यंदाच्या दहावीच्या निकालात सुमारे दोन टक्क्यांनी घट होणे, हे सुचिन्ह मानावे, अशी स्थिती नाही. याचे कारण ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत यंदाही वाढच झाली आहे. हुशारी वाढली, असा याचा अर्थ काढणे मात्र गैर आहे. राज्यातील १६ लाख विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची पायरी म्हणून दहावीचे महत्त्व अबाधित आहे. या परीक्षेतील गुणांच्या आधारे चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळणे शक्य होते आणि शाखा निवडीसाठीही त्याचा उपयोग होतो. मात्र त्यानंतर प्रत्येक पायरीवर प्रवेशपूर्व परीक्षेची शर्यत पार करावी लागणार असल्याने, दहावीतील गुणांना नंतरच्या आयुष्यात फारसे महत्त्व उरत नाही. यंदा परीक्षेस बसलेल्या १६ लाखांपैकी १४ लाख ३४ हजार उत्तीर्ण झाले आहेत. यापैकी विशेष श्रेणी मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ७० हजाराने वाढली आहे, तर विशेष गुण आणि ग्रेस गुण मिळवून ९० विद्यार्थ्यांना अगदी काठावर उत्तीर्ण होता आले आहे. याचा अर्थ एकूण उत्तीर्ण झालेल्यांपैकी ३५ ते ९० टक्के मिळवलेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ९६.५ टक्के एवढी आहे. एवढय़ा संख्येने कागदोपत्री उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याची चिंता सध्याची शिक्षणव्यवस्था गांभीर्याने करत नाही. या विद्यार्थ्यांना वैद्यकीय वा अभियांत्रिकीचे मार्ग पैशाशिवाय खुले होत नाहीत. आता एकच सीईटी लागू झाल्याने, तेही बंद झाले आहेत. म्हणजे त्यांना विज्ञान, वाणिज्य वा कला शाखेतून पदवी घेणे, एवढाच मार्ग उरतो. या तिन्ही विद्याशाखांच्या पदवीस सध्याच्या बाजारात काही किंमत नाही. त्यामुळे पदवीबरोबरच विविध प्रकारची कौशल्ये देणाऱ्या अभ्यासक्रमांची आवश्यकता आहे. याबद्दलची माहिती शाळेपासूनच देऊन, विद्यार्थ्यांना जागे करणे महत्त्वाचे आहे. यंदा प्रथम राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची कल चाचणी घेण्यात आली. तिचा अहवाल निकालपत्रासह दिला जाणार आहे. शिक्षण विभागाने सुरू केलेला हा उपक्रम अतिशय महत्त्वाचा व उपयुक्त आहे, यात शंका नाही. मात्र या अहवालाचा उपयोग किती पालक करतात, हे पाहायला हवे. नव्वद टक्क्यांहून अधिक गुण मिळालेले विद्यार्थी आनंदात असणे स्वाभाविक असले, तरीही हे गुण पुढील परीक्षांमध्ये टिकवणे ही फार मोठी गोष्ट असते, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे. असे गुण देताना परीक्षा मंडळानेही सढळपणा दाखवणे अनुचित ठरायला हवे. परीक्षा नावाच्या प्रकारास नववीपर्यंत फाटा दिल्याने, केवळ एक वर्षांच्या अनुभवावर सारे आयुष्य टांगणीला लागल्यासारखे राज्यातील लाखो विद्यार्थी त्याची तयारी करीत राहतात. मग क्लास, गाईड्स यांसारख्या प्रकारांना अनावश्यक महत्त्व प्राप्त होते. पाठांतर आणि विषय समजणे या दोन वेगळय़ा बाबी असतात. त्यामुळे दहावीच्या परीक्षेतील फोलपणा नंतरच्या आयुष्यात जेव्हा लक्षात येतो, तेव्हा वेळ पुढे गेलेली असते. परीक्षेतील सोपेपणा विद्यार्थ्यांच्या प्रचंड संख्येमुळे येतो. बुद्धय़ांकाच्या लघुतम साधारण विभाजकावर आधारित काढलेल्या प्रश्नपत्रिका व तपासणीची पद्धत यामुळे या परीक्षेत तंत्राला अधिक प्राधान्य मिळते. ही पद्धत येत्या काही काळात बदलणे क्रमप्राप्त ठरणार आहे. माध्यमिक शालान्त परीक्षेचे गांभीर्य अबाधित राहण्यासाठी विचारपूर्वक प्रयत्नांची गरज आहे. अभ्यासक्रम ठरवणे, ही यातील सर्वात काळजीपूर्वक करण्याची गोष्ट. काय आणि किती शिकवायचे, याबद्दल सध्या जागतिक स्तरावर ज्या चर्चा घडत आहेत, त्याचा मागमूसही आपल्या शिक्षण पद्धतीला नाही, ही खरी चिंतेची बाब आहे. दहावीत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना, त्यांच्या भविष्याच्या वाटचालीस शुभेच्छा देणे म्हणूनच आवश्यक आहे.

rte marathi news, rte latest marathi news
आरटीई अंतर्गत बदलांमुळे विद्यार्थ्यांच्या चौथी, सातवीनंतरच्या शिक्षणाचे काय होणार?
Telangana school attacked over saffron clothing row
विद्यार्थ्यांच्या भगव्या कपड्यांवर मुख्याध्यापकांचा आक्षेप; संतप्त जमावाकडून शाळेची तोडफोड, गुन्हा दाखल
Haryana school bus accident,
VIDEO : शाळेच्या बसला भीषण अपघात; पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू
student gave secret message to math teacher
विद्यार्थ्यांनी घेतली गणिताच्या शिक्षकाची परीक्षा! विद्यार्थ्यांची ‘ही’ युक्ती पाहून शिक्षक झाले थक्क! पाहा Video…