04 December 2020

News Flash

हवा थोडा संयम, चिकाटी नि जिद्द!

तिच्यासाठी आणि पालक म्हणून आमच्यासाठीही!

गौरीला अलीकडेच दोन महत्त्वाचे पुरस्कार मिळाले, तिच्यातल्या गतिमंदत्वावर मात करत तिनं ते मिळवले याचा आनंद आहे. एक होता केंद्र सरकारच्या, सामाजिक आणि न्याय अधिकारता मंत्रालयाचा, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते देण्यात आलेला ‘रोल मॉडेल’ पुरस्कार तर दुसरा होता, उद्योगक्षेत्रातील महनीय व्यक्तिमत्त्व डॉ. बाबा कल्याणी यांच्या हस्ते, डॉ. मोहन आगाशे यांच्या सूचनेनुसार मिळालेला ‘पुणे प्राईड – एक्सलन्स इन स्पोर्ट्स’ पुरस्कार. गौरीची ही प्रगती नक्कीच आनंद देणारी असली तरी हा प्रवास सोपा कधीच नव्हता.. तिच्यासाठी आणि पालक म्हणून आमच्यासाठीही!

गौरीचा जन्म १९९० चा. तिच्या जन्मानंतर काही दिवसांतच मला तिच्यातल्या गुणसूत्रांतील दोषांबद्दल समजलं आणि त्यामुळे पुढे येणाऱ्या जबाबदाऱ्यांची जाणीवही झाली. ज्या दवाखान्यात तिचा जन्म झाला तिथल्या डॉ. मुजुमदार यांचं गतिमंद मुलांना मोठ्ठं करताना काय करावं आणि करू नये याबद्दलचं मार्गदर्शन मला पुढच्या काळासाठी खूप उपयुक्त ठरलं. तिची मानसिक आणि शारीरिक वाढ दोन्ही महत्त्वाची होती. त्यासाठी माझी दुहेरी कसरत सुरू झाली. तिच्याशी खूप गप्पा मारणं हे तिच्या मानसिक वाढीसाठी आणि रोज योग्य पद्धतीनं सकाळ-संध्याकाळ मालिश करणं तिच्या शारीरिक वाढीसाठी खूप महत्त्वाचं होतं. डॉक्टरांचं म्हणणं मी तंतोतंत पाळत होते.

सकाळचं मालिश झालं की आम्ही उन्हात उभं राहून  छान गाणी म्हणायचो आणि गप्पा मारायचो. त्यामुळे झालं काय की तिच्या शब्द-अंक संख्येत भर पडू लागली. गौरीला शाळेत घालण्याची वेळ आली तेव्हा आम्ही जाणीवपूर्वक तिला दोन शाळांमध्ये दाखल केलं.  तिला सामान्य मुलांमध्ये मिसळता यावं यासाठी सामान्य शाळेत आणि स्पेशल स्किल्स शिकता यावेत यासाठी विशेष शाळेत दाखल केलं. त्यावेळी माझी धावपळ झाली असली तरी तिच्या प्रगतीत याचा नक्कीच फायदा झाला.

गौरी पाच वर्षांची असताना तिला एक छोटी बहीण मिळाली. खूप विचारांती आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं मी आणि गौरीच्या बाबांनी हा निर्णय घेतला होता. नव्या बाळाच्या जन्मामुळे म्हणजे पल्लवीच्या आगमनामुळे आम्हाला अपेक्षित असलेला फरक गौरीमध्ये जाणवायला लागला. गौरीच्या सगळ्याच गोष्टींमध्ये मी पल्लवीला सामावून घेतलं. म्हणजे गौरीचा नाच असो वा अभ्यास, किंवा अन्य काही पल्लवीला तिला शिकवायला सांगायचे, बाहेर कुठे खेळायला गेल्या तर सांभाळायला सांगायचे त्यामुळे ती गौरीची ताईच झाली. त्या दोघींतले प्रेमाचे बंध अधिक दृढ होत गेले.

गौरी १० वर्षांची असताना डॉ. शारंगपाणी यांच्या सल्ल्यानुसार तिला प्रथम नाच आणि नंतर पोहणं शिकवायला सुरुवात केली. या दोन्ही गोष्टींमुळे तिची एकाग्रता आणि तोल या गोष्टी खूपच सुधारल्या. सगळ्यात जास्त सुधारली ती तिची प्रतिकारशक्ती! सतत त्रास देणाऱ्या सर्दी – खोकल्याला तिनं राम-रामच केला आणि प्रगतीचा आलेख वरच्या दिशेनं सुरू झाला. गौरी उत्तम जलतरणपटू झाली. २००३ मध्ये शाळेतील (दिलासा केंद्र) शिक्षकांमुळे गौरी स्पर्धेत उतरली. नाचाच्या गुरूंमुळे ‘पुणे फेस्टिवल’च्या मंचावर तिने आपली कला सादर केली. दोन्ही ठिकाणी अपेक्षेपलीकडील यश मिळाल्यानं तिचा आणि आमचाही उत्साह वाढला आणि बघता बघता ती पार आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये उतरून बक्षीस पटकावून आली. समुद्रातील स्पर्धा सुरू झाल्या, हळूहळू अंतर वाढवत तब्बल १९ किमी. पर्यंतच्या स्पर्धामध्ये तिनं बक्षिसं मिळवली.

