22 September 2020

News Flash

एक जखम वाहती..

तो करार झाला १०० वर्षांपूर्वी. आज अनेक देश एका महाप्रचंड अस्वस्थतेची गंगोत्री बनलेत.

तो करार झाला १०० वर्षांपूर्वी. आज अनेक देश एका महाप्रचंड अस्वस्थतेची गंगोत्री बनलेत. इतिहासाचे अभ्यासक यासाठी त्या कराराला दोषी ठरवत असले तरी आता त्यात काहीही बदल करता येणार नाही..
जो माणूस असत्य बोलत असतो त्याला सत्य लपवायचं असतं पण ते कुठे आहे हे त्याला माहीत असतं. पण जो माणूस अर्धसत्य बोलत असतो त्याला त्या उरलेल्या अध्र्या सत्याचं काय करायचं, हे माहीत नसतं.. अशा आशयाचं वाक्य १९६२ साली गाजलेल्या आणि आजही तितक्याच भारदस्तपणे ज्या विषयी बोललं जातं त्या ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ या सिनेमात आहे.

प्रसंग आहे टी ई लॉरेन्स यांना त्यांचा एक ब्रिटिश अधिकारी ऑटोमन साम्राज्याच्या विभागणीची माहिती देतो तेव्हा लॉरेन्स रागावतात. त्या वेळच्या संवादात हे वरचं वाक्य आहे. ही ऑटोमन साम्राज्याची वाटणी झालेली असते सायकस पिको या नावानं ओळखल्या जाणाऱ्या करारातून. हा सिनेमा बऱ्याच वर्षांपूर्वी पाहिलेला. त्या निमित्तानं तेव्हा पहिल्यांदा हे सायकस पिको कराराचं नाव ऐकलं. पुढे हे सायकस पिको वारंवार समोर येत राहिले. अगदी गेल्या आठवडय़ापर्यंत. सायकस पिको यांनी जी काही विभागणी केली त्यातला बराचसा प्रदेश व्यवसायाच्या निमित्तानं पाहता आला. त्यामुळेही त्यांच्या या उद्योगाचं महत्त्व अधिकाधिक पटत गेलं.
सायकस पिको हे एक नाव नाही. सर मार्क सायकस हे ब्रिटिश अधिकारी तर फ्रान्क्वा जॉर्जेस पिको हे फ्रेंच. हे सायकस आणि पिको जेव्हा आपापल्या देशांसाठी काम करत होते तेव्हा त्यांचे देश हे महासत्ता म्हणून ओळखले जायचे. जगातल्या अनेक देशांवर त्यांचा अंमल होता. ग्रेट ब्रिटन तर अमेरिकी साम्राज्यापेक्षाही मोठा होता. किंबहुना अमेरिकादेखील ब्रिटनच्या साम्राज्याचाच भाग होती. तर अशा या महासत्ता असलेल्या दोन देशांचा डोळा एका तिसऱ्या महासत्तेवर होता.
ती म्हणजे ऑटोमन साम्राज्य. आपल्याला या साम्राजाची ओळख झालेली असते केमाल पाशा या नावामुळे. ऑटोमन साम्राज्याला आधुनिक दृष्टी देणारा केमाल पाशा हा इस्लामी सत्तांमधला.. आणि अर्थातच एकंदरही.. आदर्श सत्ताधीश मानला जातो. पण त्याच्या पश्चात हे साम्राज्य लयाला जाणार अशी चिन्हं होती. पश्चिम आशियाच्या जवळपास सर्व देशांना कवेत घेणारं हे साम्राज्य पहिल्या महायुद्धाच्या तोंडावर विघटनाला लागलं होतं. फ्रान्स आणि ग्रेट ब्रिटन हे दोन्हीही देश या घरघर लागलेल्या साम्राज्याच्या नाकाला सूत धरून बसले होते. संपत्तीसाठी हपापलेल्या धनाढय़ वृद्धाच्या मुलांनी तीर्थरूप ‘राम’ कधी म्हणतायत याची वाट पाहावी तसाच हा प्रकार. पण या दोन्ही देशांनी केला खरा. या दोन्हींचा हेतू एकच. तो म्हणजे ऑटोमन साम्राज्याचा जास्तीत जास्त भाग हा आपल्या आधिपत्याखाली कसा येईल.
तर त्या वाटणीचं काम हे या सायकस आणि पिको या अधिकारीद्वयीनं आपापल्या देशांसाठी केलं. फारच महत्त्वाचं ते. या दोघांनी वाळूत रेषा मारून नवनवे देश जन्माला घातले. सायकस आणि पिको यांनी परस्परच या भूभागाचे नकाशावर तुकडे पाडले आणि हा घे तुला, हा मला.. असं म्हणत हे तुकडे आपापसात वाटून टाकले. यात त्या देशातल्या जनतेचा कोणताही विचार झाला नाही. अर्थात पराभूतांना निवडीचा अधिकार कुठे असतो म्हणा. गावच्या माजलेल्या मुखियानं कर्ज फेडू न शकणाऱ्या शेतकऱ्यांनी तारण म्हणून ठेवलेल्या जमिनी परस्पर वाटून टाकव्यात तसा हा उद्योग होता. तो करताना ब्रिटन आणि फ्रान्सचा अहं इतका तीव्र होता की हे सायकससाहेब लंडनमध्ये बोलताना म्हणाले मला तर (आताच्या) पॅलेस्टाइनमधल्या एकरमधल्या ईपासून ते किर्कुकमधल्या केपर्यंत एक सरळ रेषाच मारायची होती.. त्या रेषेच्या उत्तरेकडचा भाग फ्रान्सला द्यायचा आणि दक्षिणेकडे सगळा ब्रिटननं ठेवायचा.. पण ते जमलं नाही. ही वाटणीची रेषा वेडीवाकडी झाली आणि त्याप्रमाणे देशांची विभागणी झाली.
