गिरीश कुबेर

घरात मोठमोठी तांब्यांची पातेली, घंगाळी वगैरे होती. जवळच्या डोंगरउतारावर बार्लीची डौलदार शेती आणि पलीकडे वाहती स्पे..

हेलन आणि एलिझाबेथ क्युमिंग यांची ही कथा आहे. प्रेरणादायी अशी. या दोघी कोण, कुठल्या, आपण का त्यांची कहाणी ऐकायची हा प्रश्न सुरुवातीला मलाही पडला. पण ती सांगू पाहणारा चांगला मित्र असल्यानं तो विचारला नाही, इतकंच. हा सांगतोय म्हणजे त्यात नक्कीच काही तरी विशेष असणार याची खात्री होती. त्यात हा सहाएक महिन्यांच्या करोना- आंबवण्यानंतर पुन्हा एकदा स्कॉटलंडला जाऊन आलेला. नोकरीच्या कामानिमित्तानं तिथं, त्या परिसरात त्याचं जाणं तसं नेहमीचंच. लंडन, एडिंबरा वगैरे अशा ठिकाणी तो किरकोळीत जाऊन येत असतो. पण या वेळी करोनाच्या निमित्तानं बराच काळ याला घरातनं काम करावं लागलेलं. त्यामुळे कावलेला. खरं तर त्याच्यापेक्षा त्याच्या घरचेच जास्त कावलेले असणार. असं त्याला बोलून दाखवलं तर सर्वाच्याच घरी अशीच परिस्थिती आहे, असं त्याचं म्हणणं. आपण घराबाहेर जात असतो म्हणून आपल्या घरी राहण्याचं मोल.. रोज घरनंच काम करू लागलो तर रोज मरे त्याला कोण रडे अशी अवस्था असेल हा त्याचा सिद्धांत. असो.

अलीकडेच तो परदेशातनं आला. मायदेशी परतल्यानंतर सध्याच्या प्रथेप्रमाणे कोंडून वगैरे घेणं झाल्यानंतर त्याचा आनंद साजरा करायला ही भेट. पण गप्पांत हा हेलन आणि एलिझाबेथ यांना काही सोडायला तयारच नाही. इतका तो भारला गेला होता या दोघींच्या कर्तृत्वानं. ही गोष्ट अशी की..

ती सतराव्या शतकात घडलेली. स्कॉटलंडमध्ये. ज्यांनी कोणी हा प्रदेश ‘आमचं स्कॉटलंड झालं’ या अंगावर काटा आणणाऱ्या वाक्याशिवाय पाहिला, खरं तर अनुभवला असेल, त्यांना वेगळं काही सांगायची गरज नाही. त्यांना, हा प्रदेश, त्यातले स्नेहाळ डोंगर, त्यातली भव्य दगडी घरं, निरोगी मेंढय़ांचे निर्धास्त कळप, बार्न नावानं ओळखली जाणारी शेतघरं आणि अशाच शेतघर वाटणाऱ्या घराच्या अंगणात टिपिकल लाकडी बाकांवर बसून बीअर पिणं.. हे सगळं न सांगताही आठवलं असेल. त्यात स्पे नदीच्या आसपास राहण्याचा अनुभव ज्यांनी घेतला असेल त्यांच्या चेहऱ्यावर इतरांविषयी तुच्छतादर्शक भावही आपोआप उमटला असेल.

तर याच स्पे परिसरातल्या एका गोंडस टेकडीवर जॉन क्युमिंग यांची हवेली होती. आजही आहे. जॉन यांची मोठी शेतीवाडी होती. ही कथा सन १८१० च्या आसपासची. म्हणजे अर्थातच स्टीफन्सनचं इंजिन बनायला अजून साधारण दोन दशकं होती, तेव्हाची. म्हणजे औद्योगिक क्रांती अजूनही क्षितिजावर नव्हती तेव्हाचा हा काळ. त्या काळात जॉनच काय पण सगळेच शेती करत असणार. पण त्यातही जॉनची शेती जरा प्रगतिशील असणार. कारण त्या काळाच्या मनानं तो चांगलाच धनाढय़ होता. इतकी मोठी हवेली पाहून हे लक्षात येतं. गुरंढोरंही मुबलक होती. नोकरचाकरांचा मोठा राबता होता. गावातली अनेक गरीब कुटुंबं जॉनच्या सेवेत होती. त्यामुळे त्याचा दिवस सगळा शेतीच्या कामात जायचा. इतक्या घरच्यांचं करण्यात हेलन व्यग्र असायच्या. तर जॉन यांचा दिवस शेतात जात असताना हेलन यांच्या मनानं घेतलं आपणही काही तरी वेगळं करायला हवं. जॉन हे प्रयोगशील शेतकरी तर त्यांची गृहिणी म्हणून आपणही प्रगतिशील असायला हवं, असं त्यांना वाटलं असणार. त्यांच्या घरात मोठमोठी तांब्यांची पातेली, घंगाळी वगैरे होती. जवळच्या डोंगरउतारावर बार्लीची डौलदार शेती होती. या बार्लीला कोवळं ऊन मिळायचं. त्यामुळे इतर बार्लीच्या तुलनेत जॉनच्या शेतातली बार्ली जास्त भरलेली असायची. आणि पलीकडे वाहती स्पे. काय हवं आणखी?

