‘‘उद्यापासून सकाळी ६ ला उठून व्यायाम करायला लागा’’, ‘‘दारूची सवय सोडा’’, ‘‘रोजच्या जेवणामध्ये लोहाचे प्रमाण वाढवा’’, ‘‘सकाळच्या मजुरीचे पैसे बुडले तरी चालतील पण बाळाचे लसीकरण पूर्ण करा’’, किंवा ‘‘गाडी चालवताना हेल्मेट घाला अथवा पट्टा लावा’’ अशी उपदेशपर वाक्यं कितीही कळकळीने सांगितली तरीही ती अमलात आणणे महाकठीण वाटते. याला खरं तर फारच थोडे अपवाद असतात, आपल्याच चुकांमधून शिकून किंवा अतिशय प्रभावी समुपदेशनामुळे वर्तनबदल शक्य असतो, परंतु तो तितक्याच प्रभावीपणे टिकणेही असेच महाकठीण काम असते.

सामाजिक आरोग्याशी संबंधित योजना आखताना ही सहज मानवी प्रवृत्ती लक्षात घेतली नाही तर मोठमोठय़ा योजना फसण्याची शक्यता असते. कित्येक आरोग्य संशोधने मानवी वर्तनबदलाकडे सर्जनशीलतेने बघण्याची गरज आहे, हे दाखवून देतात. ही सर्जनशीलता अमलात आणताना जनतेची सांस्कृतिक आणि सामाजिक पाश्र्वभूमी, आर्थिक कुवत, दैनंदिन सवयी, गरजा आणि भाषा या सर्व घटकांचा बारकाईने विचार करावा लागतो. कारण कोणताही लहानसा वाटणारा बदल हा खरं तर या सर्व गुंतागुंतीच्या घटकांशी घट्ट बांधला गेलेला असतो.

कंबोडियातील एका आरोग्य योजनेचे उदाहरण पाहू या. कॅनडातील संशोधक क्रिस्टोफर चार्ल्स यांना २००९ मध्ये कंबोडियातील कंदाल भागाला भेट दिल्यावर लक्षात आले की तेथील अनेक लहान मुलांमध्ये वाढ खुंटल्याची लक्षणे दिसत होती. गर्भवती स्त्रियांमध्ये प्रसूतीच्या आधी आणि नंतर अतिरक्तस्राव होण्याच्या कित्येक घटना त्यांना पाहायला मिळाल्या. अ‍ॅनिमिया अर्थात लोहाच्या कमतरतेमुळे होणारे वेगवेगळ्या प्रकारचे आजार तेथे मोठय़ा प्रमाणात दिसून येत होते. शास्त्रीय अभ्यास असे सांगतो की कंबोडियामध्ये लोहाच्या कमतरतेमुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण स्त्रिया व लहान मुलांमध्ये सुमारे ५० टक्के इतके आहे. यावर जे उपाय सांगितले जातात त्यापैकी एक म्हणजे लोहाच्या अर्थात रक्तवाढीच्या गोळ्या घेणे व दुसरा म्हणजे अन्नातील लोहाचे प्रमाण वाढवणे. कंबोडियातील सर्व गावांमध्ये या गोळ्या उपलब्ध नसत आणि त्या स्वस्तही नसत. अनेक वेळेला त्या घेतल्याने होणाऱ्या इतर परिणामांना घाबरून रुग्ण गोळ्या घेणे टाळत असत. अन्नातील लोहाचे प्रमाण वाढवणे प्रत्येकाला सहज शक्य नसे. लोखंडी कढईत अन्न शिजवल्याने लोखंडाचे थोडे थोडे कण अन्नात मिसळतात व शरीरातील लोहाची गरज पूर्ण होण्यास मदत होते, हे डॉ. चार्ल्स जाणून होते. कंबोडियामध्ये फिरल्यावर त्यांना हेही लक्षात आले की कंबोडियन संस्कृतीत माशाला सांस्कृतिकदृष्टय़ा मोठे स्थान आहे. त्यांनी लोहाच्या गोळ्यापासून माशाच्या आकाराचा ‘लकी आयर्न फिश’ तयार केला. कोणताही पदार्थ शिजवताना किंवा सूप तयार करताना हा लोहाचा मासा त्यात १० मिनिटे ठेवायचा. त्यात थोडेसे लिंबू पिळले की शरीरात लोह शोषण होण्याच्या प्रक्रियेस मदत होते, हेही त्यांनी समजावून सांगितले. ही सोप्पी पाककृती लवकरच लोकप्रिय झाली. यात एकतर फार कष्ट नव्हते आणि त्यांच्या सांस्कृतिक बैठकीला धक्का लागलेला नव्हता. अन्न शिजवताना १० मिनिटे लोहाचा मासा अन्नात ठेवला की शरीराची जवळजवळ ७५ टक्के लोहाची गरज पूर्ण होते, असे डॉ. चार्ल्स यांचे म्हणणे आहे. २०० ग्रॅम वजनाचा हा छोटासा मासा आता कंबोडियामधील सुमारे २५०० कुटुंब व ९००० रुग्णालये वापरत आहेत. कमी किमतीत, लोकांना आपलासा वाटेल असा सोपा शोध कसा असू शकतो याचे ‘लकी आयर्न फिश’ हे अनोखे उदाहरण आहे!

