12 July 2020

News Flash

अचपळ मन माझे

काही ठिकाणी मनाला अकरावे इंद्रिय मानले आहे

केतकीला आता आपल्या मनात सतत काहीतरी संवाद चालू असतो हे हळूहळू कळायला लागले होते. त्याबाबतची जागरूकताही यायला लागली होती. पण आता मन म्हणजे नक्की काय हे जाणून घ्यायची उत्सुकता लागली. म्हणून तिने अभ्यास करायला सुरुवात केली. प्रथम तिला तो कठीण वाटला, पण नेटाने तिने अभ्यास चालू ठेवला आणि तिची त्यातली रुची वाढू लागली..

मन एक इंद्रिय आहे. पाच ज्ञानेंद्रिय, पाच कर्मेद्रिय अशी दहा इंद्रिये आहेत. काही ठिकाणी मनाला अकरावे इंद्रिय मानले आहे तर काही ठिकाणी मनाला उभयेन्द्रिय म्हटले आहे. त्या ठिकाणी मनाची गणना ज्ञानेंद्रियात केली आहे तसेच कर्मेद्रियात पण केली आहे. पाच ज्ञानेंद्रियांमुळे आपल्याला ऐकू येते, स्पर्श कळतात. दिसते, चव कळते आणि वासाचे ज्ञान होते, पाच कर्मेद्रिय, ज्याने आपण वेगवेगळ्या क्रिया करतो. हात पाय आदी कर्मेद्रियांनी काम करण्यासाठी, तसेच ज्ञानेंद्रियांनी ऐकणे, वास घेणे, पाहणे आदी गोष्टींचे ज्ञान करून घेण्यासाठी मनाची उपस्थिती तिथे असणे गरजेचे आहे. मनाच्या लक्षणात म्हटले आहे की ‘लक्षणं मनसो ज्ञानस्याभावो भाव एव च’ म्हणजे ज्ञान होणे किंवा न होणे हे मनावर निर्भर करते. कसे ते आपण बघू या.
केतकीला पंधरा मिनिटांसाठी बाहेर जायचे होते. तिने कुकर लावला. लेकाला, आदित्यला तिने तीन शिट्टय़ा झाल्यावर गॅस बंद करायला सांगितला आणि ती घराच्या बाहेर पडली. इथे आदित्य व्हिडीओ गेम खेळण्यात दंग झाला होता. केतकी घरी आली तेव्हा जळका वास घरभर पसरला होता. तिला क्षणार्धात परिस्थितीची कल्पना आली. कुकर खालचा गॅस चालूच होता. तिने चिडून आदित्यला हाका मारायचा सपाटा लावला. आधी स्वयंपाकघरात जाऊन गॅस बंद केला. एकीकडे ती आदित्यला हाका मारतच होती. त्याचा प्रतिसाद मिळत नव्हता. केतकी चिडली आणि त्याच्या समोर जाऊन उभी राहिली. तरीही त्याला कळले नाही. ही स्वारी खेळण्यातच मश्गूल. तिने शेवटी त्याला गदागदा हलवत विचारले, ‘‘अरे तुला वास येत नाही का आणि बहिरा आहेस का?
इतक्या मोठय़ाने मी तुला हाका मारते आहे, ऐकू येत नाही का?’’
आदित्य बहिरा होता का? त्याला वास येत नाही का? तर असे मुळीच नाही. पण त्याचे लक्ष नव्हते. त्याचे मन दुसऱ्या गोष्टीत गुंतले होते याचाच अर्थ असा की त्याच्या ध्यानीमनी फक्त खेळ होता. त्याचे मन खेळात होते, ते कानाबरोबर काम करत नव्हते. त्यामुळे त्याला कुकरच्या शिट्टय़ा झालेल्या कळल्या नाहीत. आईच्या हाका ऐकू आल्या नाहीत. मन नाकाच्या वास घेण्याच्या कार्याबरोबर जोडले गेले नव्हते. म्हणून कुकर जळल्याचा वास आला नाही. तो खेळण्यात इतका एकाग्र झाला होता की त्याला आजूबाजूच्या गोष्टींचे भान नव्हते.