फक्त कल्पनाशक्ती. ती हेलन यांच्याकडे यजमान जॉनरावांपेक्षा निश्चितच जास्त असणार. (हेही तसं वैश्विक सत्यच.) तर ती, हे दोन घटक आणि घरात पाव वगैरे बनवण्यासाठी असणारं किण्व (यीस्ट) वापरून हेलन (हे नावच असं आहे की काकू , ताई, मावशी वगैरे उपाधी लावायला मन धजत नाही.) यांनी घरातल्या घरात चक्क व्हिस्की बनवायला सुरुवात केली. होईल ती दिवसभर शेतात दमूनभागून आलेल्या आपल्या नवऱ्याच्या श्रमपरिहारासाठी, असा उदात्त विचार त्यामागे असणार. काहीही असो. पण त्यांनी जे काही रसायन बनवलं ते अत्यंत उच्च दर्जाचं होतं. जॉनरावांना ते फारच आवडलं. (यात काय विशेष?) त्यांनी हेलन यांचं यासाठी कौतुक केलं. (यातही काय विशेष?) हेलन यांनी ते अधिकाधिक बनवावं यासाठी त्यांना उत्तेजन दिलं असणार.

कारण हेलन यांनीही ते मनावर घेतलं. त्या घरच्या घरी आणखी व्हिस्की बनवायला लागल्या. आसपास लौकिक झाला त्यांचा चांगलाच. कारण चांगलीच मागणी यायला लागली. हेलन या त्या पुरवतही होत्या. पण लवकरच ‘मागणाऱ्याचे ग्लास हजारो’ अशी त्यांची अवस्था झाली असणार. त्यांची वृत्ती ‘जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांसी सांगावे’ अशी. त्यांनी आसपासच्या अनेकांना घरच्या घरी व्हिस्की बनवण्यासाठी उत्तेजन दिलं. पारंपरिक स्कॉटिश संस्कृतीत ही परंपरा होतीच. पण आपल्याच उदात्त परंपरेचा विसर पडतो अनेकांना. तसंच तेव्हा. आणि दुसरं एक कारण होतं व्हिस्कीनिर्मितीची परंपरा असूनही अनेक जण ती बनवत नव्हते.

कारण माजलेले संस्कृतिरक्षक. धर्मतत्त्वांचं पालन करून संस्कृतीचं रक्षण करू पाहणाऱ्यांना ही व्हिस्कीनिर्मिती मंजूर नव्हती. धर्म बाटवायला निघालेत हे व्हिस्की बनवणारे, असा त्यांचा ग्रह. कोणत्याही देशाच्या इतिहासात असा एक काळ येतो की जेव्हा त्यास प्रगतीचे नाहीत तर अधोगतीचे डोहाळे लागतात. राजसत्ता ही धर्मसत्तेच्या तालावर नाचू लागणं हे या अवदसेचं चिन्ह. सतराव्या शतकातल्या इंग्लंडमध्ये तसंच काहीसं असणार. कारण व्हिस्की बनवायला शासनमान्यता नव्हती. त्यामुळे संस्कृतिरक्षकांच्या टोळधाडी शोधत यायच्या घरी कोणी व्हिस्की तर बनवत नाही ना हे पाहायला. असं कोणी आढळलं तर हे संस्कृतिरक्षक उद्ध्वस्त करून टाकायचे हे घर. खूपच दहशत होती त्यांची.

