.. अस्मिताला लागलीच तिच्या मनात चाललेल्या खळबळीची जाणीव झाली. आणि आपण स्वत:शी काय बोलतो याची जाणीवपूर्वक दखल ती घेऊ  लागली. महत्त्वाची गोष्ट लक्षात आली ती म्हणजे परिस्थितीपेक्षा आपण स्वत:शी जे बोलतो त्यानं सगळ्यात जास्त तणाव वाढतो आणि मग अति झाल्यावर डोकेदुखी, पित्त वाढणं, छातीत धडधडणं अशा अनेक लक्षणांतून तो बाहेर पडतो. स्वसंवादातून तणावाचं कारण शोधून तो कमी होण्यासाठी तोडगे शोधायला हवेत.या बदललेल्या विचारांमुळे तणावांचं व्यवस्थापन करणं सोपं असल्याचं अस्मिताच्या लक्षात आलं.

अस्मिताचा जर्मनीत आता शेवटचा महिना राहिला होता. प्रोजेक्ट द्यायला फक्त दहा दिवस उरले होते आणि परीक्षेला २० दिवस राहिले होते. प्रोजेक्टची तिची पार्टनर, डॅनिएलाबरोबर काम करणं कधी कधी तिला खूप जड जायचं. प्रोजेक्टसाठी खूप वेळ द्यायला लागायचा. त्यामुळे तिला परीक्षेच्या अभ्यासासाठी पाहिजे तितका वेळ मिळायचा नाही. साहजिकच ताण वाढत होता. आता आपल्याबरोबर आई असायला हवी होती असं तिला वाटलं. परत घराची आठवण येऊ  लागली. कोणत्याही प्रकारचा ताण आला की तिला घरची आठवण येई. घरची आठवण आली की अभ्यास नीट व्हायचा नाही. चुका व्हायच्या. मग अजूनच ताण वाढत जायचा. हे दुष्टचक्र चालू व्हायचं.

पण एक मात्र झालं, इतक्या दिवसांत या दोघांचा संबंध तिच्या लक्षात आला होता.. तिने आतापर्यंत जे वाचलं होतं ते प्रत्यक्षात अमलात आणायला सुरुवात केली होती. तिने प्रथम मनात येणाऱ्या विचारांकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. आपण स्वत:शी काय बोलतो याची जाणीवपूर्वक दखल घेऊ  लागली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तिच्या लक्षात आली. ‘परिस्थितीपेक्षा आपण स्वत:शी जे बोलतो त्यानं सगळ्यात जास्त तणाव वाढतो. मला जेवढा ताण येतो तेवढा डॅनिएलाला येत नाही. परिस्थिती एकच आहे. पण तिला खूपच कमी तणाव जाणवतो तर मला जास्त. प्रत्येक गोष्टीकडे ती ज्या दृष्टिकोनातून बघते त्यामुळे तिला माझ्यापेक्षा कमी ताण जाणवत असणार. मलाही माझा दृष्टिकोन प्रत्येक वेळी तपासून पाहिला पाहिजे. मी कुठे तरी माझ्या प्रोजेक्ट आणि परीक्षेला जीवन-मरणाचा प्रश्न बनवला आहे. अर्थातच या दोन्ही गोष्टी सोप्या नक्कीच नाहीत. त्यासाठी कष्ट हे घ्यावे लागणारच. त्यामुळे स्वत:शी बोलून तर बघू की काही ताण चांगलं काम होण्यासाठी आवश्यकही असतात. पण तो दुष्परिणाम होण्याइतपत वाढू द्यायचा नाही. नाही तर प्रेशर वाढल्यावर जशी कुकरची शिट्टी होते आणि वाफ बाहेर पडते तसंच ताण अति झाल्यावर डोकेदुखी, पित्त वाढणं, छातीत धडधडणं अशा अनेक लक्षणांतून ताण बाहेर पडतो. म्हणून ताण कोणत्या कारणाने निर्माण होतो ते कळून घ्यायचं. ते खरंच ताणाचं कारण आहे का आपणच निर्माण केलं आहे ते बघायचं. तो कमी होण्यासाठी तोडगे शोधायचे.’ या बदललेल्या विचारांमुळे अस्मिताला होणाऱ्या त्रासाची तीव्रता कमी होत होती. त्रास कमी झाला की तिचा आत्मविश्वास वाढायचा. कामही चांगलं व्हायचं. अंगात एक प्रकारचं चैतन्य संचारायचं.

