11 December 2017

News Flash

कर समाधान : भेटीवरील कर आकारणी

विभक्त राहण्यासाठी दिलेल्या संपत्तीवर मिळालेले उत्पन्न हे संपत्ती भेट देणाऱ्याला करपात्र नाही.

प्रवीण देशपांडे | Updated: April 17, 2017 1:11 AM

विभक्त राहण्यासाठी दिलेल्या संपत्तीवर मिळालेले उत्पन्न हे संपत्ती भेट देणाऱ्याला करपात्र नाही.

कर नियोजन करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. ती म्हणजे असे नियोजन करताना कायद्यातील तरतुदींचा पूर्णपणे विचार करावा आणि कायद्याचे उल्लंघन होऊ न त्याचे ‘करचुकवेगिरी’मध्ये रुपांतर न होण्याची खबरदारी घ्यावी. कायद्यात अशा अनेक तरतुदी आहेत की ज्याचा फायदा घेऊ न कर नियोजन करता येते. अशा तरतुदींमध्ये भेट वस्तूंचा समावेश करता येईल. प्राप्तीकर कायद्यात अशा तरतुदी आहेत. याद्वारे भेटवस्तू देणाऱ्याला आणि भेट घेणाऱ्याला कर भरावा लागणार नाही. भेट दिल्यानंतर त्यावर मिळणाऱ्या उत्पन्नावरसुद्धा भेट देणाऱ्याला कर भरावा लागणार नाही.

मध्यमवर्गीय करदात्यांमध्ये एक गैरसमज आहे की, आपल्याकडील पैसे हे पत्नीला भेट देऊ न तिच्या नावाने गुंतविल्यास त्यावर मिळणारे उत्पन्न हे पत्नीला करपात्र असेल आणि त्यावर आपल्याला कर भरावा लागणार नाही. पत्नी जर गृहिणी असेल आणि तिचे उत्पन्न करपात्र मर्यादेपेक्षा कमी असेल तर बरेच करदाते आपले पैसे पत्नीच्या नावाने मुदत ठेवीत गुंतवितात किंवा घरामध्ये गुंतवितात जेणे करून त्यावर मिळणारे उत्पन्न (व्याज किंवा भाडे) हे पत्नीला करपात्र होईल आणि तिला त्यावर कर भरावा लागणार नाही किंवा कमी दराने कर भरावा लागेल.

प्राप्तीकर कायदा कलम ५६नुसार कोणत्याही मोबदल्याशिवाय ५०,००० रुपयांपेक्षा जास्त मिळालेली रक्कम किंवा स्थावर मालमत्ता ज्याचे मूल्य (मुद्रांक शुल्काप्रमाणे मालमत्तेचे मूल्य) ५०,००० रुपयांपेक्षा जास्त आहे किंवा इतर मालमत्ता ज्याचे ‘वाजवी बाजार मूल्य’ (फेअर मार्केट व्हैल्यू) ५०,००० रुपयांपेक्षा जास्त आहे अशी रक्कम करपात्र उत्पन्नात गणली जाते. याला आपण भेटी म्हणू. मागील वर्षांपर्यंत या कलमानुसार मिळालेली भेट फक्त वैयक्तिक करदाते आणि हिंदू अविभक्त कुटुंब (HUF) यांनाच लागू होती. १ एप्रिल २०१७ पासून या कलमाची व्याप्ती वाढवून या सर्व प्रकारच्या करदात्यांना लागू केल्या आहेत.

या भेटीवरील उत्पन्न करपात्र :

ठरावीक नातेवाईकांकडून मिळालेल्या भेटींवर कर भरावा लागत नाही; परंतु अशा दिलेल्या भेटीतून मिळालेले उत्पन्न हे भेट देणाऱ्याला करपात्र होऊ शकते. खालील नातेवाईकांना दिलेल्या भेटीवरील उत्पन्न हे भेट देणाऱ्याला करपात्र आहे. त्यामुळे खालील भेटी टाळाव्यात :

१. पती किंवा पत्नीला दिलेली भेट : पतीने पत्नीला किंवा पत्नीने पतीला जर भेट दिली तर त्या भेटीच्या गुंतवणुकीतून मिळणारे उत्पन्न भेट देणाऱ्याला करपात्र आहे. उदा. जर पतीने पत्नीला त्यांच्या उत्पन्नातून १ लाख रुपये भेट म्हणून दिले आणि पत्नीने ते बँकेत मुदत ठेवीत गुंतविले आणि त्यावर तिला त्यावर ९,००० रुपये व्याज मिळाले. हे व्याज पतीच्या उत्पन्नात गणले जाईल आणि ते पतीला करपात्र असेल.

