सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीबाबत टाळेबंदीच्या काळात सुरू झालेल्या वाटाघाटींना बुधवारी अखेर त्रिपक्षीय सामंजस्य करारान्वये अंतिम मंजूरी दिली गेली. यातून बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांना १५ टक्के वेतनवाढीचा लाभ मिळणार आहे.

जवळपास तीन वर्षे कसोशीने सुरू राहिलेल्या वाटाघाटीनंतर, बँक अधिकाऱ्यांच्या चार तर बँक कर्मचाऱ्यांच्या पाच राष्ट्रीय संघटनांचे प्रतिनिधित्व करणारा ‘यूएफबीयू’ हा महासंघ आणि बँक व्यवस्थापनाची  संघटना ‘आयबीए’ यांच्या दरम्यान सहमती होऊन २२ जुलैला ११वा वेतन करार केला गेला. यामध्ये बँक कर्मचाऱ्यांना १५ टक्के वेतनवाढ देण्याचे मान्य करण्यात आले.

१ नोव्हेंबर २०१७ पासून हे लाभ देण्याचे निश्चित करण्यात आले होते. कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या वाढीव वेतनापोटी बँकांवर ७,८९८ कोटी रुपयांचा भार पडणार आहे.

बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांना मे २०१५ मध्ये झालेल्या १० व्या करारानुसार, नोव्हेंबर २०१२ ते ऑक्टोबर २०१७ दरम्यान १५ टक्के वेतनवाढ निश्चित करण्यात आली होती.