21 October 2018

News Flash

नवीन वर्षांचा संकल्प.. कर बचतीसोबत संपत्ती निर्मितीचा

करबचतीसोबतच आपल्या बचतीचे क्रयमूल्य जपणेही आवश्यक असते.

प्रतिनिधिक छायाचित्र

विशाल सोनवणे हा नव्याने नोकरीला लागलेला तरुण आहे. तो नोकरी करीत असलेल्या कंपनीच्या सॅलरी सेक्शनच्या प्राचीची त्यांना ई-मेल आला. जानेवारी महिना कॅलेंडरचा पहिला महिना तसाच भारतात आर्थिक वर्षांच्या शेवटच्या तिमाहीतील पहिला महिना. शेवटची तिमाही म्हणजे वर्षभरात करवजावटीसाठी केलेल्या गुंतवणुकीचा ऑफिसमध्ये पुरावा देण्याचा महिना. या महिन्यांत सॅलरी सेक्शनच्या क्लार्कचा रुबाब ‘समर्थाघरच्या श्वान’ या थाटातला! गुंतवणूक केलेला एखादा पुरावा जमेस धरायचा राहून गेला तर गुंतवणूक करूनदेखील कर कापला जायचा. पूर्वी सॅलरी सेक्शनमधील अनेकजण आपापल्या बायकांच्या नावांवर असलेल्या विमा कंपनीच्या एजन्सीमार्फत कर्मचाऱ्यांना विमा उत्पादने खरेदी करण्याचा सल्ला देत. सर्वसाधारणपणे करवजावट देणाऱ्या वजावटी आयकर कायद्याच्या ‘कलम ८० सी’ नुसार दिल्या जातात. या कलमाअंतर्गत उपलब्ध तरतुदींमध्ये २१ पर्याय उपलब्ध आहेत. मुलांच्या शैक्षणिक शुल्क, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ), विमा हप्त्यांच्या १० पट विमाछत्र असलेली जीवनविमा पॉलिसी, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र वगैरेंमध्ये केलेल्या गुंतवणुकांवर आयकर कायद्यानुसार उत्पन्नावर आकारलेल्या करावर सूट मिळविता येते. यापैकी दुर्लक्षित परंतु सर्वात कमी कालावधीचा आणि सर्वाधिक परतावा असलेला पर्याय म्हणजे म्युच्युअल फंडाच्या ‘ईएलएसएस फंडां’चा!

म्युच्युअल फंडांच्या ईएलएसएस गटातील गुंतवणूक ही आयकराच्या ‘कलम ८० सी’न्वये करवजावटीस पात्र गुंतवणूक आहे. करबचतीसाठी केलेल्या गुंतवणुकीतून संपत्तीची निर्मिती व्हावी असे प्रत्येक करदात्यास वाटते. करबचत हे प्राथमिक उद्दिष्ट आणि संपत्तीची निर्मितीची हे दुय्यम उद्दिष्ट ठेवले, तर ईएलएसएस फंडातील गुंतवणूक हा सर्वोत्तम पर्याय आहे. या गुंतवणुकीवर करबचत तर होतेच, परंतु तीन वर्षांनी ही रक्कम काढून घेण्याचा पर्याय या गुंतवणुकांतून उपलब्ध आहे.

शुद्ध विमा पॉलिसीतच सुज्ञता!

