13 July 2020

News Flash

ती आहे तशीच आहे..

पहिल्यांदा मराठी वाचकाला बनगरवाडी भेटली त्याला आता ६४ वर्ष झाली.

गिरीश कुबेर girish.kuber@expressindia.com

@girishkuber

किती तरी वर्षे झाली ती आहे तशीच आहे.हे पूर्वी होतं तसंच असणं यात आनंद मानायचा की त्याचं दु:ख करायचं? आणि त्याहूनही मुख्य मुद्दा म्हणजे हे आहे तसंच पिढय़ान्पिढय़ा राहाणं हे अपरिहार्यता म्हणून आहे की ते त्यांच्या निर्णयाचा भाग आहे?

काही काही खुणा मनातनं जाता जात नाहीत. काय काय जात नाही मनातनं? काही प्रत्यक्ष अनुभवलेलं आणि काही अप्रत्यक्षपणे पण प्रत्यक्षाइतक्या उत्कटपणे भिडलेलं पुस्तकातलं. असंख्य उदाहरणं.

लहानपणी पोहणं शिकवताना नदीत गेल्यावर खांद्यावरनं उतरवून नकळत पाण्यात सोडून देणारा मामा, नाकातोंडात पाणी गेल्यावर ठसकताना त्यानं पाठीवर बुक्की मारणं, लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत सगळ्यांबरोबर अंगणात झोपलेलं असताना मध्येच जाग आल्यावर दिवसा माया लावणाऱ्या पिंपळाचं चेटकिणीच्या हातासारखं दिसणं, त्यामुळे पुन्हा डोळे गच्च मिटून घेणं, वडिलांबरोबर पाहिलेलं पहिलं नाटक, कथाकथन, चांदोबा मासिकातली लक्ष्मीसारखीच दिसणारी सरस्वती, कविता आवडू लागल्यावर हा असा का विस्कटलेला असं वाटायला लावणारा ग्रेस, आपल्याला विस्कटणारे रॉय किणीकर किंवा आरती प्रभू, कवितेइतक्याच उत्कट गद्यातला माडगूळकरांच्या मंतरलेल्या दिवसातला बामणाचा पत्रा, तीळ आणि तांदूळ आणि अवीट आणि अभ्रष्ट मराठीतली माणदेशी माणसं आणि बनगरवाडी. अशी पुस्तकं तर असंख्य.

त्यांच्या आठवणी त्या त्या भागातला भूगोल जागा करतो. मग दापोलीच्या आसपास हिंडताना आपल्याला गारंबीची आस लागते. त्यातल्या बापूचा कोणी वंशज असेल का? तिथली एखादी गोरीगोमटी राधेच्या आठवणी जाग्या करते. विदर्भातल्या खेडय़ांत वाडा चिरेबंदी दिसतो आणि त्यातला मौन राग ऐकायला येतो. बेळगावात पाऊल टाकलं की इंदिरा संतांची मृण्मयी भिजवते. असं बरंच काही.

ते अचानक उफाळून आलं माणदेशात निवडणुकीच्या निमित्तानं खेडोपाडी भटकताना. आठवणींमुळे असेल पण दुष्काळातही या माणदेशातला ओलावा असा भिडत राहतो. एक तर कृष्णेच्या परिसरातच एक गंमत आहे. कृष्णा, वेण्णा, माणगंगा वगरेंच्या पाण्यानं भिजलेली माती एकदा का अंगाला लागली की ती सुटता सुटत नाही. निवडणुकीच्या भटकंतीत पुणे, बारामती, फलटण वगैरे करून भकभकलेल्या वातावरणात दहिवडीकडे उतरलो. बरोबर काही समव्यवसायी आणि समानधर्मी होते. तर अशा भरभरत्या, काहीशा भकास वातावरणात, तापत्या उन्हानं चिडचिडलेल्या मनानं, काहिली झालेल्या अंगानं भटकताना एकदम चर्र झालं. सगळा निरुत्साह क्षणात दूर झाला. एबीपी माझाचा पुण्याचा प्रतिनिधी मंदार गोंजारी गाडीत होता. बोलता बोलता तो सहज बोलून गेला.

हे असं इथून आत गेलं की बनगरवाडी.

