|| डॉ. किशोर अतनूरकर

गर्भवती स्त्रीची शारीरिक आणि मानसिक प्रकृती समाधानकारक आहे की नाही या गोष्टी होणाऱ्या बाळाच्या दृष्टीने फारच महत्त्वाच्या ठरतात. काही वर्षांपूर्वी गर्भवतीच्या मनाची अवस्था काय असते आणि सर्वजणींच्या अनुभवांमध्ये काही साधम्र्य आहे का हे जाणून घेण्यासाठी आम्ही एक छोटासा अभ्यास केला. त्या अभ्यासाचे निष्कर्ष आणि प्रत्यक्ष आलेले हे काही अनुभव..

Hanuman Jayanti
Hanuman Jayanti : हनुमान जयंतीच्या दिवशी मंगळ गोचरमुळे ‘या’ राशींचे नशीब चमकरणार, मिळणार बक्कळ पैसा?
Guru Asta 2024
३ मे पासून हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ राशींचे नशीब? देवगुरु अस्त होताच उत्पन्नात होऊ शकते मोठी वाढ
Shukra Gochar In Mesh
२४ एप्रिलपासून ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत?सुख-समृद्धीचा कारक ग्रह राशी बदल करताच मिळू शकते चांगला पैसा
narayana murthy experienced hunger for 120 hours hitchhiking in Europe 50 years ago but what happens your body starvation 5 day doctor said
नारायण मूर्ती राहिले होते १२० तास उपाशी; पाच दिवस उपाशी राहिल्याने शरीरावर काय परिणाम होतात?

गर्भावस्थेच्या नऊ महिन्यांच्या लांबलचक कालावधीत, प्रत्यक्ष बाळंतपणाच्या आणि स्तनपानाच्या वेळेस, तिच्या शरीरात जसे अनेक बदल घडून येत असतात तसे मनातदेखील बदल घडतात. या कालावधीत तिच्या मनात काय चालू आहे, हे पहाणं तिच्या आरोग्याच्या दृष्टीने तितकंच महत्त्वाचं असतं.

या बदलाचे आपल्या जीवनशैलीवर लगेच आणि दूरवरचे काय परिणाम होतील, याबद्दल तिच्या मनात जशी उत्सुकता असते तशी भीतीदेखील वाटत असते. गर्भवती स्त्रियांना तपासत असताना, डॉक्टर बाळाची वाढ व्यवस्थित होत आहे का नाही आणि मातेची शारीरिक प्रकृती समाधानकारक आहे का नाही या दोन महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष देतात. या अवस्थेत तिची मानसिक परिस्थिती कशी आहे हे समजून घेऊन, डॉक्टरांनी सल्ला देण्याइतपत वेळ राखून ठेवला पाहिजे असं वाटतं.

काही वर्षांपूर्वी गर्भवतीच्या मनाची अवस्था काय असते याचा वेध घेण्यासाठी आम्ही एक छोटासा अभ्यास केला. त्या अभ्यासाचे निष्कर्ष आणि प्रत्यक्ष आलेले काही अनुभव वाचकांसमोर ठेवत आहे. गर्भवती स्त्रियांच्या मनाच्या अंतरंगाचा वेध घेण्यापूर्वी प्रथम तिची गर्भधारणेपूर्वीची मानसिक स्थिती समजून घेणं गरजेचं आहे. खरं पाहिलं तर मला ही गर्भधारणा नकोच होती; पण नवरा, आई-वडील, सासू-सासरे किंवा अन्य कुणाच्या दबावामुळे ती हा गर्भ वाढवत आहे, अशी परिस्थिती तर नाही ना हे सर्वप्रथम लक्षात घेतलं पाहिजे. ज्या गर्भवतींना आपल्या मनाविरुद्ध गर्भ वाढवावा लागतो अर्थातच त्यांची मनस्थिती गर्भधारणा आनंदाने स्वीकारलेल्यांच्या तुलनेत स्थिर असण्या शक्यता कमी.

आम्ही अभ्यासिलेल्या स्त्रियांची, तीन गटांत विभागणी केली.