पूर्वी अर्ध-अर्थसाक्षरतेमुळे करदाते विमा कंपन्यांची उत्पादने मुख्यत्वे विम्यापेक्षा करवजावटीसाठी विकत घेत असत. मनीबॅक प्रकारच्या पॉलिसींच्या परताव्याचा दर ४-४.५० टक्के तर एंडोमेंट प्रकारच्या पॉलिसींच्या परताव्याचा दर ५ ते ६ टक्क्य़ांच्या दरम्यान असतो. मुदतीनंतर मिळणारे पैसे हे करमुक्त असल्याचे समाधान गुंतवणूकदारांना मिळते. विमा व्यवसायातील सर्वात मोठी सरकारी कंपनी असल्याने मुद्दलाच्या सुरक्षिततेचे समाधान वेगळे. विमा उत्पादने अल्प परतावा देणारी आणि १५ ते २० वर्षे कालावधीसाठी म्हणजेच दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीसाठी असतात. एखाद्या वर्षी नोकरी सुटल्यामुळे किंवा व्यवसायात तोटा झाल्याने करपात्र उत्पन्न नसूनदेखील विमा पॉलिसी सुरू राहण्यासाठी ठरलेला हप्ता भरणे आवश्यक असते. विमा पॉलिसीचा कालावधी जितका कमी तितका परतावा कमी. विमा उत्पादनात लवचीकता नसते. वयाच्या पन्नासाव्या वर्षी घेतलेली पॉलिसी १५ वर्षे मुदतीची असल्याने साठाव्या वर्षी निवृत्तीनंतर आणखी पाच वर्षे विमा पॉलिसीचा हप्ता भरावा लागतो. विमा आणि गुंतवणूक एकत्र असलेल्या (मनीबॅक आणि एंडोमेंट) पॉलिसीच्या हप्त्यांपैकी मध्ये काही रक्कम जीवन विम्याच्या हप्त्यासाठी तर उर्वरित रक्कम गुंतवणुकीसाठी वापरली जाते. वाढत्या वयानुसार विम्याचा हप्ता वाढत जातो. मनीबॅक आणि एंडोमेंट पॉलिसीमार्फत मिळणारे विमा छत्र अपुरे असल्याने वयाची ३० वर्षे पूर्ण होण्यापूर्वी घेतलेली शुद्ध विमा पॉलिसी हा आर्थिक सुज्ञपणा ठरतो.

क्रयमूल्य जपणेही महत्त्वाचे

करबचतीसोबतच आपल्या बचतीचे क्रयमूल्य जपणेही आवश्यक असते. उदाहरणार्थ, १०० रुपयांच्या बचतीवर ८ टक्के परतावा मिळाला आणि या ८ रुपयांवर २० टक्के कर भरावा लागला तर कर पश्चात परतावा ६.४ टक्के इतका होईल. महागाई वाढीचा दर ७ टक्के असेल. तर बचत केल्या जाणाऱ्या १०० रुपयाची क्रयशक्ती ९३ रुपये होईल आणि ९३ रुपयांवर एक वर्षांचा करपश्चात परतावा मिळविल्यास त्याची क्रयशक्ती ९९.४ रुपये होईल. याचा अर्थ कर आणि महागाईमुळे एका वर्षांत १०० रुपयांच्या बचतीची क्रयशक्ती प्रत्यक्षात ०.६ रुपयांनी घटली. दहा वर्षांत याच बचतीची क्रयशक्ती घटून ९४ रुपये असेल. जर बचतीचा परतावा करमुक्त आणि महागाई दरापेक्षा वरचढ असेल तर बचतीची क्रयशक्ती नुसतीच टिकत नाही तर वाढते सुद्धा!  (कोष्टक पाहावे)

ईएलएसएसचे फायदे

अर्थनिरक्षरतेमुळे ईएलएसएस हा प्रकार आजपर्यंत जरी दुर्लक्षिला गेला असला तरी यापुढे ईएलएसएसकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सर्वाधिक परतावा देणारा हा गुंतवणूक प्रकार आहे. गुंतविलेली सर्व रक्कम कोणतेही शुल्क न वगळता, सर्व रक्कम फंडात गुंतविली जाते. ही गुंतवणूक गुंतवणूकदाराच्या मर्जीनुसार करायची असल्याने, ज्या वर्षी करपात्र उत्पन्न नाही किंवा घर खरेदी किंवा मुलांचे शिक्षण सुरू झाल्यानंतर गुंतवणूक रक्कम कमी करण्याची सोय ईएलएसएस फंडात आहे. समभाग गुंतवणूक हा प्रकार स्थावर मालमत्ता, मौल्यवान धातू, मुदत ठेवी, विमा उत्पादने यापेक्षा अधिक परतावा देणारा आहे. ईएलएसएस  हा समभाग गुंतवणूक असलेला फंड प्रकार असून तीन वर्षांसाठी गुंतवणूक असल्याने अन्य फंड प्रकारांच्या तुलनेत यात सर्वाधिक समभाग गुंतवणूक असते. साहजिकच निधी व्यवस्थापक कमी रोकड सुलभता राखत असल्याने या फंड प्रकारांनी मागील पाच वर्षांत सरासरी २२ टक्के परतावा दिला आहे.

