am

Web Title: issues in turkish constitution