एकाच वर्षी गौरीनं १० वीच्या दिल्ली बोर्डाची आणि एमएस-सीआयटी या दोन्ही परीक्षा मन लावून अभ्यास करून उत्तम प्रकारे पार केल्या. तिच्या या यशामुळं तिला स. प. महाविद्यालयात सहजगत्या प्रवेश मिळाला. महाविद्यालयातील शिक्षकांनी तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आम्हाला खूपच सहकार्य केलं.  एकूणच वातावरण इतकं चांगलं मिळालं की ‘समाजात मिळून – मिसळून कसं वागावं’ याचं शिक्षण आपोआप तिला मिळत गेलं. महाविद्यालयाने संमेलनात तिला नृत्य करण्याची दिलेली परवानगी असो वा तिच्या वाढदिवसाला शिक्षकांनी घेतलेला सहभाग असो, अशा प्रत्येक प्रसंगातून समाजानं दिलेली साथ आमच्यासारख्या पालकांना नक्कीच सुखावणारी होती. १२ वी उत्तीर्ण झाल्याचा आनंद आमच्याइतकाच तिच्या शिक्षकांनादेखील झाला. प्राचार्यानी तर आम्हाला निकाल लागताच बोलावून घेतलं आणि ‘गौरी आता इथेच पदवीचं शिक्षण घेणार’ असं जाहीर करून टाकलं. समाज एवढं करत आहे म्हटल्यावर पालकांचाही हुरूप वाढतो.

प्रथम वर्षांनंतर गौरीला अचानक चित्रपटात काम करायची संधी मिळाली. अर्थात तो चित्रपट (‘यलो’) तिच्याच जीवनावर (काही बदलांसहित) आधारित होता. यातील कामासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला. गौरीनं समाजशास्त्र विषयात पदवी मिळवली आहे. सध्या ती जलतरण शिकवत आहेच, मात्र स्वतंत्रपणे ‘जलतरण शिक्षक’ होण्यासाठी प्रशिक्षण घेत आहे. कुणालाही हे वाचून सहज घडलेला प्रवास वाटेल पण त्यामागे होती खडतर तपश्चर्या!

गेली १५ वर्ष गौरी नेमाने रोज अनेक तास पोहण्याचा सराव करते आहे. त्याचसोबत व्यायाम करणंदेखील अपरिहार्यच. स्पर्धेपूर्वी बाहेरचं, थंड न खाणं ही बंधनेसुद्धा आलीच. अभ्यास – नाच – पोहणं यावर लक्ष केंद्रित करायचं तर फिरायला जाणं, कार्यक्रमांना जाणं, नाटक -चित्रपट एवढंच नव्हे तर दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमांना देखील फाटा देणं हे करावंच लागतं, तिच्याबरोबर मलाही. अगदी कमी मिळत असलेल्या मोकळ्या वेळातही तिला घरातील विशेषत: स्वयंपाकघरातील छोटय़ा-मोठय़ा गोष्टी जसं चहा करणं, भाजी करणं, कुकर लावणं शिकवलं आहे. त्यामुळे तिचं कधी कुठे अडायला नको. मात्र त्यासाठी संयम, चिकाटी आणि जिद्द महत्त्वाची ठरली.

पालक म्हणून सुरुवातीला आम्ही एक गोष्ट पक्की ठरवली होती. ते म्हणजे गौरीला एक सामान्य मूल म्हणून वाढवायचं. तिच्या मर्यादांचा बाऊ करायचा नाही. या प्रवासात तिच्या बहिणीनेही आम्हाला साथ दिली. शिवाय माझं शिक्षण, प्रगती बाजूला ठेवून मुलींची प्रगती हेच मी ध्येय मानलं आणि यात गौरीच्या बाबांची साथ असल्यानं हा प्रवास आनंदाने करतेय.

गौरी गतिमंद आहे असं मानून आम्ही खचून गेलो असतो तर तिचं काय झालं असतं, याउलट तिची प्रगती हेच ध्येय मानल्यानं कुटुंबीय तर आमच्याबरोबर आहेतच, पण डॉक्टर, शिक्षक इतर अनेक लोक, समाज आमच्याबरोबर आहे. तिच्या आनंदात सहभागी होत आहेत, हेच तर पूर्णत्व आहे.

स्नेहा गाडगीळ

snehagadgil1@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2018 4:55 am

Web Title: articles in marathi on handicapped children and their parents inspiring stories
Just Now!
X