आपल्याजवळ असलेल्या शेअर्सचा जर भाव वाढला, तर भाववाढीमुळे झालेला फायदा घ्यायचा असेल तर ते शेअर्स तुम्हाला विकावे लागतील. पण लाभ देणारे शेअर्स एकदा विकले की पुन्हा महाग झाले असता विकत घेणे सहज जमत नाही.  अशा झालेला (कागदावर दिसणारा) नफा सुनिश्चित व सुरक्षित करण्यासाठी संरक्षणात्मक पुट या डावपेचाचा वापर केला जातो. आपल्या जवळ असलेल्या शेअर्सला एकप्रकारे विमा संरक्षण देण्याचा हा प्रकार आहे.
मागील अभ्यासवर्गामध्ये आपण कव्हर्ड कॉल डावपेच विचारात घेतले व त्यामध्ये दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी विकत घेतलेल्या म्हणजे आपल्या खात्यात (होिल्डग) असलेल्या शेअर्सवर लाभांश, बोनस, इत्यादी गुंतवणुकीचे सर्व फायदे घेत असता त्या शेअर्सचा कॉल विकायचा व सातत्याने सतत महिना दर महिना पसा कमावण्याचा म्हणजेच आपल्या भांडवलावर प्रत्येक महिन्याला भाडे मिळवण्याचा प्रकार अभ्यासला. परंतु सदर डावपेचामध्ये जर त्या शेअर्सचे भाव मोठय़ा प्रमाणात खाली जाणार असतील असे वाटत असेल तर कव्हर्ड कॉल लाभदायी होणार नाही. कारण कॉल विकताना मिळणारे अधिमूल्य हे जास्तीत जास्त नफा असल्याने शेअर्सचे भाव कोसळल्यामुळे होणारे नुकसान ते अधिमूल्य भरून काढू शकणार नाही. अशावेळी कोणते डावपेच आखावे लागतील हे आजच्या अभ्यासवर्गात शिकूया.
नग्न पुट खरेदी करणे, त्याचे फायदे, त्याचे तोटे इत्यादी आपण शिकलो आहोत. जर वरील प्रमाणे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी विकत घेतलेले शेअर स्वत: जवळ असता जेव्हा केव्हा शेअर्स मोठय़ा प्रमाणात कोसळण्याची शक्यता निर्माण झाली असेल तेव्हा योग्य स्ट्राईकचा पुट हा विकल्प विकत घेणे या डावपेचास संरक्षणात्मक (Married) पुट म्हणतात. पुट हा विकल्प विकत घेतले असल्याने जास्तीत जास्त तोटा हा त्या विकल्पासाठी लागणारे अल्पसे अधिमूल्य. पण नफा मात्र अमर्याद असेल, म्हणजे आपल्या जवळ असलेल्या शेअर्सला एकप्रकारे विमा संरक्षण देण्याचा हा प्रकार आहे. एकाचवेळी शेअर्स विकत घेणे व पुटचा विकल्प विकत घेणे या डावपेचास संलग्न (टं११्री)ि पुट म्हणतात. संलग्न पुट व संरक्षणात्मक पुट यामध्ये हा छोटासा फरक लक्षात घ्यावा.
संलग्न पुट व संरक्षणात्मक पुट हा एक हेजिंगचा प्रकार आहे व हा प्रकार गुंतवणूकदार व ट्रेडर्समध्ये अतिशय लोकप्रिय आहे.
आपल्याजवळ असलेल्या शेअर्समध्ये जर भाववाढ झाली तर भाववाढीमुळे झालेला फायदा घ्यायचा असेल तर ते शेअर्स तुम्हाला विकावे लागतील. व त्यामुळे भविष्यकालीन नफ्यालाही मुकावे लागेल. ज्यामध्ये फायदा झाला असे लाभ देणारे शेअर्स एकदा विकले की पुन्हा महाग झाले असता विकत घेणे सहज जमत नाही. त्यामुळे झालेला नफा सुनिश्चित व सुरक्षित करण्यासाठी संरक्षणात्मक पुट या डावपेचाचा वापर केला जातो.
