‘ब्रेट कव्हानॉ हे अमेरिकेतले असे पहिले न्यायाधीश असतील, ज्यांचे नामांकन लोकप्रियता पूर्णपणे ढासळलेल्या एका राष्ट्राध्यक्षाने केले, ज्यांच्या नियुक्तीवर अर्ध्याहूनही कमी देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सिनेटरांनी शिक्कामोर्तब केले आणि ज्यांच्या नावाला देशातील बहुसंख्य जनतेचा विरोध होता..’ समाजमाध्यमांवरून झालेल्या या टीकेत तथ्यांश आहेच. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयावर सहयोगी न्यायाधीश म्हणून ब्रेट कव्हानॉ यांच्या अध्यक्षीय शिफारशीला अमेरिकी सिनेटने नुकतीच ५०-४८ अशा काठावरच्या बहुमताने मान्यता दिली. या अनुषंगाने अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बऱ्याचदा बेमुर्वतखोरपणे केलेल्या अनेक नियुक्त्यांच्या मालिकेत आणखी एक अध्याय जोडला गेला. अमेरिकेत अध्यक्ष, संसद किंवा काँग्रेस आणि सर्वोच्च न्यायालय ही तीन सर्वोच्च सत्ताकेंद्रे. प्रत्येकाविषयी अमेरिकी जनमानसात विशिष्ट अशी प्रतिमा असते. अमेरिकेत विशेषत: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जाहीरपणे स्वत:चा राजकीय कल व्यक्त करीत असतात. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयात रिपब्लिकनांचे प्राबल्य आहे की डेमोक्रॅट्सचे, यावरही चर्चा होतात. मात्र आजवर कव्हानॉ यांच्याइतका वादग्रस्त पाश्र्वभूमी असलेला सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश अमेरिकेने पाहिलेला नाही. कव्हानॉ यांनी महाविद्यालयीन काळात आपला लैंगिक छळ केला, असा आरोप, त्यांची नियुक्ती ट्रम्प यांनी जाहीर केल्यानंतर लगेचच ख्रिस्तिन ब्लेझी फोर्ड या महिलेने केला होता. काही दिवसांतच डेबोरा रामिरेझ आणि ज्युली स्वेटनिक यांनीही कव्हानॉ यांच्यावर याच स्वरूपाचे गंभीर आरोप केले. या आरोपांमुळे सिनेटच्या न्यायविषयक समितीने कव्हानॉ यांच्या नियुक्तीचे सोपस्कार पुढे ढकलले. समितीतर्फे आणि लैंगिक अत्याचारविषयक वकिलांमार्फत कव्हानॉ आणि फोर्ड यांची साक्ष झाली; पण फोर्ड यांच्या बाजूने सार्वत्रिक सहानुभूती आणि जनमत असले, तरी या भावनांची दखल सिनेट न्यायविषयक समिती, सिनेटमधील बहुसंख्याक रिपब्लिकन सिनेटर या विधिकर्त्यांनी घेतली नाही. सर्वोच्च न्यायालयासारख्या संवेदनशील संस्थेवर एखाद्या व्यक्तीची नियुक्ती करताना, तिची पाश्र्वभूमी तपासून पाहावी, वादग्रस्त काही बाहेर आल्यास त्याबाबत शहानिशा, चौकशी आणि खातरजमा करून घ्यावी असा संकेत आहे. ट्रम्प असे काही संकेत पाळणाऱ्यांतले नाहीत हे त्यांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे! उलट कव्हानॉ यांच्याविरोधात आरोप होऊ लागल्यानंतर, जनक्षोभ वाढू लागल्यानंतर ट्रम्प यांनी कव्हानॉ यांची तोंड फाटेस्तोवर स्तुती करण्याचा सपाटाच लावला. सिनेटमध्ये झालेले मतांचे ध्रुवीकरण अमेरिकेतील राजकारणाच्या कडवट ध्रुवीकरणाचेच निदर्शक आहे. कव्हानॉ प्रकरणाच्या निमित्ताने सत्तारूढ रिपब्लिकन पक्षासाठी त्यांच्या ट्रम्पोत्तर प्रतिमेत सुधार करण्याची सुवर्णसंधी चालून आली होती. तीदेखील या पक्षाने दवडल्यामुळे ट्रम्प खरोखर वाटतात त्यापेक्षाही रिपब्लिकन पक्षात सर्वशक्तिमान झाले की काय, अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे. तसे असल्यास पुढील अध्यक्षीय निवडणुकीसाठीदेखील पक्षांतर्गत संघर्षांत ट्रम्प हे बाजी मारणार ही चाहूल पक्षातीलच अनेकांना अस्वस्थ करणारी ठरते. सर्वाधिक तडा न्यायपालिकेच्या प्रतिमेला गेला आहे. सर्वोच्च न्यायालय यापुढे किती वेळा खऱ्या अर्थाने नि:पक्षपातीपणे काम करेल, याविषयी प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. ट्रम्प यांना सर्वत्र मित्र किंवा मिंधे यांनाच ‘पेरून’ ठेवण्याची वाईट सवय आहे. या सवयीतून आता न्यायालयही सुटलेले नाही. खुद्द कव्हानॉ यांनीही मध्यंतरी या प्रकाराबद्दल क्लिंटन दाम्पत्य आणि डेमोक्रॅट्सना जाहीररीत्या जबाबदार धरले होते. पक्षातीत पदावर नियुक्त झालेली व्यक्ती अशा प्रकारे विशिष्ट पक्षाकडे बोट दाखवीत असल्यास न्यायालयीन पक्षनिरपेक्षता ‘जगातल्या महान लोकशाहीत’देखील धोक्यात येऊ लागल्याचेच हे लक्षण मानावे लागेल.