प्रतिस्पध्र्याना उद्देशून शेरेबाजी, पंचांशी हुज्जत, रॅकेट फोडणे याऐवजी बावनकशी दर्जा राखण्याला प्राधान्य असेल तर टेनिससारख्या दमछाक करणाऱ्या खेळातही वय ही सबब न राहता निव्वळ आकडा ठरतो. खेळ सभ्यपणेच खेळण्यासाठी मुळात खेळावर प्रेम हवे. आत्मविश्वास हवाच, पण खेळातल्या खाचाखोचा माहीत हव्यात. त्यातली नजाकत काय असते हे मनोमन उमगायला हवे. या आदर्शवत अपेक्षा टेनिसमध्ये सोडाच, पण कोणत्याही क्षेत्रात खऱ्या ठरतील याची शक्यता मुळात कमी. रॉजर फेडररचे कौतुक करायचे, ते यासाठी! दीड डझन ग्रॅण्ड स्लॅम जेतेपदे, शंभराहून अधिक अन्य स्पर्धाची जेतेपदे, ऑलिम्पिक सुवर्णपदक, सवरेत्कृष्ट खेळाडू म्हणून पुरस्कार, क्रमवारीतील अव्वल स्थान असे टेनिसविश्वातले  सगळे मानसन्मान कारकीर्दीच्या पोतडीत असतानाही पस्तिशीतला रॉजर फेडरर ‘जिंकण्यासारखं सगळं जिंकलं आहे. आता निस्सीम आनंदासाठी खेळतोय,’ असे सांगत होता, तेव्हा खेळांचा बाजारच अंगवळणी पडलेले लोक अविश्वासानेच पाहत राहिले आणि यामागे आर्थिक गणित असावे की प्रसिद्धीचे, एवढीच चर्चा करीत राहिले. तरीही, फेडररला आजही स्वत:ला सिद्ध करावेसे वाटत होते. गेल्या वर्षी मात्र जबर धक्का बसला. गुडघ्यांनीच असहकार पुकारला. दुखण्याची तीव्रता एवढी की फेडरर निम्मे वर्ष खेळूच शकला नाही. कारकीर्दीत मोठय़ा दुखापतींना दूर ठेवणाऱ्या फेडररच्या गुडघ्यांवर शस्त्रक्रिया करावी लागली. एखादा मैत्रीपूर्ण सामना आणि निरोपाचा नारळ इतकी तयारी टीकाकारांनी केली. फेडररचे मनसुबे वेगळे होते. प्रशिक्षक सहयोगी, वैैद्यकीय तज्ज्ञ आणि कुटुंबीयांच्या मदतीने शिस्तबद्ध कार्यक्रमच आखला. प्रायोजकांच्या दबावापोटी पुनरागमनाची घाई केली नाही. या काळात मी अमुक स्पर्धा जिंकून दाखवीन, अशी एकही बढायाखोर मुलाखत दिली नाही. गुडघे निवळत असताना पोट सुटणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली. स्वत:च्या खेळाचा, डावपेचांचा सखोल अभ्यास केला. वाढीव आकाराचा रॅकेटरूपी कुंचला फेडररने ताफ्यात समाविष्ट केला. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचे व्यासपीठ पक्के केले. नोव्हाक जोकोव्हिच आणि अ‍ॅण्डी मरे हे ऐनभरात असणारे मोहरे बाजूला झाल्याने फेडररला जेतेपद आवाक्यात आले. केई निशिकोरी आणि स्टॅन वॉवरिन्का या आव्हानांना चीतपट केल्यावर फेडररसमोर जेतेपदासाठी राफेल नदाल उभा ठाकला. नदालची देहबोलीच प्रतिस्पध्र्याचे मनोबल खच्ची करते. अफाट ऊर्जा आणि अशक्य परिस्थितीतून पुनरागमनाची हातोटी अशा शक्तिशाली नदालला थोपवण्यासाठी फेडररने युक्तीचे डावपेच आखले. ‘सव्‍‌र्हिस’ टेनिसचा प्राण आहे. हा प्राण फेडररने घोटीव सातत्याने जपला. वाढत्या वयानुसार ऊर्जा कमी होत जाते हे ओळखून फेडररने छोटय़ा रॅलींवर भर दिला. पल्लेदार फटके खेळायला नदालला वेळ आणि कोन मिळू नये या दृष्टीने झपाटय़ाने नेटजवळ येत चकवण्याचे तंत्रही अंगीकारले. बेसलाइनवरून किंचित आधी फटका खेळत त्याने नदालला विचलित केले आणि योग्य वेळी ठेवणीतला एकहाती बॅकहॅण्ड आणि बाणासारखा जाणाऱ्या क्रॉसकोर्टचा खुबीने उपयोग केला. नदालचे वलय बाजूला ठेवून चेंडूच्या गुणवत्तेनुसार फटके खेळण्याची प्रशिक्षक इव्हान ल्युबिकिक यांची नीती फेडररच्या कामी आली. या सगळ्याला पुरून उरत नदालने जेतेपदाच्या दिशेने पाऊल टाकले होते. मात्र त्याच वेळी नियमांत तरतूद असलेला ‘मेडिकल टाइमआऊट’ घेत फेडररने नदालची एकाग्रता भंग केली. आवश्यक विश्रांती आणि उपचार यामुळे नवी ऊर्जा मिळालेल्या फेडररने १८व्या ग्रॅण्ड स्लॅम जेतेपदासह रचलेला इतिहास सर्वासमोर आहेच. त्यातून दिसतो तो, आपल्या क्षेत्रातले बारकावे नियमांसह माहीत असणाऱ्या एका प्रौढाने जपलेला सार्थ स्वाभिमान. खेळ ताकदीवर नव्हे, नजाकत आणि युक्तीवरही जिंकता येतात, याची आठवण फेडररचा विजय करून देतो. ती आठवण आज गरजेचीच होती.