गांधीवादी तत्त्वांसाठी आणि विधायक कार्यासाठी अवघे आयुष्य वेचणाऱ्या जमनालाल बजाज यांची स्मृती म्हणून दिल्या जाणाऱ्या बजाज फाऊंडेशन पुरस्कारांचे वितरण येत्या १ डिसेंबर रोजी मुंबईत एनसीपीए येथील जमनालाल भाभा थिएटरमध्ये आयोजन करण्यात आले आहे. मुंबई येथे होणाऱ्या या सोहळ्याचे यंदाचे ३८ वे वर्ष असून, सर्व पुरस्कार विजेत्यांना प्रख्यात इतिहासतज्ज्ञ आणि आयआयटी, गांधीनगर येथील व्याख्याते प्राध्यापक राजमोहन गांधी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येईल.

या वर्षी फाऊंडेशनकडे पुरस्कारार्थीच्या १०० हून अधिक प्रवेशिका दाखल झाल्या आहेत. दर वर्षी विधायक कार्य, ग्रामीण विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर, महिला आणि बालकल्याण तसेच गांधीवादी तत्त्वज्ञानाच्या भारताबाहेरील प्रसारासाठी आंतरराष्ट्रीय पुरस्कार अशा चार विभागांतील लक्षवेधी काम करणाऱ्या व्यक्तींना जमनालाल बजाज फाऊंडेशन पुरस्काराने गौरविले जाते. प्रत्येक विभागातील पुरस्कारामध्ये ताम्रपत्र, मानचिन्ह आणि रु. १० लाखांच्या रोख पारितोषिकाचा समावेश आहे.

‘आर्थिक भांडवलाच्या’ शाश्वत वाढीसाठी ‘सामाजिक भांडवल’ निर्माण करणे आणि त्याची जपणूक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी वैविध्य असलेल्या आपल्या या समाजात सर्वसमावेशक विकास आणि आपल्या वैविधतेविषयी आदर व्यक्त करण्याची गरज आहे, असे या पुरस्कारांविषयी बोलताना जमनालाल बजाज फाऊंडेशनचे अध्यक्ष राहुल बजाज यांनी मत व्यक्त केले. आपल्या समाजात अर्थव्यवस्था आणि समाजकारण यांची घट्ट वीण आहे. संपूर्ण समाजाच्या विकासातच अर्थविकासाचे मूळ दडलेले आहे, अशा विचारसरणीचा पुरस्कार करणाऱ्या व्यक्तींना जमनालाल बजाज पारितोषिक प्रदान केले जाते, असे त्यांनी सांगितले. जमनालाल बजाज यांना महात्मा गांधी यांनी त्यांचे पाचवे सुपुत्र म्हणून दत्तक घेतले होते आणि गांधीवादी चळवळीत ते गांधीजींचे अत्यंत महत्त्वाचे साहाय्यक होते.