News Flash

गुंतवणुकीत समतोल राखणे महत्त्वाचे!

प्रकाश यांना मिळत असलेले त्रमासिक व्याज त्यांच्या गरजेपेक्षा अधिक आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

प्रकाश-सुषमा आणि त्यांची मुलगी श्वेता असे हे त्रिकोणी कुटुंब. प्रकाश हे सरकारी मालकीच्या तेल शुद्धीकरण आणि वितरण कंपनीतून दीड वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले. सुषमा या राष्ट्रीयीकृत बँकेत असून त्यांच्या सेवानिवृत्तीस अद्याप सात वर्षे शिल्लक आहेत. श्वेता पदवीच्या शेवटच्या वर्षांत शिकत असून पदवी मिळाल्यानंतर एखाद्या वर्षांत श्वेता यांच्या लग्नाचा बार उडविण्याचा सुषमा यांचा विचार आहे. प्रकाश यांना मिळालेल्या सेवानिवृत्ती लाभाचा विनियोग त्यांनी सोबत दिलेल्या कोष्टकातील विवरणाप्रमाणे केला आहे.

याव्यतिरिक्त प्रकाश यांनी वेळोवेळी वेगवेगळ्या कंपन्यांच्या समभागांत केलेल्या गुंतवणुकीचे आजचे मूल्य ९५ लाख रुपये आहे. गुंतवणुकीसाठी नियोजित शिल्लक २० लाखांचे नेमके काय करावे यासाठी सुषमा यांनी ‘लोकसत्ता अर्थ वृत्तान्त’कडे विचारणा केली आहे.

प्रकाश यांच्या पोर्टफोलिओचा विचार केल्यास एकूण गुंतवणुकीच्या ५८ टक्के रक्कम समभाग गुंतवणुकीत, २९ टक्के रक्कम स्थिर उत्पन्न देणाऱ्या गुंतवणूक साधनांत (मुदत ठेव आणि जीवन अक्षय-६) आणि १२ टक्के रोकड सममूल्य आहे. एकूण पोर्टफोलिओचा ढाचा पाहिला तर हा पोर्टफोलिओ आक्रमक प्रकारचा म्हणजे जोखीम स्वीकारून सरासरीहून अधिक परतावा मिळविणारा पोर्टफोलिओ आहे. जर पोर्टफोलिओवर अधिक परतावा मिळविणे हे ध्येय असेल तर पोर्टफोलिओचे सक्रिय व्यवस्थापन करणे गरजेचे असते. गुंतवणूक हे शास्त्र की कला याबद्दल नेहमीच चर्चा होत असते. काही फंडांचे अपवाद सोडल्यास बहुतांश म्युच्युअल फंड हे पोर्टफोलिओचे सक्रिय व्यवस्थापन करणारे असतात. सक्रिय व्यवस्थापन करण्यासाठी अर्थविश्लेषक आणि समभाग संशोधकांचा संपूर्ण संघच निधी व्यवस्थापकांना साहाय्य करीत असतो. हे विश्लेषक कोणती उद्योग क्षेत्रे टाळावी आणि कोणत्या उद्योग क्षेत्रात निर्देशांकपेक्षा अधिक गुंतवणूक करावी हे ठरते. ज्या उद्याोग क्षेत्रात गुंतवणूक करायची त्या कंपन्यांच्या व्यवस्थापनाशी चर्चा, कच्च्या मालाचे उत्पादक, सुटय़ा मालाचे पुरवठादार, वितरक यांच्याशी संवाद साधून गुंतवणूक करण्यापूर्वी कंपनीत गुंतवणूक करण्याबाबतचे क्षमता धोके संधी दुर्बलता यांचा अभ्यास करून पोर्टफोलिओमध्ये त्या कंपनीचे प्रमाण किती असावे हे ठरते. म्युच्युअल फंड हे वैयक्तिकरीत्या व्यवस्थापन केलेल्या पोर्टफोलिओपेक्षा अधिक सक्रिय असते. सक्रिय पोर्टफोलिओ हे नेहमीच निष्क्रिय पोर्टफोलिओपेक्षा अधिक परतावा मिळवून देत असतो. यासाठीच तुमच्या ९५ लाखांच्या पोर्टफोलिओचे व्यवस्थापन सक्रिय का असू नये या गोष्टीचा विचार होणे गरजेचे आहे.

व्यावसायिक पोर्टफोलिओ मॅनेजर हा पोर्टफोलिओचे व्यवस्थापन करताना सतत नवीन गुंतवणुकीच्या शोधात असतात. नवीन संधींचा शोध घेत असताना ‘मार्जिन ऑफ सेफ्टी’ एकूण गुंतवणुकीत रोकडीचे प्रमाण याचा विसर तो पडू देत नाही.

