दर चार महिन्यांच्या तळात; टाळेबंदीमुळे रोजगारावर कुऱ्हाड

मुंबई : करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील काही भागांत लागू करण्यात आलेल्या स्थानिक पातळीवरील टाळेबंदीचा मोठा फटका रोजगाराला बसला असून ७५ लाख रोजगार बुडाले आहेत; तर बेरोजगारीचा दर यंदाच्या एप्रिलमध्ये जवळपास ८ टक्के असा गेल्या चार महिन्यांतील सुमार स्तरावर नोंदला गेला आहे.

देशातील उद्योग तसेच सेवा क्षेत्रातील रोजगाराविषयीचे चित्र टिपणाऱ्या ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमी’ अर्थात ‘सीएमआयई’ने सोमवारी जाहीर केल्यानुसार, नव्या आर्थिक वर्षांच्या पहिल्याच महिन्यात देशात ७५ लाख रोजगार बुडाले आहेत. तर गेल्या महिन्यातील देशातील बेरोजगारीचा दर ७.९७ टक्के नोंदला गेला आहे.

रोजगाराबाबतची देशातील स्थिती आणखी काही महिने आव्हानात्मक राहण्याची भीती ‘सीएमआयई’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी महेश व्यास यांनी व्यक्त केली आहे. गेल्या महिन्यात देशाच्या शहरी भागातील बेरोजगारीचा दर ९.७८ टक्के तर ग्रामीण तो ७.१३ टक्के राहिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यंदाच्या मार्चमध्ये देशातील बेरोजगारीचा दर ६.५० टक्के होता. मात्र दुसऱ्या लाटेच्या रूपात करोनाबाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागल्यानंतर देशातील काही भागांत लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे आर्थिक, औद्योगिक हालचाली मंदावत त्याचा विपरीत परिणाम रोजगारावर झाल्याचेही नमूद करण्यात आले.

करोना साथीवरील नियंत्रणाबाबत तूर्त भाष्य करणे अवघड असून मात्र येत्या काही कालावधीसाठी अंशत: टाळेबंदीमुळे बेरोजगारीवर त्याचा दबाव राहण्याची शक्यताही व्यास यांनी वर्तविली आहे.

निर्बंधांमुळे प्रत्यक्ष मनुष्यबळाचे योगदान येत्या काळात काही प्रमाणात कमी होण्याची धास्तीही व्यक्त करण्यात आली आहे.

देशात वर्षभरापूर्वी लागू झालेल्या सर्वव्यापी टाळेबंदीदरम्यान बेरोजगारीचा दर २४ टक्के होता. भारतात दिवसागणिक जवळपास ४ लाख नव्या करोना रुग्णांची भर पडत आहे.

महाराष्ट्रासारख्या राज्यात अनेक सरकारी कार्यालये तसेच खासगी आस्थापनांमध्ये सध्या १५ टक्क्यांपर्यंतच मनुष्यबळ उपस्थिती अनिवार्य आहे.