देशातील एक अतिशय महत्त्वाचा रेल्वे मार्ग पंधरवडय़ासाठी बंद ठेवला जातो आणि त्याची कोणतीही पूर्वकल्पना प्रवाशांना दिली जात नाही, हे रेल्वे खात्याच्या कार्यक्षमतेविषयी निश्चितच प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. मुंबई आणि पुणे या महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या शहरांदरम्यानच्या रेल्वे मार्गावरील दुरुस्तीच्या कामांसाठी किमान १५ दिवस त्यावरील वाहतूक दिवसातील सहा-आठ तास बंद ठेवल्याने प्रवाशांना किती हालअपेष्टांना सामोरे जावे लागेल, याची पुसटशी कल्पनाही रेल्वे खात्याला नसावी. अन्यथा, तीन महिन्यांपूर्वी आरक्षित केलेली तिकिटे एका फटकाऱ्याने बाद करण्याची किमया या खात्याला साधली नसती. मुंबईपर्यंत जाऊन तेथून पुढील प्रवासासाठी आरक्षण केलेल्या सगळ्या प्रवाशांना आता अगदी ऐनवेळी आपला सगळा प्रवास रामभरोसे करावा लागणार आहे, याचे कारण मार्ग बंद ठेवताना रेल्वेने वाहतुकीच्या अन्य यंत्रणांशी संपर्क साधलेला नाही. म्हणजे रेल्वे नाही तर निदान राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या बसेस तरी पुरेशा प्रमाणात उपलब्ध असायला हव्यात, परंतु तेही घडलेले नाही. इतका ढिसाळ कारभार आणि अन्नदात्या प्रवाशांबद्दल इतकी बेफिकिरी असूनही, देशातील सर्वात स्वस्त प्रवासी साधन असलेल्या रेल्वे खात्याला आज सक्षम पर्याय नाही. परिवहन मंडळाच्या बसगाडय़ा हा पर्याय देऊ शकत नाहीत, कारण हे मंडळ आधीच रस्त्यांच्या खड्डय़ांमध्ये रुतून बसले आहे. त्यास संजीवनी प्राप्त करून देण्यासाठी म्हणून जे जे प्रयत्न होत आहेत, ते सारे फसतच चालले आहेत. टॅक्सी आणि अन्य खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांचे तर अशाच वेळी फावते आणि त्यामुळे प्रवाशांच्या मनस्तापात कमालीची भर पडते. गेल्या काही दिवसांत मुंबई-पुणे या लोहमार्गावर दोन वेळा मालगाडय़ा घसरण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे रुळांखालील कपलिंग काढून बदलण्याचे ठरले. त्याबरोबरच या मार्गावर सातत्याने दरड कोसळण्याच्या घटनाही घडत आहेत. त्यासाठीची डागडुजी आणि  सिग्नल यंत्रणेतील दुरुस्ती हीही कामे येत्या पंधरा दिवसांत करण्यात येणार असल्याचे रेल्वे खात्याने कळवले आहे. हे काम सलग काही दिवस करण्याऐवजी दर शनिवार-रविवार करता आले असते. खरेतर पावसाळ्यापूर्वी जी अत्यावश्यक कामे केली जातात, त्याच वेळी या गोष्टी निदर्शनास कशा आल्या नाहीत, असा प्रश्न पडतो. एवढेच काय, तर दोनच महिन्यांपूर्वी या मार्गावरील अनेक कामांसाठी रेल्वेने सहा कोटी रुपयांचा खर्चही केला होता. हा खर्च करूनही दुरुस्ती झाली नाही, म्हणजे हा खर्च ‘केवळ कागदावरच’ झाला किंवा दुरुस्तीचे कामही निकृष्ट दर्जाचे होते. खंडाळ्याच्या घाटातील रस्ता वाहतूक दिवसेंदिवस कटकटीची होत गेल्याने जो द्रुतमार्ग तयार करण्यात आला, त्यामुळे सुरुवातीच्या काळात मुंबई-पुणे हा प्रवास सुखद वाटण्याइतका चांगला होता. गेल्या दोन दशकांत या द्रुतमार्गाची जी वाताहत झाली आहे, त्याला केवळ प्रशासकीय सुस्तपणा कारणीभूत आहे. तीन पदरी मार्गावर मोठय़ा वाहनांची जी अरेरावी चालते, त्यास आळा घालण्याची प्रशासनाची तयारीच नाही. त्यामुळे २४ तास हा रस्ता वाहतूक खोळंब्याने गजबजलेला असतो. वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करण्याचीही तयारी नसल्याने या महामार्गावर सर्व मोठी वाहने अक्षरश: मोकाटपणे वावरत असतात. रेल्वे मार्ग बंद राहणार असल्याने रस्ते वाहतुकीला पर्यायच उरणार नाही आणि आधीच समस्याग्रस्त असलेला हा महामार्ग म्हणजे मृत्यूचा साक्षात अवतार धारण करेल. प्रवाशांना किमान महिनाभराची सूचना देण्याचीही गरज रेल्वे खात्यास वाटू नये, हे निर्लज्जपणाचे झाले. या मार्गावरून रोज जाणाऱ्या हजारो प्रवाशांना अडचणीत टाकून रेल्वेने आपली जबाबदारी झटकली आहे.