नोकरी पेशातील चाकरमान्यांचा वेतनातून कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी (ईपीएफ) कापला जातो. कलम ८० सी नुसार जास्तीत जास्त १.५० लाखांपर्यंत करवजावटीसाठी गुंतवणूक करता येते. या १.५० लाखांमधून भविष्य निर्वाह निधीतील गुंतवणूक, मुदतीचा विमा शिकत असलेल्या मुलांचे शैक्षणिक शुल्क वगळता उर्वरित सर्व रक्कम ईएलएसएस फंडात गुंतविणे हिताचे आहे. ईएलएसएस गुंतवणूक ही ‘एक्झेम्प्ट-एक्झेम्प्ट-एक्झेम्प्ट’ अर्थात ‘ईईई’ प्रकारची आहे. म्हणजे गुंतविलेल्या रकमेवर करवजावट मिळते. तीन वर्षांनतर मिळणारी भांडवली वृद्धी आणि मूळ गुंतवणूकही करमुक्त आहे. या फंडांचा निधी व्यवस्थापक आपले कौशल्य वापरून समभागांची निवड करीत असल्याने कमीतकमी ईएलएसएस फंडातील १००० रुपयांच्या ‘एसआयपी’मध्ये किंवा ५००० रुपयांच्या एकरकमी गुंतवणुकीतून समभाग गुंतवणुकीत वैविध्य मिळविता येते. फंड व्यवस्थापकाच्या अनुभवाचा फायदा आणि व्यावसायिक व्यवस्थापनाचा लाभ ईएलएसएस फंडातील गुंतवणुकीत मिळविता येतो. गुंतवणूक करणे जितके सहज असते पैसे काढून घेणे तितकेच सुलभ असून एक ‘रिडम्शन रिक्वेस्ट’ भरून फंड घराण्याकडे दिल्यावर कामकाजाच्या चौथ्या दिवशी (टी प्लस टू) खात्यात रक्कम जमा होते. एखाद्या व्यक्तीने दरमहा ८,७५० रुपयांची एसआयपी कमावत्या ३५ वर्षांमध्ये केल्यास ३६.७५ लाखाच्या गुंतवणुकीवर १२ टक्के परतावा दराने ५.६८ कोटीचा निवृत्ती कोश जमविणे शक्य आहे. फक्त चिकाटीने ३५ वर्षे एसआयपी करीत राहणे गरजेचे आहे.

लाभाचे गणित..

* व्यक्तीला कलम ८० सी नुसार करवजावटीसाठी ईएलएसएस फंडात जास्तीत जास्त १.५० लाखांपर्यंत गुंतवणूक करता येते.

* ‘ईएलएसएस’मधील गुंतवणुकीवर करबचत तर होतेच, परंतु परंतु सर्वात कमी कालावधीचा (तीन वर्षे) आणि सर्वाधिक परतावा असलेला हा पर्याय आहे.

* त्या तुलनेत करवजावटीसाठी उपलब्ध अन्य पर्यायात गुंतवणूक कालावधी अधिक आणि परतावाही महागाईला मात देईल इतका नाही.

व्यापार प्रतिनिधी arthmanas@expressindia.com

First Published on January 8, 2018 1:01 am

Web Title: resolution for making property with tax savings in 2018