१) पहिलटकरीण – गर्भधारणेचा अगदी पहिला अनुभव

२) अनुभवी गर्भवती स्त्रिया, ३) अशी गर्भवती, जिला पूर्वी गर्भधारणा आणि अपत्यजन्माच्या वेळी काही त्रासदायक अनुभवातून जावं लागलं. उदाहरणार्थ, पूर्वीचे वारंवार झालेले गर्भपात, पूर्वीचं सिझेरियन, बाळाचा गर्भावस्थेत असतानाच मृत्यू, पूर्वीची एकापेक्षा जास्त गर्भधारणा आणि बाळंतपणाचा अनुभव पण एकही बाळ जिवंत नाही अशी परिस्थिती वगैरे. या तिन्ही गटातील गर्भवती स्त्रियांची मानसिक अवस्था वेगळी वेगळी असू शकते, याची जाणीव गर्भवती स्त्रीच्या कुटुंबीयांना आणि डॉक्टरांना असली पाहिजे.

सुरुवातीला आपण पहिल्या गटातील (पहिलटकरीण) स्त्रियांची मन:स्थिती समजावून घेण्याचा प्रयत्न करू. कोणत्याही गोष्टीचा पहिला अनुभव हा बऱ्याचदा आयुष्यभर लक्षात राहातो. पहिली गर्भधारणादेखील या नियमास अपवाद ठरू नये. नव्याने लग्न झालेल्या मुलींच्या मनावर सहसा तीन कारणांमुळे ताण असतो. एक, अनोळखी असणाऱ्या सासरच्या मंडळींशी जुळवून घेण्याचा ताण, दुसरा, शारीरिक संबंधांबद्दल वाचलेलं, ऐकलेलं असतं पण हा तसा हवाहवासा वाटणारा, अनुभव प्रत्यक्ष कसा असेल याबद्दलची कुतूहल वजा भीती आणि तिसरा म्हणजे या दोन गोष्टींची सवय होईपर्यंत जर ‘दिवस गेले’ तर ताणामध्ये भर पडते. या परिस्थितीत मनात संमिश्र भावना असतात. एकीकडे गर्भधारणेचा आनंद आणि दुसऱ्या बाजूला जबाबदारीचं ओझं. पाहता पाहता, लग्नानंतर काही महिन्यात, तसं बिनधास्त आयुष्य जगणाऱ्या एका तरुण मुलीचं रूपांतर, एक जबाबदार स्त्री किंबहुना ‘आई’मध्ये होण्यास सुरुवात होते. या बदलेल्या भूमिकेचा, ती किती मनापासून स्वीकार करते यावर गर्भावस्थेतील तिची मनस्थिती अवलंबून असते. आजकाल नवं विवाहित तरुणींना, गर्भधारणा की करियर याची निवड करताना प्रचंड मानसिक त्रास होत असताना आपण पाहतो. कधी ना कधी गर्भधारणेच्या अनुभवातून जायचंच आहे तर मनाला मारून तिला करियरशी तडजोड करावी लागते. पहिलटकरणीला सगळं काही सुखरूप पार पडेल का नाही याची हुरहुर शेवटपर्यंत असते. गर्भावस्थेच्या पहिल्या तीन महिन्यांत सर्वसाधारणपणे ५० टक्के स्त्रियांना मळमळ, उलटी, चक्कर येणे, वास सहन न होणे असा त्रास होतो. या त्रासाचं प्रमाण पहिलटकरणीत, अनुभवी गर्भवती स्त्रियांच्या मानाने थोडं जास्त असतो. हा त्रास का होत असतो याचं नक्की कारण सांगता येत नाही. गर्भवस्थेत वाढलेली हार्मोन्स किंवा बी ६ जीवनसत्त्वाची कमतरता हे कारण असावं असं म्हणतात. या सोबत ज्या गर्भवती स्त्रियांच्या मनावर कोणत्याही कारणांमुळे ताण असतो, सतत एक प्रकारची बेचैनी असते, अशा स्त्रियांमध्ये मळमळ, उलटीचं प्रमाण जास्त असतं असं आढळून आलं आहे. कधी कधी त्यांना हा त्रास खूप जास्त होतो, पहिल्या तीन महिन्यांनंतरदेखील तो चालू राहातो. विशेषत: लग्नानंतर अनेक वर्षांनंतर ‘दिवस गेले’ असलेल्या स्त्रियांना अर्थातच अत्यानंद होतो. भावनेची ही उत्तेजित अवस्थादेखील मळमळ, उलटी जास्त होण्यासाठी कारणीभूत ठरते.

