स्मार्टफोन निर्मितीतील आघाडीच्या विवो इंडियाने व्यवसाय विस्ताराची घोषणा केली असून नव्या प्रकल्पातील पहिल्या टप्प्याची मुहूर्तमेढ रोवली आहे. या प्रकल्पातून वार्षिक ८४ लाख फोन निर्मितीकरिता कंपनीने ७,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. नव्या प्रकल्पात दोन टप्प्यांमध्ये फोन निर्मितीकरिता ७,००० कर्मचारी भरती केले जाणार असून कंपनीच्या ताफ्यात वर्षभरात एकूण १५,००० मनुष्यबळ होणार आहे.

विवो इंडियाने बुधवारी उत्तर प्रदेशमधील नोएडा येथील नव्या फोन निर्मिती प्रकल्पाची घोषणा केली. या प्रकल्पातून पहिल्या टप्प्यात वार्षिक ८४ लाख फोन तयार केले जाणार आहेत. त्यासाठी ७,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक व २,००० कर्मचारी भरती करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

उत्तरेतील याच प्रकल्पात दुसऱ्या टप्प्यात आणखी ५,००० हून अधिक कर्मचारी भरती केली जाणार असून यामुळे एकूण मनुष्यबळ १५,००० वर जाणार आहे.

कंपनीच्या प्रकल्पाची स्थापित उत्पादन क्षमता वार्षिक ३.३० कोटी फोन निर्मितीपर्यंत वाढणार आहे. कंपनीचा सध्या अन्य एक प्रकल्प उत्तर भारतातच आहे. सध्याची फोन निर्मितीक्षमता वार्षिक २.५० कोटी आहे. विवो इंडियाचा दुसरा टप्पा २०२० च्या मध्यात सुरू होण्याची शक्यता आहे.

विवोने भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेत २०१४ मध्ये शिरकाव केला. कंपनीची देशभरातील ५३९ शहरांमध्ये ५५० हून अधिक सेवा केंद्रे आहेत. कंपनीचा जून २०१९ अखेर भारतातील फोन बाजारपेठेत १७ टक्के हिस्सा आहे. कंपनी गेल्या पाच वर्षांपासून ‘मेक इन इंडिया’ मोहिमेला साजेसे व्यवसाय धोरण राबवीत असल्याचे कंपनीच्या नाममुद्रा धोरण विभागाचे संचालक निपुण मार्या यांनी सांगितले.