मंदीतील अमेरिकन अर्थव्यवस्थेला तारणारे रोखे खरेदीचे धोरण तूर्त कायम ठेवण्याच्या फेडरल रिझव्र्हच्या ‘अनपेक्षित’ निर्णयाने गुरुवारी जगभरच्या भांडवली बाजारात उधाण आणले. गुरुवारी सेन्सेक्स एकाच व्यवहारात जवळपास ७०० अंशांची उसळी घेत २०,६००चा टप्पा पार करत गेल्या तीन वर्षांच्या उच्चांकाला पोहोचला. तर सत्रातील १६१ पैशांच्या वाढीच्या रूपात भारतीय चलनाने महिन्यापूर्वीचा प्रति डॉलर ६२चा काही सन्मानजनक स्तर पुन्हा कमावला. फेडरल रिझव्र्हच्या पावलावर पाऊल ठेऊन एक दिवसांवर येऊन ठेपलेले रिझव्र्ह बँकेचे पतधोरणदेखील सुलभ असेल आश्वासक अंदाज सेन्सेक्स व रुपयाच्याही पथ्यावर पडला.
अमेरिकी फेड-पाठोपाठ रिझव्र्ह बँकेच्या धोरण-नरमाईच्या अपेक्षेच्या हिंदोळ्यावरच सेन्सेक्स तब्बल ६८४.४८ अंशांची मजल मारत २०,६४६.६४ पर्यंत पोहोचला. गुरुवारी एकाच दमात २० हजाराची पातळी पार करतानाच निर्देशांकाने ३.४३ टक्क्यांची झेप घेतली आणि ३४ महिन्यांपूर्वीचा उच्चांकही सर केला. मुंबई निर्देशांकाने यापूर्वी २०,८७५.७१ असा  टप्पा १० नोव्हेंबर २०१० रोजी गाठला होता. तर याच महिन्यातील १० तारखेची ७२७ नंतरची सर्वात मोठी झेप आज त्याने घेतली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीदेखील २१६.१० अंश वाढीसह ६,११५.५५ या गेल्या चार महिन्यांच्या उच्चांकावर बंद झाला. त्यानेही ३.६६ टक्क्यांची दमदार वाढ नोंदवली. यामुळे गुंतवणूकदारांची मालमत्ताही एकाच दिवसात १.८३ लाख कोटी रुपयांनी वाढली. विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचा ओघही आज ३५४३.८४ कोटी रुपये राहिला. सर्व १३ पैकी, माहिती तंत्रज्ञान निर्देशांक वगळता इतर १२ क्षेत्रीय निर्देशांकही तब्बल ६.७८ टक्क्यांपर्यंत वधारले. ६२ समभागांनी वर्षभरातील सर्वोच्च मूल्य नोंदविले.
भांडवली बाजारात वाढलेला गुंतवणुकीचा ओघ आणि निर्यातदारांकडून खुले झालेले परकी चलन यामुळे गुरुवारअखेर रुपया १६१ पैशांनी उंचावत प्रति डॉलर ६१.७७ पर्यंत पोहोचले. कालच्या व्यवहारात रुपया अवघ्या एक पैशाने घसरला होता. यावेळी तो ६३.३८ वर होता. गुरुवारच्या व्यवहारात ६१.७० अशी भक्कम सुरुवात करत चलन दिवसभरात ६१.६४ या उच्चांकावर पोहोचले. व्यवहारात ६२.१० अशी नरमाई दर्शविल्यानंतर चलन दिवसअखेर कालच्या तुलनेत २.५४ टक्क्यांनी वर जात महिन्याच्या उच्चांकावर स्थिरावले. याआधी २९ ऑगस्टला रुपयाने २२५ पैशांची (३.२७%) दिवसातील मोठी झेप घेतली होती.
सुदैवी राजन यांचा मार्ग सुकर!
अमेरिकन अर्थव्यवस्थेला मंदीतून उभारीसाठी दरमहा ८५ अब्ज डॉलर रोखे खरेदीचा टेकू काढून घेण्याची तमाम अर्थविश्लेषकांची अटकळ फेडरल रिझव्र्हच्या दोन दिवसांच्या बैठकीने खोटी ठरविली. फेडचे प्रमुख बेन बर्नान्के यांनी या माध्यमातून भारतीय रिझव्र्ह बँकेच्या नव्या गव्हर्नरांचे पहिलेवहिले तिमाही धोरण सोपे केल्याचा देशाच्या भांडवली बाजारासह चलन बाजारातील सकारात्मक व्यवहारांनी प्रत्यय दिला. अमेरिकेच्या फेडरल रिझव्र्हचे प्रमुखपद कठोर अशा लॉरेन्स समर्स यांच्याकडे जाणार नाही (या पदासाठी जेनेट येलेन या महिला उमेदवारावर शिक्कामोर्तब) हे स्पष्ट झाल्यानंतर रोखे खरेदीही तूर्त कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले. भारतीय रिझव्र्ह बँकेचे नवे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी याच अंदाजाच्या आधारे आपले पहिले पतधोरण दोन दिवस लांबणीवर टाकले होते. फेडचे धोरण कठोर असण्याच्या शक्यतेमुळे चलन घसरण रोखण्यासाठी रिझव्र्ह बँकेने केलेला रोकड संकुचित करण्याचा निर्णयही माघारी घेण्याची शक्यता होती. वाढत्या महागाईमुळे व्याजदर कमी होण्याची शक्यता नसतानाच डॉलरच्या तुलनेत रुपयाही आता सावरत असल्याने तमाम अर्थव्यवस्थेला रिझव्र्ह बँकेकडून मोठी अपेक्षा आहे. गुरुवारी सेन्सेक्सच्या उसळीत व्याजदराबाबत संवेदनशील बँक समभागांच्या वधारलेल्या मूल्याचे योगदान याची चुणूक देते.