नवी दिल्ली : बँका आणि टपाल कार्यालयांना आधार सुविधा स्थापन करण्यास सांगितल्यानंतर एक वर्षांच्या आत त्यांनी १८ हजार केंद्रे देशात सुरू केली आहेत. सामान्य ग्राहकांना तेथे आधार नोंदणीची सोय करण्यात आली असून, बायोमेट्रिक आयडी अपडेशनही शक्य झाले आहे

भारतीय अनोखी ओळख प्राधिकरणाने (यूआयडीएआय) गेल्या वर्षी जुलै महिन्यांत खासगी व सरकारी बँकांना आधार सुविधा केंद्रे सुरू करण्यास सांगितले होते. बँकांच्या दर दहा शाखांमागे किमान एका शाखेत अशी केंद्रे सुरू करण्याचा आदेश देण्यात आला होता, असे यूआयडीएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय भूषण पांडे यांनी सांगितले.

त्या परिणामी आता बँका व टपाल कार्यालयांनी अशी १८ हजार केंद्रे सुरू केली असून, इतर ठिकाणीही ती सुरू होतील असे पांडे म्हणाले. बँकांच्या शाखा आणि टपाल कार्यालयात २६ हजार आधार नोंदणी व सुधारणा केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. बँक शाखेतील आधार केंद्रे ही आधार तपासणी  प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आहेत. सुरक्षित वातावरणात आधार नोंदणी व्हावी हा त्यामागील हेतू आहे.

सध्या सुरू झालेल्या १८ हजारांपैकी खासगी व सरकारी बँकांच्या १० हजार शाखांनी अशी केंद्रे सुरू केली आहेत. येत्या काळात आणखी १३,८०० केंद्रे सुरू करायची असून, त्यातील आठ हजार केंद्रे टपाल कार्यालयात सुरू केली जातील.

बँकांसाठी रोजची आधार नोंदणी व दुरुस्तीचे किमान लक्ष्य निम्म्याने कमी करण्यात आले आहे. सध्या बँकांना रोज सोळा नोंदी करण्याचे उद्दिष्ट दिले होते ते आठ करण्यात आले आहे. १ जुलैपासून बँकांमध्ये रोज आठ आधार नोंदी आवश्यक आहेत, तर १ ऑक्टोबरपासून १२ तर १ जानेवारी २०१९ पासून रोज १६ नोंदी आवश्यक आहेत.