अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डेमोक्रॅटिक उमेदवार जो बायडेन यांच्या निवडीचे मुंबई शेअर बाजाराने जोरदार स्वागत केले आहे. शनिवारी रात्री अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. रंगतदार ठरलेल्या या निवडणुकीत जो बायडेन यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला.

मुंबई शेअर बाजराने सुद्धा जो बायडेन यांच्या विजयाला सलामी दिली आहे. आज सकाळी बाजार उघडताच मुंबई शेअर बाजराच्या निर्देशांकाने थेट ६७३ अंकांनी उसळी घेतली. ४२,५०० पेक्षा जास्त अंकांसह निर्देशांक ऐतिहासिक उच्चांकाजवळ पोहोचला.

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी सुद्धा १८० पेक्षा जास्त अंकांसह १२,४५० च्या पुढे गेला. बँकिंग, वित्तीय सेवा आणि आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये चांगलीच वाढ दिसून आली. इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसीच्या शेअर्समध्ये चांगली वाढ झाली.