असेच उदाहरण आहे हात धुण्याची प्रक्रिया सोपी करणाऱ्या टीपी-टॅप या यंत्राचे. जगामध्ये अजूनही बालमृत्यू हा एक मोठा आरोग्याचा प्रश्न आहे. त्याची कारणे अनेक आहेत, परंतु त्यातील एक महत्त्वाचे कारण म्हणजे घरातील सदस्यांनी साधे-सोपे स्वच्छतेचे नियम न पाळणे. योग्य तऱ्हेने स्वच्छ पाणी वापरणे आणि फेस होईल अशा साबणाने हात धुणे ही एक अक्षरश: जीव वाचवणारी साधीशी क्रिया आहे. बाहेरून आल्यावर, शौचास जाऊन आल्यावर आणि खाल्ल्यावर स्वच्छ साबणाने हात धुतले तर नवजात बालकांमध्ये आणि लहान मुलांमध्ये अतिसारामुळे होणारे मृत्यू ५०टक्के इतके कमी होऊ  शकतात, असे संशोधन सांगते. लहान मुलांमध्ये मृत्यूचे अजून एक प्रमुख कारण आहे श्वसनयंत्रणेचे रोग. हात धुतल्याने या रोगांचा प्रादुर्भाव १६ टक्क्यांनी कमी होऊ  शकतो. परंतु ग्रामीण भागामध्ये, जेथे घरामध्ये नळ आणि साबण सहज उपलब्ध नाही, जेथे वाट वाकडी करून हात धुवायला जावे लागते तेथे लोकांनी हात धुण्याची सवय कशी अंगीकारायची? डॉ. जिम वॉट या शास्त्रज्ञाने झिम्बाब्वेमध्ये एक वेगळा प्रयोग करून पाहिला. तेथील एका भोपळासदृश भाजीच्या पोकळीमध्ये त्यांनी पाणी भरले, काही बांबूच्या काडय़ा, साबण, पायाने वाकवता येईल अशी एक काठी, अशा सोप्या यंत्राने त्यांनी तेथील नागरिकांमध्ये हात धुण्याची सवय रुजवायचा प्रयत्न केला. हे ‘यंत्र’ बनवण्याबरोबरच त्यांनी ते सोप्या पद्धतीने हात धुणे हे का महत्त्वाचे आहे हे काही प्रासंगिक विनोद किंवा पथनाटय़ाच्या माध्यमातून लोकांना पटवून दिले. पुढे हा प्रयत्न अनेक ठिकाणी यशस्वी होऊ  लागला. लहान मुलांमध्ये हे ‘टीपी टॅप’ नावाचे यंत्र बनवण्याचे कार्यक्रम घेतले जाऊ  लागले, आणि मुलांनी स्वत: तो बनवला की मग तो वापरणे, त्याची निगा राखणे, त्यात पाणी भरणे, नवीन साबण योग्य वेळेला आणून ठेवणे अशी कामे मुले वाटून घेऊ लागली. हळूहळू मुले घरातही हे बांधावे म्हणून आग्रह धरू लागली आणि अशा रीतीने अनेक ठिकाणी या यंत्राचा प्रसार झाला. साबण, रिकामा डबा, बांबूच्या किंवा आसपास उपलब्ध असलेल्या काही लाकडाच्या काडय़ा या अत्यल्प किंवा विनामूल्य मिळणाऱ्या वस्तूंनी जर मुलांचे जीव वाचू शकत असतील, घरातील सर्वाचे स्वास्थ्य चांगले राहणार असेल आणि पुढे रोगराई झाल्यावर होणारा प्रचंड खर्च आणि कर्ज टाळता येणार असेल तर ते कोणाला नको असणार? युगांडा, थायलंड, केनिया, झाम्बिया, भारत आणि इतर अनेक देशांमध्ये या यंत्राचा वापर झाला आहे. अभ्यासातून हे सिद्ध झाले की लोकांना कुठलाही संदेश सरधोपट मार्गाने न देता त्यांना रंजकतेने, त्याच्यात सहभागी करून घेऊन जर संदेश पोहोचवला तर लोक ती सवय अंगीकारण्यास अधिक मोकळेपणाने तयार होतात.

