‘एअरटेल पेमेंट्स बँके’ची घोषणा

रिझव्‍‌र्ह बँकेकडून मंजूर परवान्याप्रमाणे देयक बँक म्हणून एअरटेल पेमेंट्स बँकेने गुरुवारपासून राष्ट्रीय स्तरावर कार्यान्वयन सुरू केल्याची घोषणा केली. या नवागत बँकेने आपले वेगळेपण बचत खातेदारांना त्यांच्या खात्यातील शिलकीवर ७.२५ टक्के व्याजदराच्या प्रस्तुतीतून दाखविले आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेने काही वर्षांपूर्वी बचत खात्यातील शिलकीवर व्याजदरासंबंधी असलेले ४ टक्के मर्यादेचे र्निबध काढताना, ते ठरविण्याचा बँकांनाच अधिकार बहाल केला. त्यानंतर येस बँक आणि कोटक महिंद्र बँक या नव्या पिढीच्या खासगी बँकांनी अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करताना, बचत खात्यावर ६ ते ७ टक्के व्याजदराची घोषणा केली. प्रत्यक्षात एअरटेल पेमेंट्स बँकेने या प्रचलित कमाल दराला मात दिलीच, परंतु स्टेट बँकेकडून मुदत ठेवीसाठी असलेल्या ७ टक्के दरापेक्षाही सरस व्याजदर आपल्या खातेदारांना देऊ केला आहे.

लक्षात घेण्याजोगी बाब हीच की, देयक बँक असल्याने एअरटेल पेमेंट्स बँकेला अन्य स्पर्धक बँकांप्रमाणे खातेदारांना कर्ज वितरण आणि तत्सम अन्य सुविधा देता येणार नाहीत. तसेच या बँकेच्या कोणाही खातेदाराला १ लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम त्यांच्या खात्यात ठेवता येणार नाही. तरी ठेवींवरील व्याजाचे दर घसरत असताना, एअरटेल पेमेंट्स बँकेचा उच्चतम व्याजदराचा प्रस्ताव छोटय़ा बचतदारांसाठी आकर्षक म्हणता येईल. शिवाय या बँकेचे प्रवर्तक भारती एअरटेलचे अध्यक्ष सुनील भारती मित्तल यांनी बचतदारांना १ लाख रुपयांचे मोफत आयुर्विम्याचे संरक्षण आणि ‘स्वागतपर योजना’ अन्य अनेक भेटी संभाव्य खातेदारांना दिल्या जाणार असल्याचे जाहीर केले आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत झालेल्या औपचारिक उद्घाटनाच्या कार्यक्रमात एअरटेल पेमेंट्स बँकेच्या प्रारंभिक विस्तारासाठी ३,००० कोटी रुपयांचे गुंतवणूक नियोजनही मित्तल यांनी जाहीर केले. कोटक महिंद्र बँकेनेही २० टक्के भागभांडवल खरेदी करणारी गुंतवणूक या नव्या बँकेत केली आहे.