याला अपवाद म्हणजे पत्नीला लग्नाच्या पूर्वी दिलेली भेट. उदा. जर एका करदात्याने त्याच्या लग्नापूर्वी भावी पत्नीला १ लाख रुपये भेट दिले आणि तिने ते बँकेत मुदत ठेवीत गुंतविले त्यावर मिळालेले व्याज लग्नानंतरसुद्धा पतीच्या उत्पन्नात गणले जात नाही. परंतु ही भेट ५०,००० रुपयांपेक्षा जास्त असल्यामुळे भावी पत्नीला लग्न होण्यापूर्वी मिळालेली रक्कम करपात्र आहे. पत्नीचे लग्नापूर्वीचे उत्पन्न ही भेट स्विकारूनसुद्धा करपात्र उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी असेल तर या रकमेवरसुद्धा कर भरावा लागणार नाही.

विभक्त राहण्यासाठी दिलेल्या संपत्तीवर मिळालेले उत्पन्न हे संपत्ती भेट देणाऱ्याला करपात्र नाही.

पती किंवा पीला जर भेट म्हणून काही रक्कम हस्तांतरित केली आणि भेट घेणाऱ्याने ते पैसे करमुक्त पर्यायात गुंतविले तर त्यावर भेट देणाऱ्याला कर भरावा लागणार नाही. उदा. पतीने पत्नीला १ लाख रुपये भेट म्हणून दिले आणि पत्नीने ते सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीत (PPF) गुंतविले तर त्यावर मिळणारे व्याज करमुक्त असल्यामुळे कोणालाच कर भरावा लागणार नाही.

२. सुनेला दिलेली भेट : सासू—सासऱ्यांनी सुनेला रोख रकमेच्या किंवा मालमत्तेच्या स्वरूपात भेटवस्तू दिली आणि त्यातून उत्पन्न मिळाले तर ते उत्पन्न सुनेला करपात्र नसून सासू किंवा सासऱ्यांना (ज्यांनी भेटवस्तू दिली आहे) त्यांना करपात्र आहे. मुलाच्या लग्नापूर्वी सासू—सासऱ्यांनी, होणाऱ्या सुनेला भेट दिली आणि त्यावर काही उत्पन्न मिळाले तर ते सासू किंवा सासऱ्याच्या उत्पन्नात गणले जात नाही. मुलाच्या लग्नानंतरसुद्धा लग्नापूर्वी दिलेल्या भेटीवर मिळालेले उत्पन्न सासू किंवा सासऱ्याच्या उत्पन्नात गणले जात नाही.

३. अजाण मुलांना दिलेली भेट : अजाण मुलांना मिळालेले उत्पन्न पालकाच्या उत्पन्नात (ज्याचे उत्पन्न जास्त आहे) गणले जाते. त्यामुळे अजाण मुलांच्या नावाने ठेवलेल्या गुंतवणुकीवर पालकांनाच कर भरावा लागतो.

करमुक्त भेटी :

ठराविक नातेवाईकांकडून मिळालेली भेट करमुक्त असतात. त्यामुळे करनियोजन करताना या तरतुदींचा विचार केला पाहिजे. परंतु काही नातेवाईकांकडून मिळालेल्या भेटीतून मिळालेले उत्पन्न भेट देणाऱ्याला करपात्र असते. काही भेटवस्तू अशा आहेत की भेट घेणाऱ्याला त्यावर कर भरावा लागत नाही आणि त्या भेटीतून मिळणाऱ्या उत्पन्नावरसुद्धा भेटवस्तू देणाऱ्याला कर भरावा लागत नाही. त्या खालील प्रमाणे :

१. पालकांना दिलेली भेट : पालकांना दिलेल्या भेटवस्तू तर पालकांना करमुक्त आहेतच. शिवाय या भेटीच्या गुंतवणुकीतून मिळालेले उत्पन्न हे भेट देणाऱ्याच्या उत्पन्नात गणले जात नाही. हे उत्पन्न पालकाचे उत्पन्न म्हणूनच गणले जाते. जर पालक ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांची करमुक्त उत्पन्नाची मर्यादा जास्त असते आणि त्यांना या भेटीच्या गुंतवणुकीवर मिळालेल्या उत्पन्नावर कमी किंवा काहीच कर भरावा लागणार नाही. या तरतुदी सासू-सासऱ्यांनासुद्धा लागू होतात.

२. सजाण मुलांना दिलेली भेट : सजाण मुलांना (ज्यांचे वय १८ वर्षांंपेक्षा जास्त आहे) पालकांनी दिलेल्या भेटी या करमुक्त आहेत आणि त्यावर मिळालेले उत्पन्न सुद्धा भेट देणाऱ्यांच्या उत्पन्नामध्ये गणले जात नाही. मुलांच्या शिक्षणासाठी पालकांनी गुंतवणुक करण्यापेक्षा मुलांच्या नावाने केल्यास पालकांना या गुंतवणुकीवर कर भरावा लागणार नाही.

