News Flash

वाडा कोलमचे भागधेय

जमिनीच्या प्रत्येक खंडाचे म्हणून काही खास वैशिष्टय़ असते.

जमिनीच्या प्रत्येक खंडाचे म्हणून काही खास वैशिष्टय़ असते. उगवणारी पिके आणि त्यांचे वेगळेपण यांचा थेट संबंध त्या जमिनीशी असतो. प्रत्येक देशाचा, तेथील राज्यांचा, त्यावरील बौद्धिक संपदेचा अर्थ किती महत्त्वाचा असतो, याचे भान अद्यापही आपल्या सरकारला आलेले नाही. प्रगत देशांमध्ये अशा पिकांना आंतरराष्ट्रीय पातळीवर विशेष दर्जा प्राप्त करून देण्यासाठी सतत लढाई केली जाते. मग ते पेटंट असो की जीआय (जिओग्राफिकल आयडेंटिफिकेशन- भौगोलिक ओळख) प्रमाणपत्र असो. भारतात ज्या गीर गाईंना अतिशय महत्त्वाचे स्थान आहे, त्या गाईंची पैदास पाश्चात्त्य देशांत अधिक प्रमाणात होते आणि बासमती तांदळाच्या पेटंटसाठी अमेरिकेसारखा देश आपले सर्वस्व पणाला लावतो. पण इथे महाराष्ट्रात पालघर जिल्हय़ाच्या वाडा तालुक्यात पिकणारा ‘वाडा कोलम’ हा तांदूळ सध्या जगात लोकप्रिय होत असतानाही, त्याची भेसळ थांबवण्यात कुणालाच रस नाही. या तांदळाला देशभरात असलेली वाढती मागणी लक्षात घेता, अनेकांनी भलताच तांदूळ ‘वाडा कोलम’ या नावाने विकण्यास सुरुवात केली आहे.  वाडा तालुक्यात जंगलाचे प्रमाण मोठे आहे, त्यामुळे तेथील पालापाचोळा आणि शेतकऱ्यांकडे मोठय़ा प्रमाणात असलेल्या जनावरांचे शेणखत अशा नैसर्गिक खतांपासून तयार झालेल्या या तांदळात रसायनांचा वापरच होत नाही.  नवे तंत्रज्ञान, भाताच्या अनेक नव्या जाती आणि उत्पादन खर्चात होत राहणारी वाढ, यामुळे तेथील भातशेतीखालील जमीन आता निम्म्यावर आली आहे. तरीही या तांदळाला देशभरात मागणी असल्याने आसपासच्या राज्यातील व्यापाऱ्यांनी बाहेरील राज्यातील तांदूळच ‘वाडा कोलम’ या नावाने विकण्यास सुरुवात केल्याने खरा वाडा कोलम तांदूळ कुठला, असा संभ्रम ग्राहकांना पडू लागला आहे. अशा परिस्थितीत सरकारने पुढाकार घेऊन ही संपदा जपण्यासाठी आणि तिचा विकास होण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. व्यापाऱ्यांच्या या गंडवागंडवीला आळा घालण्यासाठी आवश्यक ती पावले उचलायला हवीत. पण असा काही प्रश्न गंभीर रूप धारण करतो आहे, हे सरकारच्या गावीही नाही. जंगलांचा होणारा ऱ्हास आणि नव्या तंत्रज्ञानामुळे आलेली यांत्रिक अवजारे, शिवाय एकरी अधिक उत्पादन देणाऱ्या नव्या जाती, यामुळे वाडा कोलम आता संकटाच्या घेऱ्यात सापडला आहे. वाडा तालुक्यात होणारे या जातीच्या तांदळाचे उत्पादन दिवसेंदिवस कमी होते आहे, त्याच नावाचा नकली तांदूळ बाजारात मात्र विपुल प्रमाणात उपलब्ध आहे, हे महाराष्ट्राच्या कृषी खात्यास माहीतही नसावे, हे दुर्दैवच! या वाडा कोलम जातीच्या तांदळावर विशेष संशोधन करून त्याची अधिक लागवड कशी करता येईल, त्याची बाजारपेठ कशी विस्तारता येईल, यासाठी काही प्रयत्न करण्याऐवजी कृषी खाते जर मख्खपणे बसून राहणार असेल, तर काही वर्षांनी मूळचा आणि खरा वाडा कोलम तांदूळ कसा असतो, हेही समजणार नाही. आपल्याकडे जे पिकते, त्याचे महत्त्व अन्यांना अधिक कळते. त्यामुळे आपल्या संपदेचे  रक्षण करण्यासाठी तातडीने काही करायला हवे. काही काळाने हाच तांदूळ परदेशातून अधिक किंमत देऊन आयात करण्याची वेळ आपल्यावर येण्यापूर्वीच काही हालचाल केली, तरच उपयोग. अन्यथा खरे आणि खोटे यातील फरक सहजपणे पुसून जाईल आणि त्याचा गैरफायदा व्यापारी मोठय़ा प्रमाणावर घेतील. वाडय़ातील शेतकऱ्यांना कुणी वाली नाही. आपण काही वेगळे करतो आहोत, हेही त्या शेतकऱ्यांना समजायला उशीर झाला आहे. अशा वेळी सरकारने मध्यस्थी केली नाही, तर परंपरेने आलेले तरीही टिकून राहिलेले हे भाताचे पीक हातचे जाण्याचीच शक्यता अधिक!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2018 3:01 am

Web Title: what is kolam rice
Next Stories
1 (अ)शैक्षणिक अडवणुकीला लगाम
2 धर्मनिरपेक्षतेची ऐशीतैशी
3 ‘मानांकना’ची शिकवणी!
Just Now!
X