एकदा डॅनिएला आणि तिच्यात एकवाक्यता येत नव्हती. त्यांच्यात वादविवाद झाला नाही, पण दोघींमध्ये विचित्र प्रकारचा ताण निर्माण झाला. डॅनिएला ‘आजच्या दिवसापुरते हे काम थांबवू या’ असं म्हणून निघून गेली. अस्मिताला तिचा खूप राग आला. ‘डॅनिएला माझ्यावर वर्चस्व गाजवायला बघते आहे, तिची दादागिरीच चालली आहे.’ असं डॅनिएलाविषयी तिच्या मनात आलं. पण अस्मिताला लागलीच तिच्या मनात चाललेल्या खळबळीची जाणीव झाली. तिने स्वत:चे संवाद तपासून बघितले. तिने स्वत:च्या मनात केलेल्या विधानांची फेरतपासणी केली. ‘मी आता जी काही विधानं डॅनिएलाविषयी मनात मांडली त्यात किती तथ्य आहे? की रागाच्या भरात ही वाक्ये मनात येत आहेत? तिच्याविषयी एक अढी निर्माण करून ठेवली आहे. यात प्रोजेक्ट वेळेत होत नाही आहे. त्यामुळे एक प्रकारची निराशा मनात आहे. यामागे अजून एक कारण आहे ते म्हणजे मी मला भारतीय असल्याने स्वत:ला कमी लेखते आहे. पण असं वाटायचं खरं तर काहीच कारण नाही. कारण येथील प्रोफेसर, बाकीच्या विद्यार्थ्यांनी, अगदी डॅनिएलानेसुद्धा माझ्या चांगल्या कामाचं दिलखुलासपणे कौतुक केलेलं होतं.’

या विचारात तिची १०-१५ मिनिटं गेली. बदल म्हणून प्रोजेक्टचा नाही तर परीक्षेचा अभ्यास तरी करू या, असा विचार करून ती परत अभ्यासाला बसली. ती नुसतीच वाचत होती. तिला काहीही समजत नव्हतं. परत तिच्या मनाला पूर्वीसारखे विचार पोखरू लागले. ‘मला काहीच येत नाही आहे. उगाच इथे आले. भारतात जाऊन माझं हसं होणार. इथे येऊन काय शिकले तर शून्य.. मला का काही जमत नाही आहे? ही परिस्थिती बदलली नाही तर?’ अस्मिताला एकदम हतबल झाल्यासारखं वाटू लागलं. ती खोलीत फेऱ्या घालू लागली. त्या तणावात तिने दोन केक खाल्ले, दोन कप कॉफी प्यायली. थोडं पोटात गेल्यावर तिच्या लक्षात लक्षात आलं, ‘मी आणि डॅनिएलाने सलग चार तास अभ्यास केला. सकाळपासून दोघीही जणी फक्त एक कप कॉफीवर होत्या. आता दुपारचे तीन वाजत आले होते. मी जेवायचे सोडून केक आणि कॉफी घेतली. पोटात जर अन्नाचं इंधन नसेल तर डोकं कसं चालणार? लहानपणी आजी म्हणायची, ‘पोट शांत असलं की डोकं पण शांत राहातं.’ लहानपणापासून ऐकते आहे, पण आचरणात काही आणत नाही. आजपासून हे जंक फूड खाणं बंद करायला हवं.

