सुधीर जोशी  sudhirjoshi23@gmail.com

भारतीय उद्योगांना भेडसावणारी मंदीची समस्या ही वाहन खरेदीचे आकडे, कंपन्यांच्या जाहीर झालेल्या तिमाही निकालात दिसणारा नफ्यावरील दबाव, महागाई निर्देशांकातील घट यातून सूचित होतेच आहे. बाजाराच्या सध्याच्या पडझडीत विदेशी गुंतवणूकदारांचा मोठा वाटा अर्थसंकल्पावरील सर्वदूर नाराजी दर्शविते..

मा हिती तंत्रज्ञानातील इन्फोसिस व टीसीएस कंपन्यांनी जाहीर केलेले पहिल्या तिमाहीचे निकाल व पुढील सहा महिन्यांत उद्योग क्षेत्र मंदीमधून सावरण्याची आशा यामुळे गेल्या आठवडय़ाच्या निराशमय वातावरणातून बाजार सावरला. त्याला साथ मिळाली घाऊक महागाई निर्देशांकाच्या गेल्या दोन वर्षांतील नीचतम (२.०२ टक्के) पातळीची. पहिल्या तीन दिवसांत वाढीकडे कल दाखवणारे निर्देशांक उर्वरित दोन दिवसांत खाली आले. बाजाराच्या या पडझडीत विदेशी गुंतवणूकदारांचा वाटा मोठा आहे. आतापर्यंतच्या जुलैमध्ये २,००० कोटींहून जास्त रुपयांची विक्री त्यांनी केली. आठवडाअखेर दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी मोठी साप्ताहिक घट दाखवून अर्थसंकल्पावरील नाराजी कायम राखली.

आंतरराष्ट्रीय व्यापारयुद्ध लवकर संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. चीनकडून आयात केलेल्या मालावर लादलेल्या करांमुळे अमेरिकी उद्योजक इतर देशांकडे वळण्यास सुरुवात झाली आहे. भारतातील विशेषत: रासायनिक कंपन्या याचा लाभ उठवू शकतात. सुदर्शन केमिकल्स, फाइन ऑरगॅनिक्स, आरती इंडस्ट्रीज आदी कंपन्यांचा विचार करता येईल.

गेल्या वर्षी वस्तू व सेवा करातील कपातीचा लाभ रंग उद्योगाला झाला; परंतु वाढलेल्या खनिज तेलाच्या भावांमुळे उत्पादन खर्चावर ताण पडून नफ्यामध्ये फारसा परिणाम जाणवला नाही. आता खनिज तेलाच्या किमती वाजवी पातळीवर आल्यामुळे रंग कंपन्यांच्या नफ्यात वाढ होईल. त्याला सरकारच्या घरबांधणीसाठी उत्तेजन देणाऱ्या धोरणाची जोड मिळेल. वाहन उद्योगाची रंगाची मागणी सध्या कमी असली तरी एकूण विक्रीत त्याचे प्रमाणही कमी आहे. या क्षेत्रातील आघाडीच्या एशियन पेंट्स व बर्जर पेंट्सच्या समभागांकडे नजर असायला हवी.

भारतीय उद्योगांना भेडसावणारी मंदीची समस्या ही वाहन खरेदीचे आकडे, कंपन्यांच्या जाहीर झालेल्या तिमाही निकालात दिसणारा नफ्यावरील दबाव, महागाई निर्देशांकातील घट यातून सूचित होतेच आहे. पावसाला उशिरा सुरुवात झाल्यामुळे पेरण्यांना उशीर झाला आहे व त्याचा ग्रामीण भागातील उत्पन्न व मागणीवर होणार आहे. सरकार परदेशी कर्ज उभारण्याचा विचार करीत आहे जे भारतातील व्याजदरांपेक्षा किती तरी कमी दराने मिळते. त्यामुळे ऑगस्टमधील बठकीत रिझव्‍‌र्ह बँक व्याजदर कमीत कमी पाव टक्क्यांनी कमी करेल. त्याहूनही जास्त कपात व बँकांच्या कर्जावरील व्याजदरात त्याचा परिणाम दिसणे एकूणच अर्थव्यवस्थेला व बाजाराला उभारी देईल. या आठवडय़ात जाहीर झालेल्या तिमाही निकालांत विप्रो, माइंडट्री, साएंट, सास्केन, एल अँड टी टेकसारख्या मिडकॅप आयटी कंपन्यांनी निराशा केली, तर एसीसी, डाबरसारख्या कंपन्यांनी समाधानकारक कामगिरी जाहीर केली. पुढील आठवडय़ात रिलायन्स, एचडीएफसी बँक, बजाज समूह, मारुती सुझुकींच्या निकालांवर बाजार प्रतिक्रिया देईल.