केतकीला वाटले, ही एकाग्रता या मुलाची अभ्यास करताना कुठे जाते कळत नाही. आता हा मुलगा अर्धा तास एके ठिकाणी बसून खेळतोय. पण अभ्यासाला काही अर्धा तास सलग बसू शकत नाही. या विचाराशी ती थबकली. मकरंद तिला म्हणायचा, गाणे गाताना तुला कसलेही भान राहात नाही. एके ठिकाणी बसून तीन तीन तास रियाज कशी करू शकतेस. हेच तुला संगणकासमोर पंधरा मिनीटे बसता येत नाही. मला तू सगळी माहिती देतेस खरी पण मला तुझी प्रेझेन्टेशन बनवायला लागतात. आता केतकीला आदित्यचे अभ्यासासाठी न बसणे आणि तिचे कॉम्प्युटरसमोर न बसणे, आदित्यचे खेळण्यात रमणे आणि तिचे गाण्यात हरपून जाणे यात साम्य दिसायला लागले. तसेच मकरंदला घोडेस्वारी करायला खूप आवडायचे. ते त्याचे पॅशन होते. केतकीने ठरवले की जसे आपण आदित्यला सलग अभ्यास करायला सांगतो त्याचप्रमाणे मीही सलग कॉम्प्युटरसमोर बसून माझे प्रेझेन्टेशन करायचा प्रयत्न करेन. पहिल्यांदा जेमतेम दहा मिनिटे बसू शकली. त्या वेळीसुद्धा संध्याकाळी करायचा स्वयंपाक, आदित्यचा अभ्यास असे अनेक विचार तिचा पिच्छा सोडत नव्हते. तिला ‘अचपळ मन माझे’ म्हणजे काय हे चांगलेच उलगडायला लागले होते. विचार मनात आले तरी परत ती आपले काम करायला सुरुवात करायची. हळूहळू सरावाने ती चक्क सलग कॉम्प्युटरवर बसून स्वत:ची प्रेझेन्टेशन स्वत: बनवू लागली.
मकरंदसाठी घोडेस्वारी म्हणजे ध्यान लावण्यासारखे आहे. ध्यान लागणे म्हणजे निर्विचारता. ध्यान लागलेलं असताना मनात कोणतेही विचार नसतात. मग मकरंद घोडेस्वारी करतो तेव्हा त्याच्या मनात कोणतेच विचार नसतात असे होते का? तर तसे होत नाही पण त्याचे संपूर्ण लक्ष केंद्रित झालेले असते ते एकाच गोष्टीवर. आदित्यची खेळण्यातली एकाग्रता किंवा केतकीचे भान हरपून गाणे, मकरंदचे घोडेस्वारीला ध्यान म्हणणे या सगळ्या गोष्टीतील साम्य म्हणजे तिघांची त्या त्या विषयातली रुची. आणि त्या वेळी त्याच्या डोक्यात फक्त एकच विचार आहे. खेळण्याचा, घोडेस्वारीचा किंवा गाण्याचा. खरे तर अशीच एकाग्रता अर्जुनाची पोपटाच्या डोळ्याला लक्ष्य बनवताना होती. त्यामुळे त्याला आजूबाजूचे काही दिसत नव्हते. आपणही आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी खूप समरस होऊन करतो. अगदी योगात सांगितले आहे ना अगदी तसेच प्रयत्न शैथिल्यात, म्हणजे अगदी सहजतेने करतो, ते करताना कष्ट जाणवत नाहीत. त्याचा शीणपण जाणवत नाही. ती गोष्ट करताना आपण त्याचा आनंद उपभोगतो. करून झाल्यावरही एक प्रकारचे समाधान जाणवते. यालाच आपण छंद म्हणतो.
आपल्याला रोजच्या जीवनात अनेक अशा गोष्टी करायला लागतात ज्या आपल्याला अजिबात करायच्या नसतात किंवा त्या करायला आवडत नाही. त्या गोष्टी करणे आवश्यक असते. आणि त्या करायला मात्र आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतात. त्यात पण एक मेख अशी आहे की त्या वेळी आपण आपल्याशी बोलत असतो मला हे करायला न अजिबात आवडत नाही. कटकट आहे हे करणे म्हणजे. वैताग. कंटाळा. इथे आपण आपला संवाद बदलून बघू यात का? जसे, ठीक आहे हे काम मला आवडत नाही पण करायचे आहे तर कटकट करून करण्यापेक्षा त्यात शंभर टक्के लक्ष देऊन करू. कदाचित ते काम आवडायला लागेल. त्यात पायरी पायरीने जाऊ. ते काम जर सावकाश करायचे असेल तर पहिल्यांदा पाचच मिनिटे करू नंतर हळूहळू त्याची वेळ वाढवू. प्रयत्न तर करायला लागू या.
madhavigokhale66@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2016 1:34 am

Web Title: dialogue with yourself
टॅग Chaturang
Next Stories
1 कृती आधी विचार..
2 ध्रुवबाळाच्या गोष्टीचा मथितार्थ
3 आपण आपणातें पावे
Just Now!
X