१०० अब्ज डॉलर भांडवली बाजारमूल्य असलेल्या जगभरातील मोजक्या कंपन्यांमध्ये भारताच्या टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेस अर्थात टीसीएसचा समावेश झाला आहे. भांडवली बाजारमूल्य हे तरल असते. एकूण उलाढाल झालेले समभाग आणि विद्यमान शेअरमूल्य यांच्या गुणाकारातून ते स्थापित होते. त्यामुळे सोमवारी मुंबई शेअर बाजाराचे व्यवहार सुरू झाल्यानंतर काही काळ टीसीएसचे हे मूल्य १०० अब्ज अमेरिकी डॉलरच्या वर पोहोचले होते. दिवस संपेपर्यंत ते त्यापेक्षा थोडे खाली आले. अर्थात त्यामुळे टीसीएसच्या कामगिरीचे मूल्य कमी होत नाही. या कामगिरीमागे दीर्घकालीन सातत्य आणि सेंद्रिय वृद्धी (ऑरगॅनिक ग्रोथ) ही दोन प्रमुख कारणे आहेत. टीसीएसच्या शेअरमूल्यात वृद्धी होण्याचे तात्कालिक कारण म्हणजे चौथ्या तिमाहीतील कंपनीच्या कामगिरीची उत्साहवर्धक आकडेवारी. जानेवारी-मार्च या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात ४.५७ टक्क्यांची वाढ होऊन तो ६९२५ कोटींवर पोहोचला. सध्या बहुतेक उद्योग दैनिकांत/ मासिकांत/ बहुमाध्यमांत स्टार्ट-अपचा बोलबाला असतो. कोणती कंपनी एक अब्ज डॉलरचे मूल्यांकन आणि त्यासोबत साहसवित्त मिळवते आणि ‘युनिकॉर्न’ बनते, याचीच चर्चा अधिक होताना दिसते. फ्लिपकार्ट, पेटीएम, ओला या नव्या युगातील भारतीय यशोगाथा असून, सॉफ्टवेअर उद्योगातील मरगळीमुळे (मंदी नव्हे) इन्फोसिस, टीसीएस यांची कामगिरी झाकोळली जात असल्याचा सूर आळवला जात आहे. त्यात तथ्य नसल्याचे किमान टीसीएसने तरी दाखवून दिले. सॉफ्टवेअर सेवा क्षेत्रात गेली काही वर्षे टीसीएसपेक्षाही इन्फोसिस या कंपनीला अधिक वलय प्राप्त झाले होते. तरीही आज परिस्थिती अशी आहे की टीसीएसचे बाजारमूल्य हे इन्फोसिसच्या जवळपास अडीच पट झाले आहे. इन्फोसिसच्या तुलनेत टीसीएसने बदलत्या डिजिटल तंत्रज्ञानावर अधिक लक्ष केंद्रित केले, असे एक विश्लेषण सांगते. पण इन्फोसिससारखी कंपनी बदलत्या परिस्थितीचे भान ठेवून तांत्रिक बदलांना आत्मसात करण्यात मागे राहील हे फारसे संभवत नाही. याउलट निराळ्याच एका आघाडीवर टीसीएसकडे इन्फोसिसच्या तुलनेत अधिक स्थैर्य दिसून येते. तो घटक म्हणजे नेतृत्व! टीसीएसचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी फकीरचंद कोहली हे भारतीय सॉफ्टवेअर उद्योगाचे अध्वर्यू. त्यांच्यानंतर सुब्रह्मण्यम रामादोराय आणि नटराजन चंद्रशेखरन यांनी टीसीएसची धुरा समर्थपणे सांभाळली. सध्याचे सीईओ राजेश गोपीनाथन यांनीही त्यांच्या पूर्वसूरींच्या पावलावर पाऊल ठेवून टीसीएसची वाटचाल सुरू ठेवली आहे. फकीरचंद कोहली, रामादोराय, चंद्रशेखरन यांना अनेक वर्षे नेतृत्वाची आणि विस्तारण्याची संधी टाटा समूहाने दिली. याउलट इन्फोसिसमध्ये नारायण मूर्ती यांच्यानंतर कोणालाही म्हणावी तशी छाप पाडता आलेली नाही. टाटा समूह आणि टीसीएसचे आणखी एक प्रमुख वैशिष्टय़ म्हणजे, मानवी भांडवलावर असलेला विश्वास. डिजिटल विश्वातील अनेक बदलांमुळे आणि विशेषत अमेरिकेसारख्या देशांतील सरकारांच्या आक्रमक धोरणांमुळे जागतिक सॉफ्टवेअर उद्योगातील रोजगार घटू लागले आहेत. नफा कमावण्यासाठी आणि टिकून राहण्यासाठी नोकरकपातीचा मार्ग अनुसरला जात आहे. टीसीएसने मात्र याबाबतीत मध्यम मार्ग अनुसरलेला दिसतो. आता याच कुशल मनुष्यबळाच्या आणि समर्थ नेतृत्वाच्या भांडवलावर कंपनीने सेवा क्षेत्रापलीकडे जाऊन सॉफ्टवेअर उत्पादन    क्षेत्रात शिरण्याची वेळ आलेली आहे. मायक्रोसॉफ्ट, गुगल या कंपन्यांच्या तोडीचे संशोधन आणि मनुष्यबळ उभे करणे टीसीएससाठी फार अवघड नाही. टीसीएसची कहाणी ही दीर्घकालीन आणि मूल्याधारित असून त्यामुळेच अधिक शाश्वत ठरते. १०० अब्ज डॉलरचे भांडवली बाजारमूल्य हा या कंपनीसाठी निव्वळ एक टप्पा ठरावा.