प्रकाश यांच्या गुंतवणुकीचा विचार केल्यास प्रकाश यांच्या पोर्टफोलिओत ३० टक्के गुंतवणूक ही ते नोकरी करीत असलेल्या कंपनीत असून संख्येने ८५ टक्के समभागांचे प्रमाण एकूण गुंतवणुकीच्या १ टक्क्यापेक्षा कमी आहे. हे पोर्टफोलिओमधील ढोबळ दोष दूर करणे आवश्यक आहे. या प्रकारच्या पोर्टफोलिओला व्यावसायिक पोर्टफोलिओ म्हणता येणार नाही. दोन एक वर्षांपूर्वी तेल वितरण कंपन्या या तोटय़ात होत्या. या कंपन्या तयार करीत असलेल्या इंधनाची खरेदीपेक्षा कमी दराने त्यांना विक्री करावी लागत होती. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे तेल वितरण कंपन्यांना नफा होऊ लागला. साहजिकच कंपन्यांच्या किमतीत वाढ झाली. प्रकाश यांच्या पोर्टफोलिओत ही तेल कंपनी अनेक वर्षांपासून आहे. या कंपनीच्या किमतीत वाढ झाल्यामुळे कधी काळी एकूण पोर्टफोलिओत  १० टक्क्यापेक्षा कमी असलेले मूल्य आज एकूण गुंतवणुकीच्या ३० टक्क्यांवर आले आहे. त्यामुळे पोर्टफोलिओच्या या कामगिरीचे श्रेय प्रकाश यांनी घेणे योग्य नव्हे. असाच एखादा समभाग प्रकाश हुडकून काढू शकत असतील तर त्यांनी नक्कीच त्या समभागात गुंतवणूक करावी. या प्रश्नाचे उत्तर अर्थातच नकारात्मकच असेल. पोर्टफोलिओचे संतुलन राखणे आवश्यक असते आणि हे काम व्यावसायिक पोर्टफोलिओ मॅनेजरच करू शकेल.

गुंतवणूक करताना रोकड सुलभता (लिक्विडिटी) हे महत्त्वाचे उद्दिष्ट असणे गरजेचे असते. तुमच्यासारखे व्यावसायिक वित्तीय नियोजकाची मदत न घेता ‘डू इट युअरसेल्फ’ विचारसरणीवर विश्वास असणारे गुंतवणुकीतील रोकडसुलभता गमावून बसतात. तुम्ही निवड केलेली तीनही गुंतवणूक साधने रोकडसुलभ नाहीत. ज्येष्ठ नागरिकत्वाच्या सीमारेषेवर असताना रोकडसुलभतेला महत्त्व देणे गरजेचे आहे. खरे तर तुम्ही सेवानिवृत्त होण्याआधी एखाद्या वित्तीय नियोजकाची मदत घेतली असती तर रोकडसुलभता आणि परतावा यांची सांगड घालून तुम्हाला गुंतवणूक पर्याय सुचविला असता. एखाद्या वित्तीय नियोजकाने नियोजन करण्यासाठी आकारलेले शुल्क हे रोकडसुलभता गमावल्यामुळे होणाऱ्या नुकसानीपेक्षा खूपच कमी आहे. प्रकाश यांना मिळत असलेले त्रमासिक व्याज त्यांच्या गरजेपेक्षा अधिक आहे. या अतिरिक्त व्याज उत्पन्नाचा विनियोग त्यांनी म्युच्युअल फंडात ‘एसआयपी’साठी करावा.

प्रकाश यांना सल्ला :

*  ५० लाखांची समभाग गुंतवणूक एखाद्या व्यावसायिक पोर्टफोलिओ व्यवस्थापकाकडे सुपूर्द करावी.

*  १० लाख रोकड सुलभ लिक्विड फंडात गुंतवावे.

*  १० लाख तुमच्या रिस्क प्रोफाइलनुसार म्युच्युअल फंडात गुंतवावे.

*  सर्व निश्चित उत्पन्न देणाऱ्या योजनांतून मिळणाऱ्या व्याजाचा विनियोग ‘एसआयपी’साठी करावा.

फंड गुरू arthmanas@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2018 1:01 am

Web Title: importance of balancing investment
Next Stories
1 क.. कमोडिटीचा : अस्सल राष्ट्रीय बाजारपेठेची घडण
2 गुंतवणूक कट्टा.. : इक्विटी सेव्हिंग फंड, डायनॅमिक इक्विटी फंड की बॅलन्स्ड फंड? 
3 माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलियोला विम्याची आश्वासक हमी
Just Now!
X