खरेदीदार मिळविण्यात अपयश आलेल्या एअर इंडियाची भांडवली बाजारात सूचिबद्धता करण्याची तयारी सरकारने चालविली आहे. या माध्यमातून कंपनीतील सरकारचा हिस्सा कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मात्र कंपनीची पूर्णत: विदेशी मालकी दिली जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

देशातील एकमेव सरकारी हवाई प्रवासी वाहतूक कंपनीतील ७६ टक्के हिस्सा विक्रीसाठी कुणीही खरेदीदार पुढे आलेला नाही. दुसऱ्यांदा याबाबतची निविदा प्रक्रिया राबविल्यानंतर सरकारपुढे पेच निर्माण झाला आहे.

भांडवली बाजाराच्या माध्यमातून कंपनीतील हिस्सा कमी करण्याचा एक प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असल्याचे समजते. मात्र याबाबतच्या नेमक्या प्रक्रियेबाबत अद्याप स्पष्टीकरण आलेले नाही. सूचिबद्धतेसह कंपनीतील सरकारी हिस्साविक्रीसह एअर इंडियावरील कर्ज काही प्रमाणात कमी करण्याचाही प्रयत्न केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

एअर इंडियाकरिता खरेदीदार मिळविण्यात अपयश आलेल्या सरकारने यापूर्वी निविदा प्रक्रिया नव्याने राबविण्याची तयारीही दर्शविली होती. त्याचबरोबर कंपनीतील कर्मचारी, व्यवस्थापन पुनर्बाधणी करण्यात येणार आहे.