त्यातून मग जन्माला आला इराक. आधीचा तो मेसोपोटेमिया. मग जॉर्डन झाला. कुवेत बनला. सीरियाचा जन्म झाला. म्हणजे थोडक्यात आपण ज्याला पश्चिम आशियातले देश म्हणतो असे अनेक देश या करारांतून जन्माला आले.
आज हेच सगळे देश एका महाप्रचंड अस्वस्थतेची गंगोत्री बनलेत. मग तो इराक असो किंवा सीरिया. कधी या देशांवर सुन्नीधर्मीयांची राजवट असते. कधी शिया असतात. मध्येच कधी या दोघांत चांगला िहस्र संघर्ष होतो. हजारो सामान्य नागरिक या धर्मयुद्धात मारले जातात. मग कधी या प्रदेशात मुबलक आढळणाऱ्या तेलाच्या मालकीवरनं माणसं एकमेकांची डोकी फोडू लागतात. सीरियासारख्या देशाची अवस्था तर वर्णनही करता येणार नाही, इतकी केविलवाणी होऊन जाते. जवळपास सव्वा दोन कोटींची लोकसंख्या होती त्या देशाची. पण अंतर्गत यादवीला कंटाळून त्यातल्या कोटभर लोकांनी देशत्याग केला. तशीच वेळ आली त्यांच्यावर. पाच लाख सीरियन या यादवीत हकनाक मारले गेलेत. साधारण ६५ लाख जणांवर आपापली घरं सोडून मदत छावण्यांमध्ये जाऊन राहायची वेळ आलीये. या सगळ्यात देशाच्या अर्थव्यवस्थेचे तर तीन तेरा वाजलेत. पण याचा सत्ताधीश बशर अल असाद यांच्यावर काहीही परिणाम नाही. निवांत आहेत ते आपल्या प्रासादात.
खरी केविलवाणी अवस्था आहे ते कुर्द नावानं ओळखल्या जाणाऱ्यांची. त्यांना देशच नाही. टर्कीमधे त्यांची उपस्थिती डोळ्यात भरेल इतकी लक्षणीय आहे. त्या देशातल्या कुर्दीचा राजकारणातही मोठा वावर आहे. इतका की त्यांना स्वतंत्र कुर्दिस्तान हवा आहे. हे कुर्द इराणात मोठय़ा संख्येने आहेत. तिथेही त्यांना फारशी ओळख नाही. सीरियामध्येसुद्धा कुर्दाचा मोठा वावर आहे. पण त्यांना राजकारण, समाजकारणात काही स्थान नाही. इराकमध्ये तर सद्दाम हुसेन त्यांच्या मागे हात धुवून लागला होता. त्याचे सनिक दहा दहाच्या रांगेत या कुर्दाना उभे करायचे आणि एकाच वेळी गोळ्या घालून त्यांना ठार केलं जायचं. त्यांच्या दफनात वेळ जाऊ नये म्हणून खड्डय़ांच्या टोकांवर त्यांना उभं करायचे. गोळी लागली की आपसूकच ते समोरच्या खड्डय़ात पडणार. रासायनिक अस्त्रांनीही त्यांचे प्राण घेतले गेले. आता इराकातच ते आपली वेगळी चूल मांडून आहेत. तिथे त्यांची लढाई दुहेरी. एका बाजूला इराकी फौजा. आणि दुसऱ्या बाजूला नुकतीच जन्माला आलेली संघटना. आयसिस.
या ऑटोमन साम्राज्याचं महत्त्व इतकं की आयसिस नवीन खिलाफत स्थापन करायचं म्हणते ती हीच. ऑटोमन साम्राज्य जितकं पसरलं होतं तितक्या साऱ्या ठिकाणी आपला अंमल असायला हवा अशी आयसिसची मनीषा आहे.
आणि पश्चिम आशियाचे अभ्यासक त्याचमुळे या साऱ्यासाठी सायकस पिको कराराला दोषी ठरवतायत. या करारामुळे इतक्या प्रचंड प्रदेशाची इतकी सारी विभागणी झाली नसती तर पश्चिम आशियाची वाळू इतकी तापली नसती, असं त्यांचं मत आहे.
पण या जर तरला आता अर्थ काय? झालं ते झालं. या सायकस पिको करारांनं नवनवे देश जन्माला आले हे तर खरंच. तेव्हा आता ते काही पुसता येणार नाहीत. म्हणजे या देशांचं अस्तित्व त्यांच्यातल्या िहसक अस्थिरतेसह मान्य करायला हवं.
खरं म्हणजे ते नाकारतंय कोण? आणि आता ही चर्चा करायचं कारणच काय?
चच्रेचं कारण म्हणजे की गेल्याच आठवडय़त, १९ मे रोजी, या सायकस पिको कराराची शताब्दी पार पडली. आज शंभर वर्षांनंतरही ही जखम किती वाहती आहे, हे आपल्याला लक्षात यावं, इतकंच.

 

गिरीश कुबेर
girish.kuber@expressindia.com
twitter : @girishkuber

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2016 4:00 am

Web Title: lawrence of arabia
Next Stories
1 कळविण्यास ‘हर्ष’ होतो की..
2 मेक इन सौदीचा धडा
3 उघडय़ा डोळ्यांच्या गांधारी!
Just Now!
X