भूलोकीच्या वैकुंठी म्हणजे पंढरपुरी पोहोचण्याची आस लागलेला पालखी सोहळा हे महाराष्ट्राचे तेराव्या शतकापासूनचे सांस्कृतिक आणि सामाजिक संचित आहे. हा सोहळा म्हणजे समाजातील विविध गटातटांतील आणि जातिधर्मातील भेदाभेद विसरणारे ठिकाण. करोनाच्या महासंकटामुळे यंदाही देहू-आळंदी ते पंढरपूर हा वारीचा ‘सोहळा’ समग्रपणे साजरा होणार नाही. याच संकटकाळात देशात कुंभमेळ्याला परवानगी मिळाली, विधानसभा निवडणुकांमध्ये प्रचंड जनसमुदायाच्या जाहीर सभांनाही मान्यता मिळाली. त्याचे जे परिणाम आता दिसू लागले आहेत, ते पाहता, महाराष्ट्रातील भक्तिसंप्रदायाने आपले समाजाशी असलेले सौहार्द टिकवण्यासाठी कोणत्याही प्रकारचा गोंधळ न घालता, लाखोंच्या संख्येने सामील होणाऱ्या वारकऱ्यांच्या वारीबाबत जो कमालीचा समंजसपणा दाखवला, तो अतिशय अभिनंदनीय म्हटला पाहिजे. या भक्तिसंप्रदायाने जे समाजभान दिले, त्याचा हा अपूर्व आविष्कार आहे. समाजातील समता, बंधुत्व आणि चैतन्य यांची जोपासना करणाऱ्या या शेकडो वर्षांच्या परंपरेने आपल्या मनी ओथंबून असलेले विठ्ठलप्रेम ज्या समतोलाने व्यक्त केले, त्यामुळे संतांच्या या अनेक शतकांच्या दीर्घ आणि अखंडित परंपरेने महाराष्ट्राच्या वैचारिक आणि सामाजिक जडणघडणीत काय योगदान दिले, याचा प्रत्यक्ष पुरावाच मिळाला. यंदाच्या वारीच्या काळात करोनाचा प्रभाव ओसरत आहे. तरीही सातारा आणि सोलापूर या दोन जिल्ह्य़ांमधील त्याचा प्रभाव तेवढाच जोर धरून आहे. त्यामुळे किमान उपस्थितीत आणि पायी न जाता वाहनाने पंढरपूपर्यंत संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या पालख्या नेण्याचा निर्णय घेणे क्रमप्राप्त होते. मागील वर्षीही याबाबत चर्चेनेच प्रश्न सोडवला गेला आणि यंदाही त्याची पुनरुक्ती झाली. आळंदी आणि देहू येथून निघणारी ही वारी मजल दरमजल करीत पंढरपूपर्यंत पोहोचते. मात्र त्यामुळे सारा समाज भक्तिरसात न्हाऊन निघतो. वर्षभरात आलेल्या अनेक संकटांना, चिंतांना विसरायला लावणाऱ्या या वारीमुळे आयुष्यातील मळभ दूर होण्याचे आश्वासन मिळते आणि त्याने वारीत सामील झालेल्या प्रत्येकाला कैवल्याची जाणीवही होते. यंदा निदान वाखरी ते पंढरपूर एवढा मार्ग पायी चालत जाण्यास शासनाने परवानगी दिली आहे. परंपरेनुसार आषाढी एकादशीनंतर पौर्णिमेला काला केल्यानंतरच पालखीच्या परतीचा प्रवास सुरू होतो. मागील वर्षी पंढरपुरातील करोना स्थिती अवघड असल्याने पालख्यांना लगेचच परतावे लागले होते. यंदा हा काल्याचा उत्सवही पार पडणार आहे. या सगळ्याबाबत वारकऱ्यांच्या मनात एक हुरहुर असणे अगदीच स्वाभाविक. विठ्ठलभेटीची आस पुरी होणार नाही, या कल्पनेने ते किंचित दु:खीही होतील. परंतु आक्रस्ताळेपणा न करता चित्तवृत्ती शांत ठेवूनच जगाकडे पाहण्याची दृष्टी भक्तिपरंपरेने दिली. महाराष्ट्राने सामाजिक क्षेत्रात या देशाचे जे पुढारपण केले, त्यासाठी संतांच्या परंपरेचे प्रबोधनाचे कार्यच कारणीभूत ठरले. या करकरीत वैचारिक परंपरेमुळेच आधुनिक विचारांकडेही अभ्यासपूर्णतेने पाहण्याची वृत्ती या प्रांतात जोपासली गेली. ‘येथे जातिकुळ अप्रमाण, हे आवघेचि अकारण’ असे म्हणणारे संत ज्ञानेश्वर आणि ‘संताचिया गावी प्रेमाचा सुकाळ, नाही तळमळ, दु:ख लेश’ असे सांगणारे संत तुकाराम, यांनी या समाजाला जगण्याचा नवा मंत्र दिला. ज्या वारकरी संप्रदायाने महाराष्ट्रातील राजकीय पुनरुत्थानाला आधार दिला, त्याच संप्रदायातून निर्माण झालेल्या भागवतधर्माने समाजातील एकीच्या प्रयत्नांना बळ दिले. भक्ती निर्हेतुक असली, तरी त्यामागे जगण्याचे एक विशाल तत्त्वज्ञान सामावलेले असते, याचे भान या परंपरेने सामान्यांना दिले. हे भान आलेल्या प्रगत विचारांच्या या समाजाने मनाला मुरड घालत यंदाही पालखी सोहळ्यात सहभागी न होण्यास मान्यता दिली, यातच त्याचे मोठेपण दिसून येते.

uran, fishers, financial crisis
मत्स्यसंपदा घटल्याने लाखो मच्छीमारांवर आर्थिक संकट
apmc market, license issue, nashik district
नाशिक : बाजार समित्यांमध्ये उत्तर भारतातील व्यापाऱ्यांना परवाने देण्याचा विचार
Tipeshwar Sanctuary
VIDEO : टिपेश्वर अभयारण्यात वाघच नाही, तर रानकुत्र्यांसह ‘या’ वन्यप्राण्यांना पर्यटकांची पसंती
chhattisgarh, bangaram devi, tribal tradition
आदिवासींमध्ये टाकून दिलं जातं नापास झालेल्या देवांना… आपण सत्ताधाऱ्यांची निदान उलटतपासणी तरी करायला काय हरकत आहे?