18 February 2020

News Flash

अमेझॉनकडून अब्ज डॉलरची गुंतवणूक

भारत दौऱ्यावर असलेल्या जेफ बेझोस यांची घोषणा

| January 16, 2020 03:24 am

भारत दौऱ्यावर असलेल्या जेफ बेझोस यांची घोषणा

नवी दिल्ली : आघाडीची ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनने भारतातील लघू व मध्यम उद्योगाच्या प्रोत्साहनार्थ तब्बल एक अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची घोषणा बुधवारी केली. अ‍ॅमेझॉनचे प्रमुख जेफ बेझोस यांनी २०२५ पर्यंत एक कोटी व्यावसायिकांना तंत्रस्नेही मंचावर आणण्याचे लक्ष्यही स्पष्ट केले.

गेल्या पाच वर्षांत दुसऱ्यांदा भारतभेटीवर आलेल्या जेफ बेझोस यांनी, अ‍ॅमेझॉनच्या माध्यमातून येत्या पाच वर्षांत १० अब्ज डॉलरच्या व्यवसाय निर्यातीचे उद्दिष्टही जाहीर केले. अ‍ॅमेझॉनने आतापर्यंत एकूण ६.५ अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीचा मानस व्यक्त केला आहे.

अ‍ॅमेझॉन येत्या पाच वर्षांत नव्याने एक अब्ज डॉलरची गुंतवणूक करेल आणि याद्वारे १० अब्ज डॉलरच्या निर्यातीचे लक्ष्य पूर्ण होईल, असे जेफ बेझोस म्हणाले. शिवाय या माध्यमातून येत्या पाच वर्षांत भारतातील लघू व मध्यम व्यावसायिक जोडले जातील, असेही त्यांनी सांगितले.

भारतातील शहरे व खेडय़ांमध्ये १०० ‘डिजिटल हाट’ सुरू करण्यात येतील, अशी घोषणाही बेझोस यांनी यावेळी केली. अमेरिका-भारत व्यापार सहकार्य २१ व्या शतकात महत्त्वपूर्ण ठरेल, असे सूचक वक्तव्यही अ‍ॅमेझॉनचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी बेझोस यांनी केले.

अ‍ॅमेझॉनच्या मंचावर सध्या ५.५० लाख विक्रेते व्यवहार करत असून ६०,००० हून अधिक उत्पादन निर्माते तसेच नाममुद्रा आहेत. एका अंदाजानुसार, या क्षेत्रातून २०२० मध्ये १२० अब्ज डॉलरच्या उलाढालीचा अंदाज आहे. हे क्षेत्र वार्षिक ५१ टक्के दराने वाढत आहे.

दिल्लीतील संभव परिषदेला उपस्थित राहण्यासाठी बेझोस हे सध्या भारतभेटीवर आले आहेत. बेझोस यांनी यापूर्वी २०१४ मध्ये २ अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर डिसेंबर ३.५ अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीचा मानस व्यक्त करण्यात आला होता.

‘किराणा क्षेत्र  चिरडण्याचा डाव’

अमेरिकी ई-कॉमर्स मंच अ‍ॅमेझॉनच्या संस्थापकांनी बुधवारी व्यक्त केलेल्या विस्तारित गुंतवणुकीचा मानस म्हणजे भारतातील किराणा क्षेत्र व छोटय़ा व्यापाऱ्यांना चिरडण्याचा डाव असल्याची तीव्र प्रतिक्रिया या क्षेत्राच्या संघटना ‘सीएआयटी’ने व्यक्त केली आहे. संघटनेमार्फत अ‍ॅमेझॉनचे जेफ बेझोस यांच्या निषेधार्थ हजारो व्यावसायिकांनी दिल्लीत निदर्शने केली.

First Published on January 16, 2020 3:24 am

Web Title: amazon boss jeff bezos commits usd 1 billion investment in india zws 70
Next Stories
1 प्रगतीच्या तिसऱ्या टप्प्यात व्यक्तिगत, आर्थिक स्वातंत्र्याचा पायाही विस्तारावा – डॉ. विजय केळकर
2 ‘टाटा अल्ट्रोझ’ला सुरक्षेचे सर्वोत्तम मानांकन
3 मागणीला चालना दिल्यास अर्थवृद्धी दर सुधारेल – अ‍ॅसोचेम
Just Now!
X