News Flash

‘डी-स्ट्रीट’चे मर्म.. : महिंद्रा फायनान्स अर्थगती बदलाचा लाभार्थी

महिंद्रा रुरल हौसिंग फायनान्स या कंपनीमार्फत निम शहरी भागातील घरांसाठी वित्त पुरवठा केला जातो.

महिंद्र समूहातील बिगर बँकिंग वित्तीय कंपनी असून वाहन व ट्रॅक्टरकरिता वित्तपुरवठा हा कंपनीचा मुख्य व्यवसाय

महिंद्रा अ‍ॅन्ड महिंद्रा फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेस (महिंद्रा फायनान्स) ही महिंद्र समूहातील बिगर बँकिंग वित्तीय कंपनी असून वाहन व ट्रॅक्टरकरिता वित्तपुरवठा हा कंपनीचा मुख्य व्यवसाय असून कंपनी आपल्या महिंद्रा इन्शुरन्स ब्रोकर्स व महिंद्रा म्युच्युअल फंड या उप कंपन्यांच्यामार्फत अनुक्रमे विमा उत्पादने वितरण आणि मालमत्ता व्यवस्थापन (म्युच्युअल फंड) व्यवसायात आहे.

महिंद्रा रुरल हौसिंग फायनान्स या कंपनीमार्फत निम शहरी भागातील घरांसाठी वित्त पुरवठा केला जातो. मागील आठवडय़ात कंपनीने जाहीर केलेले चालू वित्त वर्षांच्या पहिल्या तिमाहीचे निकाल लक्षणीय आहेत. कंपनीच्या मालमत्तेत (कर्ज वितरणात) १६ टक्के वार्षिक वाढ झाली आहे. १९९१ मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीला १५ टक्कय़ांहून अधिक वृद्धी दर गाठण्यासाठी तब्बल १२ तिमाहींपर्यंत वाट पाहावी लागली. कंपनीला अनुत्पादित मालमत्तेपोटी कराव्या लागणाऱ्या तरतुदीत मागील वर्षांच्या तुलनेत २.५ टक्के वाढ झाली असली तरी मालमत्ता वाढीच्या तुलनेत ही १.३६ टक्कय़ांनी कमीच आहे. भारतातील ३,१९,४०९ खेडय़ांमध्ये व्यवसाय विस्तारलेल्या या कंपनीच्या व्यवसायाचे सूत्र ग्रामीण भारतातील खेडी व खेडय़ातून व्यवसायाच्या संधी हे आहे.

पी. चिदंबरम अर्थमंत्री असताना सरकारची धोरणे बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांच्या व्यवसायास प्रोत्साहन देणारी नव्हती. वापरलेल्या वाहनांच्या खरेदीसाठी बँकेचा वित्तपुरवठा उपलब्ध नसतो. वापरलेल्या वाहनांच्या खरेदीत व्यापारी वाहनांचा समावेश असल्याने हा व्यवसाय मोठय़ा प्रमाणावर रोजगारनिर्मिती करतो हे सरकारला पटवून देण्यास बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांची शिखर संघटना यशस्वी झाल्याने तत्कालीन पंतप्रधानांच्या मध्यस्तीने अर्थसंकल्पात या व्यवसायासाठी ३०० कोटींची तरतूद करण्यात आली. महिंद्र समूह ‘फर्स्ट चॉइस’ या नाममुद्रेखाली वापरलेल्या वाहनांच्या खरेदीविक्रीचा व्यवसाय करतो. यासाठी वित्त पुरवठा महिंद्रा फायनान्सकडून होतो.

विद्यमान सरकारची धोरणे ग्रामीण अर्थव्यवस्थेस चालना देणारी असल्याचा फायदा कंपनीच्या व्यवसायाला होत आहे. सरकारचे धोरण शेतकऱ्यांचे उत्पन्न पाच वर्षांत दुप्पट करण्याचे सरकारचे धोरण असून सरकार ग्रामीण अर्थव्यवस्थेस सहाय्यभूत ठरणारी भरीव तरतूद अर्थसंकल्पात करत असल्याचे दिसते. सरकारचे धोरण शेतीच्या यांत्रिकीकरणास चालना देणारे असल्याचा फायदा महिंद्रा फायनान्सला भविष्यात होईल.

कंपनीला केवळ वित्तपुरवठा करून व्याजाचे उत्पन्न वाढविण्यासोबत विम्याच्या माध्यमातून शुल्कआधारित उत्पन्न वाढविण्यात रस असल्याचे दिसते. वित्तपुरवठा केलेले प्रत्येक वाहन, त्या वाहनांचा मालक यांचा विमा उपकंपनीच्या माध्यमातून उतरविला जातो. मनरेगासाठी वाढीव तरतूद, ‘हर खेत को पानी’, पंतप्रधान सिंचन योजना, पंतप्रधान ग्राम रस्ते योजना या सरकारी धोरणांची महिंद्रा फायनान्स ही अप्रत्यक्ष लाभार्थी आहे.

सरकारच्या निश्चलनीकरणाचा फटका अन्य उद्योगांना बसत असताना महिंद्रा फायनान्सने यावर मात करत मागील चार वर्षांतील सर्वोत्तम तिमाही निकाल जाहीर केले. कर्जवितरणात वाढ दिसत असतानाच कर्जे मोठय़ा प्रमाणात अनुत्पादित होणार नाहीत यावर महिंद्रा फायनान्सचा भर असल्याचे दिसून येत आहे. बाजारात घसरण होण्याची वंदता असताना उज्ज्वल भवितव्य असलेला व गुंतवणुकीत माफक जोखीम असलेल्या मिड कॅप समभागाची ही शिफारस.

राजेश तांबे arthmanas@expressindia.com

(लेखक शेअर गुंतवणूकतज्ज्ञ आणि बाजार विश्लेषक आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2017 1:08 am

Web Title: advantages of choosing mahindra finance for investment
Next Stories
1 एसडब्लूपी करताना काय काळजी घ्यावी?
2 समृद्धीचा उखाणा  : फंड विश्लेषण
3 नियमित उत्पन्नासाठी एसडब्ल्यूपी
Just Now!
X