३. लग्नात मिळालेली भेट : लग्नात वर आणि वधू यांना मिळालेली भेट या करमुक्त आहेत. ही भेट नातेवाईक किंवा इतरांकडून मिळाली असली तरी करमुक्त आहेत. या भेटींना ५०,००० रुपयांची मर्यादासुद्धा नाही. आपल्याकडील पद्धतीनुसार वर आणि वधूच्या लग्नात आई – वडिलांनासुद्धा भेट (आहेर) देतात. मुलीच्या किंवा मुलाच्या लग्नात पालकांना मिळालेली भेट करपात्र या सदरात मोडतात. ही भेट ठराविक नातेवाईकांकडून मिळालेल्या असतील तर करमुक्त आहेत आणि इतरांकडून मिळालेल्या भेटीसाठी ५०,००० रुपयांची मर्यादा आहे. इतर समारंभात (वाढदिवस, वर्धापन दिन, वगैरे) मिळालेली भेट मात्र करपात्र आहेत.

४. मृत्यू पत्राद्वारे मिळालेली संपत्ती : मृत्युपत्राद्वारे किंवा वारसाहक्काने मिळालेली संपत्ती ही करमुक्त आहे.

प्रश्न : मी माझ्या घराच्या विक्री व्यवहारासाठी एका व्यक्तीकडून ७५,००० रुपये टोकन म्हणून घेतले होते. परंतु काही कारणाने त्या व्यक्तीने हा व्यवहार रद्द केला. आमच्यात झालेल्या बोलीनुसार त्याने टोकन म्हणून दिलेले ७५,००० रुपये त्याला परत करणे मला बंधनकारक नाही. आणि हे पैसे परत न करण्याचे ठरविण्यात आले आहे. हे मिळालेले पैसे मला करपात्र आहेत का?

– एक वाचक.

उत्तर : हे उत्पन्न कलम ५६ नुसार इतर उत्पन्नात गणले जाईल. करनिर्धारण वर्ष २०१५-१६ पासून भांडवली संपत्तीच्या विकीसंदर्भात मिळालेली अग्रिम रक्कम किंवा टोकन रक्कम जर विक्री व्यवहार पूर्ण न झाल्या कारणाने जप्त केली असल्यास ती इतर उत्पन्नात गणली जाते.

प्रश्न : मी सेवानिवृत्त असून मागील वर्षांपर्यंत माझे उत्पन्न व्याज व निवृत्ती वेतन एवढय़ा पुरते सिमीत होते. पण या वर्षी मी माझी जागा विकली असून त्यापासून मिळालेला दिर्घ मुदतीचा भांडवली नफा पुर्णपणे प्राप्तीकर कलम ५४ EC  नुसार रोख्यामध्ये गुंतविला आहे. त्यामुळे या व्यवहारात मला  प्राप्तीकर देय नाही. यावर्षी मी प्राप्तीकर विवरणपत्रचा कोणता अर्ज भरणे आवश्यक आहे?

– उदय जपाटकर.

उत्तर : झालेल्या दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर जरी कर भरावा लागणार नसेल तर दीर्घमुदतीचा भांडवली नफा हा भांडवली नफा या सदराखाली दाखवून कलम ५४ EC  कलमाखाली गुंतवणूक दाखवावी लागेल. या साठी प्राप्तीकर विवरणपत्र अर्ज २ हा भरावा लागेल.

 

प्राप्तीकर खात्याने आतापर्यंत खालील विवरणपत्राचे अर्ज करनिर्धारण वर्ष २०१७-१८ साठी उपलब्ध करून दिले आहेत. कोणते अर्ज कोणाला लागू आहेत हे  खाली दर्शविले आहे –

अर्ज कोणी भरावा :

वैयक्तिक करदाते ज्यांचे उत्पन्न ५० लाख रुपयांपेक्षा कमी आहे आणि ज्यांच्या उत्पन्नामध्ये वेतन,  एक घर आणि इतर उत्पन्न (व्याज वगैरे) याचा समावेश आहे.

वैयक्तिक करदाते आणि हिंदू अविभक्त कुटुंब (HUF) ज्यांच्या उत्पन्नामध्ये धंदा किंवा व्यवसायाच्या उत्पन्नाचा समावेश नाही.

वैयक्तिक करदाते आणि हिंदू अविभक्त कुटुंब (HUF) ज्यांच्या उत्पन्नामध्ये धंदा किंवा व्यवसायाच्या उत्पन्नाचा समावेश आहे.

सुगम अनुमानित उत्पन्नावर (PRESUMPTIVE) आधारित धंदा आणि व्यवसायाचे उत्पन्न.

वैयक्तिक करदाते, हिंदू अविभक्त कुटुंब (HUF), कंपनी आणि ज्यांना फॉर्म ७ भरावा लागतो या व्यक्ती सोडून्F.

(लेखक मुंबईस्थित सनदी लेखाकार आहेत.)

कर आणि त्या संबंधी आपलेही नियोजनाविषयक काही प्रश्न असतील तर त्याचे समाधान करून घेण्यासाठी प्रश्न पाठवा :

प्रवीण देशपांडे pravin3966@rediffmail.com

First Published on April 17, 2017 1:11 am

Web Title: income tax on gifts tax implications on gifts