भांडवली बाजाराच्या नकारात्मकतेचा फटका; निवडणूक अनिश्चिततेचाही गुंतवणूकदारांवर निर्णय परिणाम

मुंबई : म्युच्युअल फंड उद्योगाची संघटना असलेल्या ‘अम्फी’ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, नवीन ‘एसआयपी’ खात्यांच्या संख्येत चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या नऊ  महिन्यांत ६१ टक्क्य़ांनी घट झाली आहे.

भांडवली बाजाराच्या नकारात्मक कामगिरीमुळे तसेच आगामी निवडणुकांबाबतच्या अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदार नव्याने गुंतवणूक करण्यास फारसे उत्सुक नसल्याने नवीन गुंतवणुकीत घट दिसून येत असल्याचे स्पष्ट होत आहे. एप्रिल २०१८ मध्ये ४.८१ लाख नवीन ‘एसआयपी’ खात्यांच्या तुलनेत डिसेंबर २०१८ मध्ये १.८७ लाख ‘एसआयपी’ खाते सुरू केले गेले. चालू आर्थिक वर्षांच्या सुरुवातीला नवीन एसआयपी गुंतवणूकदारांची संख्या १० लाखांहून अधिक होती; परंतु डिसेंबर २०१८ मध्ये ही संख्या ७.२३ लाखांपर्यंत खाली आली आहे. त्याचप्रमाणे एप्रिलमध्ये ३.९९ लाख गुंतवणूकदारांनी ‘एसआयपी’ खाते बंद केले, तर डिसेंबर २०१८ मध्ये ५.३६ लाख ‘एसआयपी’ खाते बंद झाले.

गुंतवणूकदार नेहमीच मागील वर्षभराचा परतावा बघून नवीन गुंतवणुकीचा निर्णय घेत असतात; मागील वर्षभरात समभाग गुंतवणूक करणाऱ्या सर्वच फंडांनी नकारात्मक परतावा दिला असल्याने नव्याने म्युच्युअल फंड गुंतवणुकीला सुरुवात केलेले गुंतवणूकदार गुंतवणूक वाढविण्यास सहजासहजी तयार होत नाहीत. याचा परिणाम नव्याने ‘एसआयपी’ खात्यांच्या संख्येवर झाल्याचे दिसत आहे.

‘अम्फी’च्या आकडेवारीनुसार, २०१७-१८ मध्ये १.१६ कोटी नवीन ‘एसआयपी’ खात्यांची नोंदणी झाली होती आणि ३४.३४ लाख खाते खंडित झाले होते. चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या नऊ  महिन्यांमध्ये ८५.१६ लाख ‘एसआयपी’ खात्यांची नोंदणी झाली. तर ४२.६७ लाख ‘एसआयपी’ खात्यांची नोंदणी रद्द केली. आगामी लोकसभा निवडणुका एप्रिल – मे महिन्यात अपेक्षित असल्याने बाजारपेठेतील वाढती अनिश्चितता हे घटणाऱ्या खात्यांचे आणखी कारण आहे. नोव्हेंबर २०१८ मध्ये ३.१४ लाख नवीन ‘एसआयपी’ खात्यांची नोंद झाली, तर डिसेंबर २०१८ मध्ये १.८७ लाख ‘एसआयपी’ खात्यांची नोंद झाली.

‘अम्फी’ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, थेट गुंतवणुकीने आलेल्या मालमत्तेपैकी ९ टक्के ‘एसआयपी’ २ वर्षांहून कमी कालावधीत बंद झाल्या. व्यवस्थापनाखालील २३,५०० कोटींच्या मालमत्तेपैकी मालमत्ता २,०६९ कोटी मालमत्ता गुंतवणूकदारांनी दोन वर्षांच्या आत काढून घेतली.

गुंतवणूक सल्लागाराच्या मदतीने आलेल्या ‘एसआयपी’पैकी ६१ टक्के एसआयपी पाच वर्षांहून अधिक काळ सुरू होत्या. गुंतवणूक सल्लागाराच्या मदतीने गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनी मालमत्तेच्या ३१ टक्के म्हणजेच ६,६०० कोटी रुपयांची मालमत्ता एक वर्षांच्या आत आणि २२ टक्के किंवा ४८,००० कोटींची मालमत्ता १ ते २ वर्षांच्या आत काढून घेतली.

जानेवारी महिन्यात दरमहा सुरू असलेल्या नियमित गुंतवणुकीने पहिल्यांदाच ८,००० कोटींचा टप्पा पार केला. सध्या एकूण म्युच्युअल फंड मालमत्तेच्या १०.५० टक्के (२,४०,१४७ कोटी) मालमत्ता ‘एसआयपी’द्वारा आलेली मालमत्ता आहे.