पण हेलन जराही बधल्या नाहीत. त्यांनी एक क्लृप्ती केली. त्यांची हवेली अशा टेकडीवर होती की पायथ्याचा रस्ता त्यांना थेट दिसायचा. त्यांनी मग आपल्या हवेलीतनंच त्या पायथ्याकडे नजर ठेवून सतत कोणी ना कोणी बसलेला असेल अशी व्यवस्था केली. त्यामुळे रस्त्यावरनं कोणीही वर येताना त्यांना सहज लक्षात यायचा. असं एखादं टोळकं वर यायला निघालंय असं दिसलं रे दिसलं की हेलन आपल्या घरावर लाल रुमाल फडकवायच्या. एखाद्या झेंडय़ासारखा. त्यांच्या घरावर असा झेंडा दिसला रे दिसला की आसपासचे सर्वच सावध व्हायचे आणि आपापल्या घरातली व्हिस्कीनिर्मितीची साधनसामग्री दडवायचे. टेकडी चढून वर आलं की पहिलीच हवेली क्युमिंग यांची होती. हेलन मग या टोळक्याला सामोरं जायच्या, आत बोलवून चहापाणी करायच्या आणि स्वत:च्या हातानं बनवलेला पाव वगैरे देऊन त्यांची बोळवण करायच्या. तोपर्यंत आसपासच्यांना पुरेसा वेळ मिळायचा आणि त्यांची व्हिस्कीनिर्मितीही पडदानशीन राहायची. व्हिस्कीनिर्मिती अधिकृत होईपर्यंत हेलन यांनी हा किल्ला लढवला. १८२३ साली व्हिस्कीनिर्मितीला मान्यता मिळाली.

पुढे बाई भरपूर जगल्या. ९८ वर्ष. त्यामानानं जॉनराव लवकर गेले. कदाचित पत्नीनिर्मित पेयावर त्यांनी जास्तच प्रेम केलं असावं. असेलही तसं. पण ते गेल्यावर नंतर ३९ वर्ष हेलन व्हिस्कीनिर्मिती करत होत्या. खूप व्याप वाढला त्यांच्या व्यवसायाचा. नंतर मुलं मोठी झाली. पण त्यांनी आपल्या या व्यवसायाची धुरा आपल्या मुलांहाती काही दिली नाही. आठ मुलं आणि तब्बल ५६ नातवांचं गोकुळ असतानाही त्यांनी आपल्या वारुणीनिर्मितीची वस्त्रं चढवली आपल्या सुनेच्या अंगावर.

एलिझाबेथ ही त्यांची सून. सुनबाईंनी सासूनं दिलेला वसा न उतता मातता सांभाळला. वाढवला. स्वत: वाढता वाढता आपल्या आसपासच्यांना मदत केली. एका तरुण व्यावसायिकाला त्या वेळी तांब्याच्या भांडय़ांची गरज होती. एलिझाबेथ यांनी आपली जुनी भांडी स्वस्तात त्या तरुणाला पुरवली. त्यातून एक नवीन व्हिस्की घराणं सुरू झालं. ‘ग्लेनफिडिच’ हे त्याचं नाव. पुढे अलेक्झांडर वॉकर हे एलिझाबेथ क्युमिंग यांच्याकडून व्हिस्की घेऊ लागले. त्यांचंही घराणं तयार झालं. ‘जॉनी वॉकर’ नावानं ते आजही ओळखलं जातं. नंतर क्युमिंग यांची कंपनीही जॉनी वॉकरनं घेतली.

पण तरीही हेलन यांची व्हिस्की आजही बनवली जाते. ‘कार्धु’ (Cardhu) या मूळ नावानंच ती विकली जाते. हेलन यांनी तेव्हा केलेली आणखी एक गोष्ट आजही तशीच आहे. त्यांच्या घरावरचा तो लाल ध्वज. हेलन-एलिझाबेथ यांना आदरांजली म्हणून ‘कार्धु’च्या प्रत्येक खोक्यावर (बाटली हा शब्द किती अस्वच्छ आहे) आजही तो ध्वज असतो.

तर अशी ही कहाणी. ती ऐकून आम्हीही या दोघींविषयी कृतज्ञता व्यक्त करून समोरच्या खोक्यावरच्या लाल ध्वजाला वंदन केलं आणि.. !

girish.kuber@expressindia.com

@girishkuber