व्याज दर, चलनवाढ यासारख्या आर्थिक संकल्पनांबाबत ७६ टक्के भारतीय पूर्णपणे अनभिज्ञ आहेत, असे स्टँडर्ड अँड पुअर्स या जागतिक पतमानांकन सेवेच्या पाहणीतून पुढे आले आले आहे.
आशियात सर्वात जास्त आर्थिक साक्षरता ही सिंगापूरमध्ये आहे. तेथे हे प्रमाण ५९ टक्के आहे. हाँगकाँग व जपानमध्ये ते प्रत्येकी ४३ टक्के आहे. तर भारताच्या २४ टक्क्य़ांच्या तुलनेत चीनमध्ये हे प्रमाण २८ टक्के आहे, असे एस अँड पी रेटिंग सव्‍‌र्हिसेसच्या जागतिक आर्थिक साक्षरता पाहणीचा निष्कर्ष आहे.
पाहणीतील निष्कर्षांनुसार ७६ टक्के भारतीय प्रौढांना आर्थिक संकल्पनांचे ज्ञान नाही. म्हणजेच २४ टक्के भारतीय अर्थ साक्षर आहेत. आर्थिक साक्षरतेची पातळी भारतात ब्रिक्स व आग्नेय आशियातील देशांपेक्षा कमी आहे. जगातील ६६ टक्के लोक आर्थिक साक्षर नाहीत. जगात ६५ टक्के पुरुष तर ७० टक्के स्त्रिया आर्थिक साक्षर नाहीत. भारतात ७३ टक्के पुरुष व ८० टक्के स्त्रिया आर्थिक साक्षर नाहीत. आशियात आर्थिक उत्पादने वाढत असून अनेक ग्राहकांना कर्ज, व्याज व इतर महत्त्वाच्या संकल्पनांची माहिती नाही.
भारतातील १४ टक्के प्रौढ हे औपचारिक आर्थिक संस्थात गुंतवणूक करणे पसंत करतात. त्यांची आर्थिक कौशल्ये फार कमकुवत असल्याने त्यांना गुंतवणुकीतून योग्य तो आर्थिक मोबदला मिळवता येत नाही. या पाहणीसाठी १४० देशातील दीड लाख लोकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. आशियात ७५ टक्के प्रौढ आर्थिक साक्षर असून अमेरिका व ब्रिटनमध्ये हे प्रमाण ५७ व ६७ टक्के आहे.