म्हणजे व्यंकटेश माडगूळकरांनी अजरामर करून ठेवलेल्या बनगरवाडीचं मूळ गाव लेंगरेवाडी. कादंबरीत रामा मलकुली आहे. मलकुली म्हणजे रस्त्यावर अंतर मोजत मोजत कडेच्या दगडांवर अंतराच्या खुणा करत जाणारा सरकारी कर्मचारी. आपण मोटारीतनं जातायेता त्या खुणा पाहिलेल्या असतात. पाहाव्याच लागतात. त्या खुणा करणं हे या कर्मचाऱ्याचं काम. त्याच्या जोडीला बनगरवाडीत शाळा आहे. शिक्षक आहे. गावची म्हणून एक तालीम आहे. तालमीसमोर पलवान मंडळी आपल्या दंडातल्या बेटकुळ्यांची ताकद आजमावून पाहायची तो दगड आहे. आणि या सगळ्याला सांभाळून घेणारी निसर्गाच्या चक्रानं होरपळलेली, मनं करपवणारी शांतता आहे. वर हे सहन न झाल्यानं जगायला बाहेर पडणारी माणसं आहेत.

बनगरवाडी आजही तशीच आहे.

सप्टेंबर १९५५ मध्ये या कादंबरीची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. म्हणजे स्वतंत्र भारताला आठवं लागलं होतं त्या वेळी. या कादंबरीनं वाचकांना अंतर्मुख केलं. आतापर्यंत तिच्या किती आवृत्त्या निघाल्यात कोणास ठाऊक. पहिल्यांदा मराठी वाचकाला बनगरवाडी भेटली त्याला आता ६४ वर्ष झाली. त्या गावातल्या शिक्षकाची मुलं काय कुठे असतील ते माहीत नाही. मुदलात त्यांना तरी आपली लेंगरेवाडी हीच बनगरवाडी आहे, हे तरी माहीत असेल की नाही, याचाही अंदाज बांधणं अवघड. पण त्या काळच्या गावातलं रिकामपण आजही त्या बनगरवाडीत तसंच ठासून भरलेलं आहे. बनगरवाडीतले रिकामटेकडे त्या तिथल्या चिंचेच्या पारावर बसून आपोआप जाणारा वेळ ढकलत असत. ती चिंच व्यंकुअण्णांच्या शब्दांइतक्याच.. किंवा त्याहूनही अधिक बोलक्या रेषांमुळे अजूनही अनेकांच्या मनात घर करून असेल.

ती आजही तशीच आहे. चौकोनी पार आहे तिला आता. पण त्यावर बसलेल्यांचं रिकामपण आजही तसंच आहे.

ते पाहिल्यावर एका प्रश्नचा भुंगा सतावतोय.

हे पूर्वी होतं तसंच असणं यात आनंद मानायचा की त्याचं दु:ख करायचं? आणि त्याहूनही मुख्य मुद्दा म्हणजे हे आहे तसंच पिढय़ान्पिढय़ा राहाणं हे अपरिहार्यता म्हणून आहे की ते त्यांच्या निर्णयाचा भाग आहे?

उदाहरणार्थ इंग्लंडमध्ये अ‍ॅव्हान नदीकाठच्या स्ट्रॅटफोर्ड इथं शेक्सपियरचं घर तो जन्मला तेव्हा होतं तसंच ठेवलंय. त्या वेळी छोटय़ा विल्यमनं ओली केलेली दुपटी सोडली तर सगळं तसंच आहे. थंडीत उबेसाठी घरात पेटवायच्या चुलीसकट सर्व तसंच्या तसं आहे. छान वाटतं ते पाहायला. इतिहासात गोठवून ठेवलेलं ते घर पाहायला वीसेक पौंड.. म्हणजे साधारण दीडेक हजार रुपये.. आपण मोजलेले असतात.

पण आपल्या बनगरवाडीतली ती तालीम, चिंच, शाळा वगैरे तसंच्या तसं आहे. अगदी फुकट पाहायला मिळतं सगळं. बनगरवाडी वाचताना अंगाला भिडणाऱ्या फुफाटय़ाच्या भावनेसह. तसंच्या तसं भकास.

त्या वेळी दुष्काळात व्यंकटेशअण्णा लिहून गेले.. माणसं जगायला बाहेर पडली..

ती परत बनगरवाडीत आलीच नाहीत. आहेत ती बाहेर पडता येत नाहीये म्हणून राहतायत. सध्या कशी आहे बनगरवाडी असं विचारल्यावर एक जण म्हणाला.. ल बदललीये.. वीज आलीये. टीव्ही आलाय. फोन आलाय. इंटरनेट आहे. वायफाय आहे. पाणी नाही आलं. बाकी सगळं आलंय..

बनगरवाडी आहे तशीच आहे..!

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2019 1:07 am

Web Title: girish kuber article about his visit to bangarwadi
Next Stories
1 पिनोशिओ पेच..
2 न्यायालये, लोकशाही आणि माध्यमे
3 आटपाट नगरातले मोठे..
Just Now!
X