गिरीश कुबेर

आपल्या मूळ गतीकडे आपण चाललो आहोत असा या वर्तमानाचा अर्थ. सगळं कसं पुन्हा मागच्यासारखं..!

वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या तज्ज्ञांचा आसपासच्या घटनांकडे पाहण्याचा वेगवेगळा दृष्टिकोन बरंच काही शिकवून जाणारा असतो. उदाहरणार्थ गेल्याच आठवडय़ात जगातल्या एका प्रचंड बँकेतल्या मोठय़ा पदावरचा अनुभव गाठीशी असणाऱ्या मित्राशी झालेल्या गप्पा. अशा पदांवरच्या व्यक्तींना सर्व काही आकडय़ांतून दिसतं. ही माणसं एखाद्या रम्य चित्रकृतीकडे टक लावून पाहावं तितक्या कौतुकाने एक्सेलशीट टक लावून पाहतात. चित्र, शब्दांपेक्षा संख्या त्यांना जवळच्या वाटत असाव्यात.

तर विषय होता संपत आलेलं वर्ष, करोनानं आणलेला कडवटपणा, आर्थिक आव्हान वगैरे. पण हा मधेच म्हणाला.. यू नो व्हॉट, इट्स नॉट जस्ट अ इयर- वुई हॅव लॉस्ट एन्टायर डिकेड. त्याला २०२० सालानं आपल्या सर्वागाला केलेल्या जखमांचं तितकं काही वाटत नव्हतं. म्हणजे झालं ते वाईटच. पण २०१० पासनं सुरू झालेल्या दशकात जी काही आपली पडझड झाली, त्या मानाने या वर्षांचं इतकं काही मनाला लावून घ्यायला नको, असा त्याचा विचार. त्याच्या म्हणण्यानुसार गेल्या दशकभरात असं नक्की काय झालं हे आठवायचा प्रयत्न केला. आपल्या नेहमीच्याच घटनांची यादी नजरेसमोरनं तरळली. वाटलं यात इतकं वाईट काय! मग माझा प्रश्नार्थक चेहरा पाहून त्यानं विचारलं : या सरत्या दशकात, म्हणजे २०१० ते २०२० या काळात चीनमधल्या किती कंपन्यांचं बाजारमूल्य १०० बिलियन डॉलर्स – म्हणजे १०,००० कोटी डॉलर्स वा अधिक, इतका प्रचंड टप्पा पार करून गेलं?

हे असे प्रश्न पुलंच्या विख्यात कथेतल्या त्या ‘काय, आज किती दंडबैठका मारल्या असतील?’ या प्रश्नासारखे निर्थक आणि निर्बुद्ध वाटतात. याचं कारण असं की समोरच्याला या प्रश्नांची उत्तरं माहीत नाहीत, याची खात्री असल्याखेरीज ते विचारलेच जात नाहीत. त्याची अचूक उत्तरं दिली गेलीच तर ते प्रश्न विचारणाऱ्यांचा हिरमोड ठरलेलाच. तो न करण्याइतके आपण सभ्य आहोत याचा अंदाज असल्यानेच हे असे प्रश्न विचारले जातात. तेव्हा या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही, हे हा सद्गृहस्थ पुरतं जाणून होता. मी यावर काहीही बोलणार नाही, याचा अंदाज आल्यावर त्यानंच उत्तर दिलं.

‘‘१३०’’! इतकी प्रचंड मार्केट कॅप असलेल्या तब्बल १३० कंपन्या या दशकभरात चीनमध्ये जन्माला आल्या, वाढल्या, अशी त्याची माहिती. ती दिल्यावर पुढचा प्रश्न काय असणार आणि त्याचंही उत्तर आपल्याला माहीत नसणार याची पुरती खात्री होतीच. तसंच झालं. त्यानं विचारलं : या काळात इतक्या मोठय़ा झालेल्या किती कंपन्या भारतात जन्मल्या? त्याचंही उत्तर माहीत असायचा प्रश्न नव्हता.

‘‘फक्त दोन’’!  महासत्ता होऊ पाहणाऱ्या या देशात गेल्या दशकात फक्त दोन कंपन्यांचं बाजारमूल्य इतकं प्रचंड झालं. त्यांची नावं आणि त्यांच्या व्यवसायाचा आकार वगैरे जीवनावश्यक तपशीलही त्यानं लगेच फेकला. त्यातली एक संगणक क्षेत्रातली आहे आणि दुसरी बरंच काय काय करणारी. म्हणजे १०० बिलियन डॉलर्स इतकी मार्केट कॅप असलेल्या फक्त दोन कंपन्या आपल्याकडे तयार झाल्या.

हा तपशील विदीर्ण करणारा खराच. पण तितकाच डोळे उघडणारादेखील. याचा अर्थ असा नाही की गेल्या दशकात आपल्याकडे कंपन्यांचा विस्तार वगैरे झाला नाही. तो झाला. आपल्याकडे त्याआधीही उद्योगात होते त्यांचा विस्तार झाला, दुनिया नाही तरी निदान देश ज्यांच्या मुठ्ठीत होता त्यांची मूठ होती त्यापेक्षा अधिक जाडजूड झाली. वगैरे वगैरे. पण या दशकाच्या कालखंडात, जागतिक पातळीवर दखल घेतली जाईल इतकं बाजारमूल्य तयार करणाऱ्या आपल्या कंपन्या फक्त दोन. म्हणून त्या अर्थानं आपण देश म्हणून हे दशक वाया घालवलं, असा त्याच्या म्हणण्याचा मथितार्थ.

