कापूस उत्पादनात यंदा १३ लाख गाठींची मोठी घट
यंदा देशात कापूस उत्पादनांत लक्षणीय प्रमाणात झालेल्या घटीतून वस्त्रोद्योगासमोरील अडचणी वाढणार आहेत. दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर पूर्व अंदाजित ३६५ लाख गाठी या कापसाच्या नीचांकी उत्पादनात आणखी १३ लाख गाठींची घट प्रत्यक्षात आली आहे.
देशातील कापूस उत्पादक राज्य असलेल्या महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक येथे पुरेसा पाऊस न झाल्याने कापसाचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घटले आहे. कापूस हंगामापूर्वी कापूस सल्लागार मंडळाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार देशात यंदा कसेबसे ३६५ लाख गाठी इतका कापूस उत्पादित होईल, असे सांगितले होते. तथापि, ताज्या आकडेवारीनुसार हे प्रमाण ३५२ लाख गाठी इतके आहे. सुमारे १३ लाख गाठी इतके कमी उत्पादन झाले असल्याचे स्पष्ट झाले. हा आकडा गेल्या पाच वर्षांतील कापूस उत्पादनाचा नीचांक दर्शविणारा आहे.
यापूर्वी सन २०१४-१५ मध्ये ३८० लाख गाठी इतके विक्रमी कापूस उत्पादन झाले होते. पावसाचे प्रमाण घटल्याने कापसाच्या लागवडीखालचे क्षेत्रही सुमारे साडेसात टक्क्यांनी घटले आहे.
कापसाचे प्रमाण घटल्याने वस्त्रोद्योगात होणाऱ्या परिणामांबाबत अभ्यासकांमध्ये मतांतरे आहेत. उत्पादन घटूनही अपेक्षित दर येताना दिसत नसल्याने कापूस उत्पादक रस्त्यावर उतरून आंदोलन करताना दिसत आहेत. दुसरीकडे देशातील सूतगिरण्यांची कापसाची मागणी व गरज पाहता त्यांना कापूस कमी पडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे त्यांना जादा दराने कापसाची खरेदी करावी लागणार आहे.
दरम्यान, कापूस व सूत याचा मोठा निर्यातदार असलेल्या चीनमधील यंदाची परिस्थिती पाहता तिथे कापसाची कितपत निर्यात होणार हा प्रश्न आहे. चीनच्या चलनाचे सध्या अवमूल्यन झाले आहे. कापासाची चणचण आणि घसरलेले चलन यामुळे चीनने यंदा वस्त्रोद्योगातील उत्पादन घटवण्याचा विचार केल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे चीनला होणारी निर्यात थांबल्यास त्याचा मोठा फटका भारतीय वस्त्रोद्योगाला बसणार आहे.

दरवाढ अटळ
कापसाच्या दरात वाढ झाल्यास सुताच्या दरात तद्वतच पुढे कापड, तयार कपडे यामध्येही दरवाढ अटळ आहे, असे याबद्दल बोलताना अखिल भारतीय सहकारी सूतगिरणी महासंघाचे उपाध्यक्ष राहुल आवाडे यांनी सांगितले. कापसातील यंदाची टंचाई लक्षात घेऊन या व्यवसायातील शेतकऱ्यांपासून ते उद्योजकांपर्यंत सगळेच घटक जागे झाले आहेत. तंत्रज्ञानामुळे देश-विदेशातील बाजारात कापूस, सूत, कापड दरांची माहिती त्यांना मिळतच असते, अशी पुस्ती त्यांनी जोडली.