नवी दिल्ली : ई-व्यापारातील जागतिक अग्रणी अ‍ॅमेझॉनने भारतात पुढील पाच वर्षांत तंत्रज्ञान, पायाभूत सोयीसुविधा आणि दळणवळण जाळ्यात गुंतवणुकीतून तब्बल १० लाख रोजगार तयार केले जातील, असे नियोजन शुक्रवारी स्पष्ट केले.

गेल्या सहा वर्षांपासून भारतीय बाजारपेठेत कार्यरत अ‍ॅमेझॉनने सात लाख लोकांना नोकऱ्या दिल्या असून, त्यात आणखी १० लाखांची येत्या काळात भर पडेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

कंपनीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून, माहिती-तंत्रज्ञान, कौशल्य विकास, कंटेंट निर्मिती तसेच प्रत्यक्ष विक्री व्यवसाय, दळणवळण आणि वस्तू निर्मिती या माध्यमातून २०२५ सालापर्यंत अतिरिक्त १० लाख प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीचे लक्ष्य असल्याचे स्पष्ट केले. भारत दौरा आटोपून गेलेले अ‍ॅमेझॉन इन्क.चे प्रमुख जेफ बेझोस यांनी सरलेल्या बुधवारी भारतात १ अब्ज डॉलर (सुमारे ७,००० कोटी रुपये) गुंतविण्याची घोषणा केली आहे. या गुंतवणुकीचे फलित म्हणून ही रोजगार निर्मिती होणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.

परदेशी गुंतवणुकीने कायद्याचे पालन केलेच पाहिजे – गोयल

अहमदाबाद : अब्जावधी डॉलरची गुंतवणूक करून अ‍ॅमेझॉन भारतावर कोणते उपकार करीत नाही, असे दिवसभरापूर्वी केलेल्या वक्तव्यानंतर, वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी त्या संबंधाने सारवासारवीचा प्रयत्न केला. विदेशी गुंतवणुकीचे आपण स्वागतच करतो, परंतु अशा गुंतवणुकीने येथील कायद्याचे काटेकोर पालन केलेच पाहिजे, अशी पुस्ती त्यांनी जोडली.

गुरुवारी अ‍ॅमेझॉनच्या गुंतवणुकीसंबंधी केलेल्या विधानाचा विपर्यास केला गेल्याने यातून अ‍ॅमेझॉनविषयी नकारात्मकतेचा संदेश गेला असल्याचे गोयल यांनी नमूद केले. आपल्या देशात ई-व्यापारासंबंधी काही नियम निर्धारीत केले गेले आहेत. विदेशातून होणारी गुंतवणूक या नियमांच्या परिघाबाहेर जात असेल, तर तेथे आवश्यक कायदेशीर प्रक्रिया अनुसरली जाईल. शिवाय त्यातून भारतातील छोटय़ा व्यापाऱ्यांसाठी त्यातून कोणतीही असमान स्पर्धात्मकता तयार केली जाणार नाही, याची दखल घेतली