या मित्राच्या जिभेवर आकडय़ांची कडकलक्ष्मी ताडताड नाचत असते. निखारे फुललेल्या चुलीवर, वाळू घातलेल्या भांडय़ातून खमंग वासासह लाह्या फुटाव्यात तसे याच्या तोंडातून टक्केवाऱ्या, आकडे, विविध संख्या फुटत असतात. तेव्हा वर सांगितलेल्या दोन उदाहरणांवर आपली सुटका नाही, याची काळजी होती. ती गडद व्हायला लागली. पुढे पुढे तो आपल्या विकासाचा दर वगैरे तपशिलाच्या जंगलात शिरला. एव्हाना आपल्या प्रश्नाला काहीही उत्तर मिळणार नाही, हे त्याला पुरतं कळून चुकलं होतं. त्यामुळे तो थेट माहितीच द्यायला लागला.

गेल्या दहा वर्षांत भारताच्या दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा (पर कॅपिटा जीडीपी) संयुक्त वाढ-दर फक्त ३.१ टक्के एवढाच राहिला. तर याच काळात चीनचा हाच वेग मात्र ९.२ टक्के आहे. इतकंच काय, व्हिएतनामसारख्या देशानंही अर्थविकासात ७.४ टक्क्यांची गती नोंदवली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं विकसनशील देशांच्या प्रसृत केलेल्या आकडेवारीनुसार त्या आधीच्या दहा वर्षांत, म्हणजे २००० ते २०१० या काळात, मात्र भारताच्या प्रगतीचा दर ९.५ टक्के इतका होता. या मित्राच्या मते विकसनशील देशांच्या पंगतीत भारताचं ताट अतिगरीब देशांच्या रांगेतच मांडलं जाईल, इतकी आपली आर्थिक कामगिरी खराब आहे. अर्थविकासाच्या टक्केवारीत आपण मागे टाकू शकतो ते फक्त पाकिस्तान आणि नेपाळ या दोन देशांना.

हे ऐकून मात्र समाधान वाटलं. पाकिस्तान जोपर्यंत आपल्या मागे आहे तोपर्यंत अन्य कोणीही आपल्या पुढे गेलं तरी आपल्याला चालतं, हे या अमेरिकावासीला कसं सांगायचं हा गहन प्रश्न होता. त्यामुळे पाकिस्तानला मागे टाकलं याचा आनंद फक्त मनातल्या मनातच व्यक्त केला. पण तो पुरता काही मिळाला नाही. कारण या मित्रानं लगेच बांगलादेशाची आकडेवारी समोर फेकली. ज्या देशातनं आपल्या देशात ‘वाळवी’ आणि घुसखोर येतात हे सत्य आपल्यावर सर्वोच्च पातळीवरून बिंबवलं जात असताना त्या देशाच्या प्रगतीच्या वृत्तानं काळजाला किती घरं पडतात खरं तर. पण काही इलाज नव्हता.

या सरत्या दशकात बांगलादेशाचं दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्न थेट तो देश या आकडय़ांत चीनशी स्पर्धा करेल इतक्या वेगानं वाढलं. बांगलादेशानं या उत्पन्नवाढीचा वेग ९.५ टक्के इतका नोंदलाय. याचा अर्थ चीन आणि बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेच्या आकाराची बरोबरी होईल, असा नाही. तसं मानणं हास्यास्पदच. तर याचा अर्थ इतकाच की, या दोन देशांचं दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्न थेट या दशकात तरी समान वेगानं वाढलं. त्याआधीच्या दशकात बांगलादेश ६.५ टक्के या गतीनं वाढला होता. म्हणजे या दशकात त्यानं तीन टक्क्यांची प्रगती केली. याचाच दुसरा अर्थ असा की, भारताच्या सरासरी दराइतकी फक्त वाढ या दशकात बांगलादेशानं नोंदवलेली आहे. यावरून आपल्यापेक्षा बांगलादेश अर्थगतीत किती पुढे आहे ते कळेल. आपली या दशकात चीनशी बरोबरी होऊ शकते ती फक्त अधोगतीबाबत. म्हणजे २००० ते २०१० या दशकात चीनचं उत्पन्न १६.८ टक्क्यांनी वाढत होतं. तो दर २०१० ते २०२० या काळात ९.२ टक्क्यांवर आला. आपलं गेल्या दशकात ११.९ टक्क्यांनी वाढणारं उत्पन्न या दशकात ३.१ टक्क्यांवर आलं. म्हणजे चीन दशकभरात ७.६ टक्क्यांनी घसरला तर आपण ८.८ टक्क्यांनी. यात तरी आपण चीनपेक्षा पुढे (?) आहोत, ही तशी अभिमानाचीच बाब म्हणायची.

हा मित्र अमेरिकावासी हिंदू असूनही अजूनपर्यंत तरी स्वत:ला निधर्मी मानतो. तर त्याला म्हटलं : या आकडेवारीचा तुलाही अभिमान वाटायला हवा. आता निरुत्तर होण्याची  पाळी त्याची होती. ती संधी साधत त्याला राज कृष्णा यांनी साठच्या दशकात प्रसवलेल्या ‘हिंदू रेट ऑफ ग्रोथ’ या संज्ञेची आठवण करून दिली. त्या काळात भारताची अर्थगती वर्षांला तीन-साडेतीन टक्के इतकीच असायची. या वाढीचं वर्णन कृष्णा यांनी ‘हिंदू रेट ऑफ ग्रोथ’ असं केलं होतं.

त्या आपल्या मूळ गतीकडे आपण चाललो आहोत असा या वर्तमानाचा अर्थ. सगळं कसं पुन्हा मागच्यासारखं..!

girish.kuber@expressindia.com

@girishkuber