नोटाबंदी, वस्तू व सेवा कराचा अर्थव्यवस्थेवरील ताण कायम राहण्याची भीती

नोटाबंदी, वस्तू व सेवा कर या आव्हानाबरोबरच कृषी क्षेत्रातील जोखीम गृहीत धरून आशियाई विकास बँकेने (एडीबी) भारताच्या अर्थव्यवस्थेच्या विकास दराचा अंदाज खालावला आहे. आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थेने चालू आर्थिक वर्षांत देशाच्या प्रगतीचा दर आता ६.७ टक्के असेल, असे नमूद केले आहे. बँकेचा यापूर्वीचा अंदाज ७ टक्के होता. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर २०१८ मध्ये पुन्हा उचल खाण्याची शक्यताही विकास दर अंदाज खुंटविण्यास निमित्त ठरली आहे.

आशियाई विकास बँकेने २०१८-१९ या पुढील वित्त वर्षांतील भारताच्या विकास दराचा अंदाजही आधीच्या ७.४ टक्क्यांवरून ७.३ टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे. गेल्या वर्षांतील नोटाबंदी, चालू वित्त वर्षांच्या मध्यापूर्वी लागू झालेली नवी अप्रत्यक्ष करप्रणालीमुळे अर्थव्यवस्था तूर्त सावरणे अवघड असल्याचे बँकेने म्हटले आहे.

बँकेने व्यक्त केलेल्या आधीच्या अंदाजापेक्षा नव्या अंदाजाकरिता देशातील कृषी उत्पादनही गृहीत धरण्यात आले आहे. कृषी क्षेत्राबाबतची जोखीम यानिमित्ताने व्यक्त करण्यात आली आहे. चालू वित्त वर्षांच्या उर्वरित अर्धवार्षिकात विकास उंचावण्याची शक्यता असली तरी संपूर्ण वर्षांसाठीचा दर बँकेने व्यक्त केलेल्या आधीच्या अंदाजापेक्षा कमी आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकरिता सरकारचे पुनर्भाडवल, बँकांचा ताळेबंद सुधारण्याच्या उपाययोजना आदी सरकारच्या उपाययोजनांमुळे देशाच्या विकासाला संधी असेल, असेही नमूद करण्यात आले आहे. २०१८ मध्ये खनिज तेल दरवाढीची शक्यता भारतीय अर्थकारणावर विपरीत परिणाम करणारी असेल, असेही म्हटले आहे.

चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीत भारताच्या विकास दराने ६.३ टक्क्यांपर्यंतची झेप घेतली आहे. तत्पूर्वीच्या तिमाहीत देशाची अर्थप्रगती ५.७ टक्के अशी गेल्या तीन वर्षांच्या तळातील राहिली आहे.

आशियाई विकास बँकेपूर्वी जागतिक बँकेने चालू आर्थिक वर्षांसाठी भारताच्या विकास दराचा अंदाज आधीच्या ७.२ टक्क्यांवरून ७ टक्क्यांपर्यंत खाली आणला होता. फिच, मूडीज या आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थांनी यापूर्वीच भारताच्या वाढत्या विकास दराबाबत साशंकता व्यक्त केली आहे.

महागाईत उताराबाबत मात्र आशावाद

आशियाई विकास बँकेने भारतातील महागाई दर कमी होण्याबाबतचा आशावाद व्यक्त केला आहे. डाळी, भाज्या, इंधन दरवाढीमुळे यंदाच्या जुलैपासून महागाईचा आलेख उंचावत असला तरी चालू संपूर्ण वर्षांत महागाई दर ४ टक्क्यांपेक्षा कमी, ३.७ टक्के असेल, असे बँकेने म्हटले आहे. मंगळवारीच जाहीर झाल्यानुसार देशातील किरकोळ महागाई दर नोव्हेंबरमध्ये जवळपास ५ टक्के अशा १५ महिन्यांच्या वरच्या टप्प्यावर पोहोचला आहे.