सकाळी नाश्ता  करायला हवा. डॅनिएलाला पण नाश्ता  द्यायला हवा होता. आता ती वादविवाद न घालता उद्या काम करू या असं म्हणून गेली. तिने स्वत:ला आणि मलाही शांत होण्यासाठी आणि विचार करण्यासाठी योग्य तो वेळ दिला. कौतुक आहे खरं तर तिचं. पण मी बहुतेक परत परत एकाच दृष्टिकोनातून तिच्याकडे पाहाते आहे. एकमेकींचं जुळायला थोडा वेळ तर दिला पाहिजे ना. १०० टक्के तर कोणाचंच जुळत नाही. कित्येक वेळा माझ्याही मनात संभ्रम असतो. एक प्रकारचा आपला आपल्याशीच वाद चालू असतोच की? हा ताण कमी करायचा असेल तर हे असं होणार हे मान्य करायला हवं. डॅनिएलाचे जे चांगले गुण आहेत त्याच्यावर फोकस करायला हवं. ज्या मुद्दय़ांवर पटत नाही त्याविषयी ती स्पष्ट बोलते, ते योग्यच आहे. जे बरोबर नसेल ते मान्य करून त्यात सुधारणा करायला हव्यात. जर खरोखरच माझा अहंकार आड न येता मुद्दे पटले नाहीत, तर ती सांगते त्याप्रमाणेच मीही तिला स्पष्ट सांगत जाईन. असं करून आमच्यातला अदृश्य ताण कमी व्हायला नक्की मदत होईल.’ अस्मिताने तिला फोन करून ‘जेवलीस का? ठीक आहे का? काळजी घे.’ अशी चौकशी केली. दोघींच्या छान गप्पा झाल्या. जणू काही दोघींच्यात कधी काही घडलेच नव्हते. अस्मिताने थोडं खाऊन घेतलं. एक डुलकी काढली.

उठल्यावर प्रथम तिनं अभ्यासाचं आणि दिवसभराच्या कामाचं एक विस्तृत वेळापत्रक बनवायला सुरवात केली. ‘रात्र थोडी सोंगं फार’ अशी आपली अवस्था झाली आहे हे तिला जाणवलं. तरीही तिने प्राधान्यक्रमानं एक वेळापत्रक तयार केलं. ती सकाळी लवकर उठून अभ्यास करी. तेव्हा चांगला अभ्यास होतो म्हणून कठीण विषयांचा अभ्यास तेव्हा करायचा, पण त्या आधी ध्यान आणि शवासन करायचं. तासाभराच्या अभ्यासानंतर पाच मिनिटांचा का होईना ब्रेक घ्यायचा. संध्याकाळी डॅनिएलाच्या ग्रुपबरोबर फुटबॉल खेळायला जायचं. या वेळापत्रकात महत्त्वाच्या गोष्टी होत्या.

दुसऱ्या दिवशीपासून सकाळी लवकर उठून अंघोळ करून ती ध्यानाला बसू लागली. डोक्यात विचार यायचे, पण यावेळी तिनं विचार यायलाच नको हा दृष्टिकोन बदलून विचार आले तरी हरकत नाही असा दृष्टिकोन ठेवला होता. आतापर्यंत आपले विचार योग्य की अयोग्य, विवेकी की अविवेकी हे ठरवायला शिकली होती. त्याची छाननी नकळत करायची. ध्यानात किंवा शवासनात आलेल्या विचारांना न टाळता त्यांच्याविषयी नंतर बघू असे म्हणे आणि श्वासावर लक्ष ठेवी. श्वासावर लक्ष केंद्रित करायचा अट्टहास नसे. त्यामुळे लक्ष विचलित झाले तरी ती परत श्वासावर लक्ष आणत असे आणि म्हणजेच श्वास पाहात असे. या सगळ्याचा परिणाम असा झाला की मनात आलेल्या स्वत:च्या विचारांकडे त्रयस्थपणे पाहू शकत असे. आठवडाभरातच एखाददोन मिनिटे तरी मनात कोणतेही विचार नाहीत आणि खूप शांत वाटण्यापर्यंत तिची प्रगती झाली.

चौरस पौष्टिक आहार, कमीत कमी सहा तासांची झोप, विश्रांती, विवेकी दृष्टिकोन, मतातील लवचीकता, प्राधान्यक्रमाने कामं करणे, मोकळा संवाद, खेळ, योगाभ्यास, घरातल्यांची साथ या सर्वामुळे तिला ताण-तणावांचं व्यवस्थापन करणं सोपं गेलं.

madhavigokhale66@gmail.com