17 December 2017

News Flash

माझा पोर्टफोलियो : चढ-उतारांनी विचलित होण्याचे कारण नाही!

पहिल्या सहामाहीत आपला पोर्टफोलिओ एकूण गुंतवणुकीवर ६.५ टक्के नफा दाखवत होता,

अजय वाळिंबे | Updated: October 2, 2017 1:30 AM

तेजीत असलेला मुंबई शेअर बाजार निर्देशांक गेले काही दिवस मात्र दोलायमान अवस्थेत आहे.

पोर्टफोलिओचा नऊमाही आढावा – २०१७

तेजीत असलेला मुंबई शेअर बाजार निर्देशांक गेले काही दिवस मात्र दोलायमान अवस्थेत आहे. गेले काही दिवस परदेशी गुंतवणूकदारांनी केलेली विक्री तर भारतीय वित्तीय संस्थांनी केलेली गुंतवणूक हे शेअर बाजारात चर्चेचे विषय ठरत आहेत. तरी पोर्टफोलियोतील गुंतवणूक दीर्घकालीन असल्याने वाचकांनी अशा चढ-उतारांनी विचलित होण्याचे काहीच कारण नाही.

पोर्टफोलिओचा नऊमाही आढावा घेताना, नेहमीप्रमाणे गेल्या तिमाहीत काय घडले हेही अभ्यासणे महत्त्वाचे ठरेल. १ जुलै २०१७ पासून वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यापासून झालेला गोंधळ अपुरा म्हणूनच की काय रिझव्‍‌र्ह बँकेच्या अहवालात नोटाबंदीचा नक्की ‘परिणाम काय झाला’ हेही सर्व जनतेपुढे आले. नोटाबंदी आणि जीएसटी अशा घाईत घेतलेल्या दोन्ही निर्णयांचा नक्की परिणाम काय झालाय हे आता सर्वसामान्य जनतेला कळून चुकले आहे. आपल्या आर्थिक प्रगतीच्या वाढीचा दर दोन टक्क्यांनी घटला आहे. विकास दर सावरायचा तर वित्तीय तूटदेखील वाढणे अपरिहार्य दिसत आहे. सत्तेवर आल्यानंतर सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) गणनेचे नवीन समीकरण काढून, जीडीपी तेव्हा दोन टक्क्यांनी वाढविला होता हे येथे ध्यानात घेतले पाहिजे. बँकांच्या वाढत्या अनुत्पादित कर्जाबाबत सरकार आणि रिझव्‍‌र्ह बँकेने उचललेले पाऊल, महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी केलेली शेतकऱ्यांची कर्जमाफी तसेच महागाई आणि बँकेचे व्याज दर नियंत्रणात असले तरीही औद्योगिक वाढीचा दर मात्र मर्यादितच किंबहुना कमी झाला आहे. सुदैवाने यंदा देशातील बऱ्याच भागांत पाऊस चांगला झाला आहे. मात्र तरीही शेतकऱ्यांची परिस्थिती तितकीशी चांगली नाही. उत्तर कोरियाच्या कारवाया चालूच असून त्याचा परिणाम जागतिक बाजारपेठेवरदेखील झाला आहे. फेडरल बँकेने व्याज दर वाढवले नाहीत ही सारी जमेची बाजू असली तरीही सप्टेंबरच्या पहिल्या तीन आठवडय़ांपर्यंत तेजीत असलेला मुंबई शेअर बाजार निर्देशांक गेले काही दिवस मात्र दोलायमान अवस्थेत आहे. गेले काही दिवस परदेशी गुंतवणूकदारांनी केलेली विक्री तर भारतीय वित्तीय संस्थांनी केलेली गुंतवणूक हे शेअर बाजारात चर्चेचे विषय ठरत आहेत.

पहिल्या सहामाहीत आपला पोर्टफोलिओ एकूण गुंतवणुकीवर ६.५ टक्के नफा दाखवत होता, तर पोर्टफोलिओचा आयआरआर १८.३९ टक्के होता. तर आता नऊ  महिन्यांच्या आढाव्यानंतर पोर्टफोलिओ ८.९ टक्के नफ्यात असून पोर्टफोलिओचा आयआरआर १९.९६ टक्के आहे. अर्थात काही शेअर्स तोटय़ात असले तरीही सुचविलेली बहुतांशी गुंतवणूक दीर्घकालीन असल्याने अशा चढ-उताराने विचलित होण्याचे काहीच कारण नाही. पोर्टफोलिओचे वाचक-गुंतवणूकदार पुरेसे सुज्ञ असल्याने प्रत्येक शेअर्सचे काय करायचे याची शिफारस दिलेली नाही.

पहिल्या सहामाहीत पोर्टफोलिओमधील गुंतवणुकीने फक्त ६.५ टक्के नफा दाखविला होता. तर नऊ महिन्यांत गुंतवणुकीवरील नफा ८.९ टक्के आहे. तर पोर्टफोलिओचा आयआरआर १९.९६ टक्के आहे.

महत्त्वाची दखल :

* टाटा एलेक्सी आणि मॉइल हे समभाग १:१ बोनस पश्चात

* नेस्को आणि येस बँकेच्या १० रुपये दर्शनी मूल्याचे प्रति शेअर २ रुपये मूल्यात विभाजन झाले आहे.

सूचना : प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलाच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.

शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

First Published on October 2, 2017 1:30 am

Web Title: nine monthly review of company portfolio
टॅग Company Portfolio