बिहारमधील निवडणुकीत दलित मतांवर कोणाचा जास्त अधिकार आहे, हे सिद्ध करण्यासाठी आता नेत्यांमध्ये जाहीर वादंग सुरू झाले आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत नव्याने सहभागी झालेल्या जीतनराम मांझी यांनी रामविलास पासवान यांच्यावर थेट टीका करून भाजप अध्यक्षांना मध्यस्थी करायला भाग पाडले आहे. निवडणुका तोंडावर असताना नेत्यांचे वाद अडचणीचे ठरू शकतात, हे भाजपच्या नेत्यांना चांगलेच ठाऊक आहे. याचे खरे कारण बिहारमधील सुमारे एक कोटी मुस्लीम मतदारांसमोर दलित मतांचे आव्हान उभे केल्याखेरीज भाजपला तेथे पाय रोवता येणे शक्य नाही. भाजपची साथ सोडल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्रिपद तात्पुरत्या स्वरूपात मांझी यांच्याकडे सोपवण्यात नितीशकुमार यांचा राजकीय डाव होता. मांझी ज्या दलित समाजाचे नेतृत्व करतात, त्यांना आपल्याबरोबर ठेवण्यासाठी केवळ प्यादे म्हणून बसवलेल्या मांझी यांनी आपले खरे रूप दाखवायला सुरुवात केल्यानंतर नितीश यांनी त्यांना पायउतार होणे भाग पाडले. गेल्या लोकसभा निवडणुकीत नितीश यांच्या पक्षाला जो दारुण पराभव पत्करावा लागला, याचे कारण बिहारमधील दलित मतदार एकगठ्ठा नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभे राहिले. त्यानंतर गेल्याच वर्षी स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून आलेल्या २४ पैकी १३ सदस्य रालोआचे होते. गेल्या ४० वर्षांत बिहारमधील दलितांच्या मतांवर लक्ष ठेवून प्रत्येक राजकीय पक्षाने वेगवेगळी आखणी केली. बाबू जगजीवनराम यांच्यापासून ते जीतनराम मांझी यांच्यापर्यंत अनेकांनी या मतांवर आपलेच वर्चस्व असल्याने दाखवत नेतृत्व टिकवण्याचा प्रयत्न केला. गेली अनेक वर्षे बिहारमधील दलितांचे नेतृत्व फक्त आपल्याकडेच आहे, असे पासवान यांना वाटत आले आहे. प्रत्यक्षात त्यांच्या जमातीचे मतदार २६ लाख आहेत, तर मांझी ज्या महादलित वर्गाचे नेतृत्व करतात, त्याचे ३६ लाख मतदार आहेत. चमार जातीच्या मतदारांची संख्याही २७ लाख एवढी आहे. हे सारे मतदार बिहारच्या ग्रामीण भागात आहेत. त्यातही ५६ टक्केवर्ग हा शेतमजूर आहे. तेथील सामाजिक आणि आर्थिक स्थितीमध्ये आजवर फार मोठा विधायक बदल झालेला नाही. या सगळ्या मतदारांवर प्रभाव टाकणारे वस्त्यावस्त्यांतील ‘मुखिया’ काय भूमिका घेतात हेच प्रत्येक निवडणुकीत महत्त्वाचे ठरते. मांझी यांच्या हिंदुस्तानी आवाम मोर्चाला बिहारच्या २४३ विधानसभा मतदारसंघांपैकी १५पेक्षा अधिक ठिकाणी उमेदवारी हवी आहे. एवढय़ा जागा द्यायच्या तर पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाच्या उमेदवारीवर थेट परिणाम होऊ शकतो. पासवान यांनी आजवर फक्त कुटुंबीयांचेच राजकारण केले, असा थेट आरोप करून मांझी यांनी नेतृत्वाच्याच मुद्दय़ाला हात घातला आहे. सध्याच्या विधानसभेत मांझी यांच्या पक्षाचे १२ सदस्य असून पासवान यांच्या पक्षाचा एकही नाही, असे सांगत मांझी यांनी अधिक जागांसाठीचा हट्ट आरंभला आहे. बिहारच्या निवडणुकीत प्रत्येक धर्म, जाती आणि जमाती यांच्या विभाजनाचा फायदा कोणत्या पक्षाला किती प्रमाणात मिळतो, यावरच सत्ता कुणाच्या हाती राहील हे ठरते. बिहारमधील दलितांचे नेतृत्व रामविलास पासवान, कुशवाह जमातीचे उपेंद्र कुमार आणि जीतनराम मांझी यांच्यापैकी कुणाच्या हाती राहते, याचा निर्णय येत्या निवडणुकीत होणार आहे.