जे-पॅल या आरोग्य आणि आर्थिक धोरणासंबंधी काम करणाऱ्या महत्त्वाच्या संस्थेने उदयपूर येथे असाच एक यशस्वी प्रयोग करून पाहिला. उदयपूर येथील खेडेगावांमध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्या स्त्रिया आपली दिवसाकाठची कमाई बुडेल म्हणून बाळांना वेळेत लसीकरणासाठी आणू शकत नसत. त्यातून लोकांचा अनुभव असा होता की अनेकदा लसीकरणाच्या दिवशी कर्मचारी वेळेवर न येणे, पुरेशा लसी उपलब्ध नसणे अशा अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागत. तेथील केवळ २२ टक्के बालकांचे लसीकरण पूर्ण झाल्याचे आकडेवारीतून दिसून आले. जे-पॅल या संस्थेने उदयपूरमधील खेडय़ातील स्त्रियांना बालकांचे लसीकरण पूर्ण केल्यानिमित्त एक किलो डाळ आणि एक स्टीलची थाळी देण्याचा प्रयोग करून पाहिला. ही भेट स्त्रियांच्या एक दिवसाच्या कमाईच्या तीन चतुर्थाश किमतीची होती. या प्रयोगाने तेथील लसीकरणाचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढल्याचे अभ्यासाअंती दिसून आले.

आरोग्याच्या सवयी या आपल्या नकळत आपल्या अंगात भिनलेल्या असतात. त्या बदलण्यासाठी आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांना कधी विचारपूर्वक बदल घडवून आणण्यासाठी झटावे लागते तर कधी तितक्याच नकळत आपसूकपणे सहजी बदल घडवून आणावा लागतो. व्यक्तीची एखाद्या सवयीवरील असलेली श्रद्धा तोडणे आणि त्याबदल्यात नवीन सवय रुजवण्यास प्रोत्साहित करणे ही एक अतिशय गुंतागुंतीची मानसिक प्रक्रिया असते. ती संवेदनशीलतेने हाताळली तर भारतासारख्या विविधतेने भरलेल्या समाजातही आरोग्यबदल शक्य होऊ शकतात. समाजमानस जाणणे, समाजाची सांस्कृतिक नस पकडणे सामाजिक आरोग्याच्या क्षेत्रात किती गरजेचे आहे, हे आता प्रकर्षांने पुढे येत आहे. पुढील काळात सामाजिक आरोग्य सुधारण्यासाठी आखलेल्या योजना या अशाच समाजमानस, समाजाची आर्थिक कुवत आणि सांस्कृतिक कल ओळखून सृजनशीलतेने आखणे गरजेचे आहे. केवळ प्रचाराच्या आणि प्रसिद्धीच्या जोरावर कोणतीही मोठी योजना आमूलाग्र बदल घडवू शकणार नाही.

मुक्ता गुंडी सागर अत्रे

gundiatre@gmail.com