नवी दिल्ली : येत्या पाच वर्षांत जगातील सर्वात मोठी सौर ऊर्जा कंपनी तर २०३० पर्यंत जागतिक स्तरावरील अव्वल अपारंपरिक ऊर्जानिर्मिती कंपनी बनण्याचे ध्येय अदानी समूहामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

समूहाचे अध्यक्ष व अब्जाधीश गौतम अदानी यांनी ऊर्जानिर्मितीबाबत कंपनी पारंपरिक कोळशापासून तयार होणाऱ्या ऊर्जेपासून नजीकच्या टप्प्यात फारकत घेणार असल्याचे बुधवारी स्पष्ट केले.

सुमारे १५ अब्ज डॉलरच्या अदानी समूहाचा देशातील ऊर्जा, कृषी, स्थावर मालमत्ता, संरक्षण आदी क्षेत्रांत व्यवसाय आहे. कंपनीने चालू वर्षअखेर अपारंपरिक ऊर्जानिर्मिती क्षमता दुप्पट तसेच २०२५ पर्यंत ती सध्याच्या २.५ गिगाव्ॉटवरून १८ गिगाव्ॉट करण्याचे उद्दिष्टही स्पष्ट केले.

अदानी समूहाचे भारतासह अनेक देशांमध्ये कोळशावर आधारित ऊर्जानिर्मिती प्रकल्प तसेच कोळशाच्या खाणी आहेत. त्याचबरोबर कंपनी मालवाहतूक जहाजे, बंदरे आदी क्षेत्रांतही कार्यरत आहे.

अदानी समूहाने सौर ऊर्जा क्षेत्रात जागतिक स्तरावरील सहावे स्थान गेल्या वर्षी नोंदविले होते. २०२१ मध्ये समूह जगातील आघाडीच्या तीन सौर ऊर्जा कंपन्यांमध्ये स्थान मिळवेल, असे अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी ‘लिंक्डइन’ या समाजमाध्यम मंचावरून जाहीर केले.

दरम्यान, येत्या दशकभरात शहर वायू वितरण जाळे उभारण्यासाठी ९,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा मानस अदानी गॅसने व्यक्त केला आहे. कंपनीने इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या भागीदारीत विविध १५ राज्यांतील ७१ जिल्ह्य़ांमधील ३८ ठिकाणी शहर वायू सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी परवाने मिळविलेले आहेत.

एस्सेल फायनान्सची कर्जखाती अदानी कॅपिटलकडे

मुंबई : कर्जसंकटातील एस्सेल समूहाच्या एस्सेल फायनान्स या बिगरबँकिंग वित्त कंपनीची कर्जखाती अदानी कॅपिटलकडे वर्ग करण्यात आली आहेत. सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांना १४५ कोटी रुपयांचे कर्ज दिलेली ही खाती असून त्याचे १,१०० ग्राहक आहेत. विविध १० शहरांमध्ये अस्तित्व असलेल्या एस्सेल फायनान्समध्ये ४० कर्मचारी आहेत, तर बिगरबँकिंग वित्त संस्था क्षेत्रात एप्रिल २०१७ मध्ये शिरकाव करणाऱ्या अदानी कॅपिटलकडे डिसेंबर २०१९ अखेर १,१०० कोटी रुपयांची कर्ज खाती आहेत. एस्सेल फायनान्सकडील कर्ज खाती मिळाल्याने प्रामुख्याने पश्चिम भारतात व्यवसाय असलेल्या अदानी कॅपिटलचे कार्यक्षेत्र विस्तारले जाणार आहे.