येथे हे लक्षात घ्यावे की, दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी विकत घेतलेल्या शेअर्ससाठी विमा विकत घेणे यासाठी पुट विकत घेणे असा यामागे विचार आहे. म्हणजे सध्या असलेल्या किमतीपेक्षा त्या शेअर्सचे भाव जर उतरले तर मला माझ्या शेअर्समधला दिसत असलेला नफा कमी होईल किंवा नफा निघून जाईल त्यामुळे पुट खरेदी करून पुटच्या स्वरूपात त्या शेअर्सचा मी विमा उतरला आहे असे समजावे. कारण त्या शेअर्सचे भाव जर उतरले विमा स्वरूपातील पुटमध्ये मला फायदा होईल व शेअर्समधला काही प्रमाणात तोटा भरून काढेल. त्यामुळे तुम्हाला शेअर्स विकण्याचे कारण उरणार नाही.
या डावपेचाच्या वापराची मुख्य कारणे खालील प्रमाणे-
१. त्या शेअर्सची किंमत वाढत असल्यास आपणास आपल्याजवळ असलेल्या शेअर्सची किंमत वाढते त्यामुळे आपला भांडवली नफा होतो. व विम्यासाठी भरलेल्या अल्पशा अधिमूल्याचा तोटा होईल.
२. त्या शेअर्सची किंमत कमी होत असल्यास आपण विकत घेतलेल्या पुटमधून नफा होतो, हा नफा अमर्याद होऊ शकतो आणि शेअर्समधला काल्पनिक तोटा काही प्रमाणात भरून काढतो.
३. त्याचवेळी हाती असलेले शेअर्स विकत नसल्याने असलेल्या शेअर्समध्ये होणारा तोटा आपण घेत नसल्याने तो तोटा केवळ काल्पनिक असतो.
पुट विकत घेताना खालील प्रमाणे काळजी घ्यावी
१. अस्थिरता वाढण्याची शक्यता असता.
२. त्या शेअर्सचा भाव मोठय़ा प्रमाणात कमी होण्याची शक्यता असता.
३. बाजार / शेअर्स वर जाणार नसेल, किंवा रेंगाळणार नसेल, म्हणजेच जोरात कोसळणार असेल तेव्हा.
कोणता पुट विकत घ्यावे व किती विकत घ्यावे हा अभ्यासनीय प्रश्न आहे. आपल्या जवळ असलेल्या शेअर्सला पूर्णपणे सुरक्षित करण्यासाठी कोणत्या स्ट्राईकचे व किती पुट्स घ्यावे हे त्या स्ट्राईकच्या पुटच्या डेल्टा, थीटा, वेगा इत्यादी वरून ठरवावे. वाचकांनी लक्षात घ्यावे की शेअर्सचा डेल्टा १ असतो. वाचकांनी मागील अभ्यासवर्गाचे पुन्हा वाचन करावे.
या डावपेचामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण गुंतवणुकीसाठी योग्य शेअर्सची निवड करणे होय. या लेखमालेचा मुख्य हेतूही सर्वसामान्य लोकांना बँकेच्या मुदत ठेव योजनेपेक्षा कोणतीही अतिरिक्त जोखीम न उचलता शेअर बाजारामधून जास्त फायदा मिळू शकतो असा नवीन दृष्टीकोन देणे असाच आहे.
info@primetechnicals.com
(विशेष सूचना : लेखातील चालू बाजारातील शेअरचे उदाहरण केवळ संकल्पना समजून सांगण्यासाठी घेतलेले आहे. कृपया वाचकांनी हा लेखकाने दिलेला सल्ला अथवा खरेदीची शिफारस आहे असे समजू नये. तथापि योग्य सल्लागाराकडून मार्गदर्शन घेऊनच व्यवहार करावा.)