23 November 2017

News Flash

इलाज गांभीर्याने हवा..

नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना झालेली मारहाण

लोकसत्ता टीम | Updated: March 21, 2017 3:15 AM

एका रुग्णाचे अपघाती निधन झाल्यानंतर धुळ्याच्या सवरेपचार रुग्णालयातील डॉक्टरवर झालेला हल्ला, नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना झालेली मारहाण, पाठोपाठ मुंबईच्या शीव रुग्णालयातील डॉक्टरांनाही मारहाणीनंतर राज्यात सर्वत्र डॉक्टरांनी आंदोलन सुरू केले आहे. धुळ्यात अपघाताग्रस्त जखमीस रुग्णालयात दाखल केल्यानंतर मेंदूचा सीटीस्कॅन बाहेरून करविण्यास सांगण्यात आल्याने चिडलेल्या नातेवाइकांनी डॉ. मामुणकर यांना बेदम मारहाण केली. असे कृत्य हे केव्हाही निषेधार्हच असते आणि त्याचे समर्थन करणेही चुकीचेच. परंतु अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत आहेत. रुग्णांचे नातेवाईक कायदा हातात घेऊन थेट मारहाण वा जाळपोळीपर्यंत जातात आणि त्याने फक्त दहशतच निर्माण होते. त्याचा परिणाम त्या रुग्णास उत्तम वैद्यकीय सेवा मिळण्यात होतो का, याचा विचार करण्याएवढा वेळ कुणाकडे नसतो. त्यामुळेच अशा घटना थांबण्यासाठी डॉक्टर आणि नागरिक या दोघांनीही त्याचे मूळ कारण समजून घेणे आवश्यक असते. आजपर्यंत केवळ आंदोलने आणि जाळपोळ किंवा हाणामारी यापलीकडे हा विचार पोहोचलेला दिसत मात्र नाही. समाजात डॉक्टर ही एक प्रतिष्ठेची व्यक्ती मानली जाण्याचा काळ केव्हाच ओसरला, याचे भान आता डॉक्टरांनीही ठेवायला हवे. डॉक्टर ‘पवित्र’ काम करत असतात, या समजास तडा गेला, तो डॉक्टरांकडून होणाऱ्या पिळवणुकीमुळे.  एमआरआयसारख्या महागडय़ा तपासण्या कारण नसताना करायला लावल्या जातात, असे बहुतेक वेळा रुग्णास वाटत असते. प्रत्येक वेळी ते खरेच असते, असे नाही. मात्र तरीही ‘कट प्रॅक्टिस’च्या चर्चाना अनेक उदाहरणांमुळे बळकटी मिळत असते. असे प्रकार सामान्यत: सरकारी किंवा सार्वजनिक रुग्णालयात अधिक घडतात. खासगी रुग्णालये किंवा डॉक्टर यांना कोणताही रुग्ण मरावा, असे कशाला वाटेल? रुग्णास त्रास होईल, असे वागल्याने त्याचा परिणाम थेट व्यवसायावरच होईल, एवढे न कळण्याएवढे डॉक्टर मूर्ख नसतात, हा प्रतिवाद तात्पुरता ग्राहय़ धरायचे ठरवले, तरीही सरकारी रुग्णालयांतील रुग्णांबद्दलची अनास्था या सगळय़ास कारणीभूत ठरते, हे लक्षात घ्यायला हवे. बहुतेक रुग्णालयांत मोठय़ा रुग्णसंख्येस पुरेल अशी यंत्रणा मात्र उपलब्ध नसते. दुर्लक्ष, विलंब, मानहानी ही या रुग्णालयांची आता ओळख झाली आहे. धुळय़ातील रुग्णालयातही मेंदूचे डॉक्टर जागेवर नसल्यामुळे बाहेरील डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला देण्यात आला. डॉक्टर जागेवर नसल्याने निवासी डॉक्टरांवरच ही रुग्णालये चालवण्याची एक सरकारी पद्धत गेल्या काही वर्षांत रुळली आहे. यातून साचत जाणाऱ्या जनक्षोभाचा फटका कित्येकदा खासगी रुग्णालयांना व डॉक्टरांनाही बसतो. रुग्णाच्या मृत्यूला डॉक्टरच कारणीभूत, असाही गैरसमज बहुतेकदा दिसतो. डॉक्टरांनी  रुग्ण व नातेवाइकांकडे पाहण्याची रीत बदलल्याशिवाय समाजात रुजलेल्या या भावना बदलणे शक्य होणार नाही. रुग्णांच्या नातेवाइकांनी कायदा हाती घेऊन आपला राग व्यक्त करणे हे तर मागासलेपणाचेच लक्षण. मात्र म्हणून संप, आंदोलने करून रुग्णसेवेचा दर्जा सुधारण्याची शक्यता नाही. शासनाने आपल्या रुग्णालयांची बिकट अवस्था सुधारण्यासाठी प्रयत्नच केले नाहीत, तर समाजातील गैरसमज दूर होण्याची सुतराम शक्यता नाही. पुरेशी औषधे नसणे, नर्स वा वॉर्डबॉयपासून ते डॉक्टरांपर्यंत सगळय़ांचे दुर्लक्ष, रुग्णांच्या नातेवाइकांसाठी सल्ला-यंत्रणा नसणे, कागदी घोडे नाचवण्यावर अधिक भर..  या गोष्टींवर  गांभीर्याने इलाज होत नाही, हेच तर या असंतोषामागील खरे कारण आहे.

 

First Published on March 21, 2017 3:15 am

Web Title: sawarepachar hospital doctor crime