चंद्रकला सोनवणे नावाच्या गर्भवतीच्या बाबतीत असाच अनुभव आला. तिचं लग्न होऊन १० वर्ष झाली तरी, तिला गर्भ राहात नव्हता. सर्व प्रकारच्या तपासण्या आणि उपचार करूनदेखील तिला काही उपयोग झाला नाही. आपल्याला आता मुलाबाळाशिवायच आयुष्य काढावं लागणार या भावनेने ती नेहमी उदास राहात असे. निसर्गाने एके दिवशी चमत्कार केला आणि तिची ‘पाळी चुकली’, तपासणी करून पाहिल्यानंतर, तिला दिवस गेल्याचं लक्षात आलं. काही दिवसात तिला मळमळ, उलटीचा त्रास सुरू झाला. त्यासाठी तिच्यावर आवश्यक तो उपचार करण्यात आला. उलटीचा त्रास केलेल्या उपचाराला जुमानत नव्हता, म्हणून तिला रुग्णालयात दाखल करून, काही रक्त, लघवीच्या तपासण्या केल्या. सर्व रिपोर्ट्स नॉर्मल. उपचार बदलून पाहिले तरी उलटय़ा थांबत नव्हत्या. एक प्रयोग म्हणून आम्ही तिचे सर्व इंजेक्शन, सलाइन वगैरे उपचार बंद करून, तिला मन शांत होण्याच्या गोळ्या सुरू केल्या. चोवीस तासात उलटीचं प्रमाण कमी झालं आणि अठ्ठेचाळीस तासात तर उलटय़ा पूर्णपणे बंद झाल्या. चंद्रकलाच्या मनाच्या अवस्थेत आकस्मिक बदल झाला. तिचं मन उदासीन अवस्थेतून अचानक अतिआनंदाच्या अवस्थेत गेलं. हा बदल तिच्या मनाला झेपला नाही. मन अशांत झाल्यामुळे उलटय़ा चालू होत्या आणि मन गोळ्यामुळे का होईना शांत झालं आणि उलटय़ा थांबल्या.

आमच्या अभ्यासात, ४८ टक्के स्त्रिया या पहिलटकरीण होत्या. मळमळ, उलटीचं प्रमाण याच गटात सर्वाधिक होतं. मळमळ, उलटीचा त्रास आणि गर्भवतीच्या मनाच्या स्थिरतेवर विपरीत परिणाम करणाऱ्या काही कारणांचा संबंध आहे का, या आकडेवारीचा अभ्यास केला असता, संबंध असू शकतो असं लक्षात आलं. ज्या गर्भवतींना असा त्रास झाला त्यापैकी ७५ टक्के स्त्रियांच्या मनात आपल्याला बाळंतपणाच्या कळा सहन होतील का नाही, अशी भीती होती. अगदी बारीकसारीक कारणावरून चट्कन भावनाविवश होऊन डोळ्यात पाणी येण्याचा स्वभाव असणाऱ्या ६६ टक्के स्त्रियांना मळमळ, उलटीचा त्रास होता. ज्यांना विशेष कौटुंबिक आधार नव्हता, ज्यांना काही कारणांमुळे झोप अपुरी होती आणि ज्या स्त्रिया आपल्या मनाविरुद्ध गर्भ वाढवत होत्या, अशा रुग्णांमध्ये मळमळ, उलटीचं प्रमाण अधिक होतं, ते नेहमीच्या औषधोपचाराला जुमानत नव्हतं आणि तो त्रास काही अशा रुग्णात पहिल्या तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी होता.

मानसिक ताण हा गर्भावस्थेतील पहिल्या तीन महिन्यांत आणि शेवटच्या तीन महिन्यांत जास्त असतो असं आढळून आलं आहे. शेवटच्या तीन महिन्यांत तिच्या मनात आपलं बाळंतपण नॉर्मल होईल का सिझर करावं लागेल याचा गोंधळ असतो. आमच्या अभ्यासात जवळपास ५७ टक्के पहिलटकरणीच्या मनात असा गोंधळ आढळून आला. गर्भावस्थेत कुटुंबातील कोणती व्यक्ती मानसिक आधाराच्या दृष्टीने तुम्हाला जवळची वाटते या प्रश्नाचं उत्तर ‘नवरा’ असं बहुतांश पहिलटकरणींकडून मिळालं. या यादीत आईचा क्रमांक नवऱ्याच्या नंतर आणि सासूबाईंचा सगळ्यात शेवटी, असं आमच्या अभ्यासात आढळून आलं.

दुसऱ्या आणि तिसऱ्या गटातील गर्भवती स्त्रियांच्या मनातील अंतरंगाचे पैलू आणि या बाबतीतली डॉक्टरांची, नातेवाईकांची भूमिका काय असली पाहिजे याची चर्चा पुढील (२६ मे) भागात.

atnurkarkishore@gmail.com

chaturang@expressindia.com