‘आविष्कार सांस्कृतिक केंद्रा’चा मुक्काम असलेल्या माहीमच्या महापालिका शाळेत प्रायोगिक/ समांतर नाटकाचा प्रयोग असला, की सुलभाताई दरवाजाजवळच्या कोपऱ्यातील एका खुर्चीवर नेहमीच बसलेल्या दिसायच्या. वाटायचे, इतकी वर्षे त्या या रंगभूमीशी संबंधित आहेत. नाटकाचे प्रायोगिक ते व्यावसायिक विश्व, सिनेमा, मालिका असा चौफेर प्रवास त्यांनी आजवर केलेला आहे. ‘रंगायन’ ते ‘आविष्कार’ अशी उणीपुरी ४०-४५ वर्षे रंगभूमीवरचे अनेक उन्हाळे-पावसाळे त्यांनी अनुभवले आहेत आणि तरीही माहीमच्या शाळेच्या या कोंदट खुराडय़ातले नाटक पाहायला त्या आजही आवर्जून येतात. काय वाटत असेल त्यांना आता? ‘आविष्कार’ स्थापन करणाऱ्या मोजक्या मंडळींत विजय तेंडुलकर, अरविंद देशपांडे, अरुण काकडे, सुलभा देशपांडे ही मंडळी अग्रणी होती. ‘रंगायन’मधून बाहेर पडल्यावर आपल्या नाटय़ ऊर्मीना व्यासपीठ हवे म्हणून केवळ नाही, तर आपल्यासारख्याच प्रयोगेच्छुक समविचारी मंडळींना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी स्थापन झालेले हे सांस्कृतिक व्यासपीठ! त्यांचे एकेक आधारस्तंभ पुढे काळाच्या ओघात लोप पावत गेले. आता सुलभाताईही गेल्या. उरले आहेत एकाकीपणे लढणारे अरुण काकडेकाका! छबिलदास नाटय़ चळवळीचे व्यासपीठ सुलभाताईंच्या पुढाकारानेच प्रायोगिक मंडळींना उपलब्ध झाले होते. ते गेल्यावर माहीमच्या शाळेत ‘आविष्कार’ने मुक्काम हलवला. आज हेही छप्पर सरकारच्या ‘कृपे’ने जाण्याची वेळ आली आहे. आणि अशा वेळी काकडेकाकांमागे नैतिक पाठबळ उभे करू शकणाऱ्या सुलभाताईही गेल्या. प्रायोगिक रंगभूमीच्या अस्ताचे हे दुश्चिन्ह तर नव्हे ना? सुलभा देशपांडे यांना कलेचे बाळकडू घरातच मिळाले. शाळेत असतानाच ‘लग्नाची बेडी’मध्ये सुलभाताईंना अरुणाच्या भूमिकेसाठी विचारणा झाली आणि त्यांनी ती इतकी सफाईने केली, की त्यांच्याकडे नाटकवाल्यांचे लक्ष वेधले गेले. विशेषत: अरविंद देशपांडे यांचे. त्यांनी सुलभाताईंना ‘रंगायन’मध्ये आणले. पुढे ते दोघे परस्परांचे आयुष्यभराचे जोडीदार बनले. अरविंद देशपांडे यांच्याच दिग्दर्शनाखालचे ‘शांतता! कोर्ट चालू आहे’ हे तेंडुलकरांचे नाटक सुलभाताईंच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला चार चाँद लावून गेले. ‘सुलभाताई म्हणजेच बेणारेबाई’ हे समीकरण राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचले. शंभू मित्रांनीही सुलभाताईंच्या बेणारेबाईंची मुक्तकंठाने प्रशंसा केली होती. ‘सुलभा देशपांडे यांनी बेणारेला जो न्याय दिला, तो दुसऱ्या कोणत्याही अभिनेत्रीने साकारलेल्या बेणारेने दिलेला नाही,’ असे त्यांचे मत होते. मात्र बेणारेबाईंचे गाजलेले शेवटचे स्वगत सुलभाताईंना मान्य नव्हते. बेणारेला काय म्हणायचे आहे ते प्रेक्षकांना कशाला सांगायचे, असे त्यांचे म्हणणे होते. परंतु, नाटकाला पूर्णत्व येण्यासाठी ते गरजेचे आहे, असे अरविंद देशपांडे यांचे मत होते. सुलभाताईंना व्यावसायिक रंगभूमी फारशी मानवली नाही. कलाकाराने उत्स्फूर्त ऊर्मी आणि भूमिकेचे विविध कंगोरे व्यक्त करणारे हिशेबीपण यांचा समन्वय साधायला हवा, असे सुलभाताईंना वाटे. जोवर कलाकार स्वत:ची भूमिका ‘एन्जॉय’ करत नाही तोवर प्रेक्षकांनाही तो तिच्याकडे घेऊन येऊ शकत नाही, असे त्यांचे म्हणणे होते. बाल रंगभूमीचा डोळस अभ्यास सुलभाताईंनी केला होता. देशोदेशीची बालनाटय़ चळवळ त्यांनी प्रत्यक्ष तिथे जाऊन अनुभवली होती. त्यातून बाल रंगभूमीसंबंधीची त्यांची धारणा विकसित झाली होती. त्यांच्या या समृद्ध अनुभवांचा ना शासनाने कधी उपयोग करून घेतला, ना मराठी रंगभूमीने. आज मराठी नाटकांना प्रेक्षक नाही, ही जी बोंब मारली जाते त्याला सशक्त बाल रंगभूमीची थंडावलेली चळवळ कारणीभूत आहे. पण लक्षात कोण घेतो?